जेथे ठेच लागते, तेथूनच सुरुवात होते सांभाळून चालायची.
सोनाली जे
लहानपणी खेळता खेळता लागलेली ठेच तेव्हा कळवळून आई गं !!म्हणून आईला घातलेली साद..आई धावतपळत येते , काय झाले , आई अगं ठेच लागली असे आपण म्हणल्या वर तिच्या जिव्हारी लागते ती..ती कळवळून उठते बघू बघू म्हणून जखम असेल , रक्त येत असेल तर त्यावर ताबडतोब हळद घालते नाही तर डेटॉल नी पुसून काढते..
मग हळूच म्हणते थोडा वेळ दुखणार अचानक , अनवधनाने लागली ठेच म्हणून भीती ही बसणार.आणि मग गोड बोलून सांगते की ” अग थोडे लक्ष ठेवून जावे.. अंगठ्याला लागलेली ठेच ती जखम भरून निघते पण मनाला लागलेली कधीच भरून निघत नाही” ..तेव्हा ते बोलणे कधी seriously घ्यावे असे वाटत नव्हते..तेव्हा त्याचा अर्थ ही समजत नव्हता. जसजसे मोठे होवू लागलो तसतसे तो अनुभव येवू लागला ..तसे तिचे बोल आठवू लागले.
तनु दहावी मध्ये होती. तिचे बाबा नेहमीप्रमाणे ऑफिस मधून घरी परत येत असताना तिच्या बाबांच्या स्कूटर ला एका कार ने मागून जोरदार धडक दिली..तो कार वाला थांबला ही नाही..तनु चे बाबा रक्तबंबाळ अवस्थेत असताना तिथल्या काही लोकं आणि पोलिसांनी त्यांना हॉस्पिटल मध्ये admit केले. घरी अचानक फोन तनु आणि आई खूपच घाबरल्या.. पाया खालची जमीन च सरकली. घरात होते ते थोडे फार पैसे घेवून हॉस्पिटल मध्ये पोहचल्या..डॉक्टरनी खूप प्रयत्न केले तनु ची आई आणि तिने ही जी काही शिल्लक होती ..बँक , investment , दागिने सगळ्यातून जे पैसे आले ते सगळे बाबांना वाचविण्यासाठी खर्च केले पण हाती यश आले नाही..
आता दोघींची गुजराण कशी होणार हा प्रश्न निर्माण झाला..बाबांना पेन्शन नव्हती. बरं जी saving होती ती सगळी संपली हॉस्पिटल करिता.. मग दोघी मिळून ठरवितात की आपले घर तसे मोठे आहे त्यातली एखादी खोली आपण भाड्याने देवू किंवा कॉलेज student ना म्हणजे एक रूम दोघात शेअर पण करतील असे दोन रूम चे रेंट ही चांगले येईल आणि याच मुलांना जेवणाचा डबा ही देता येईल म्हणजे त्यांच्या जेवणाचा प्रश्न सुटेल आणि आपल्याला ही थोडे खर्चाला पैसे मिळतील. विचार करून घराबाहेर board लावतात..ओळखी पाळखी मधून सांगून ठेवतात.
बाबांच्या आजारपणात त्यांचे कोणी जवळचे भेटायला , मदतीला आले नाहीत पण बाबा गेल्यानंतर तो board बघितल्यानंतर मात्र
चुलते , आत्या एक दिवस घरी आले आणि म्हणाले की आता जे आहे ते स्वीकारले पाहिजे . सांत्वन राहिलेच बाजूला.. पण दोघेही मूळ मुद्द्यावर आले ..तुम्ही राहता ते वंशपरंपरागत घर ..दादा असा अचानक जाईल हे कोणाला माहिती ?..नाही तर घराची वाटणी तेव्हाच केली असती..आता आमची वाटणी पाहिजे..तनु आणि आई अजून त्यांच्या दुःखातून सावरल्या ही नव्हत्या तरी हे पुढचे .त्या शेवटी म्हणाल्या जे असेल ते तुम्ही करून घ्या आम्ही कुठे आता धावपळ करणार ..
या परिस्थिती मध्ये ही सगळे होवून वाटणी झाली..तनु आणि आई यांच्या वाट्याला छोट्या दोन खोल्या आल्या तरी आनंदाने त्यांनी ते स्वीकारले परत नवीन सुरुवात केली , आपले आपले म्हणणारे ही वेळप्रसंगी आपल्याला स्वार्थापोटी ठेचतात शब्दशः शारीरिक दृष्ट्या नाही पण मानसिक दृष्ट्या ही.आर्थिक दृष्ट्या ही..त्यामुळे स्वतः चे , जवळची नाती काय किंवा शेजारपाजारचे यांच्यावर विश्वास ठेवून किंवा त्यांच्यावर अवलंबून राहून चालणार नाही हे शिकायला मिळते त्या अनुभवातून , आणि स्वतः सर्व परिस्थिती मध्ये खंबीर राहिले पाहिजे मन असेल , विचार असेल हे कंट्रोल मध्ये ठेवले पाहिजेत..
नाही तर तशी किती उदाहरणे बघतोच की आपण प्रेमात आधी असलेल्या नात्यात अचानक नकार दिल्याने खून करणारी विकृती दिसते पण त्यामागची परिस्थिती , मनोवृत्ती का निर्माण होते कारण ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती मध्ये गुंतलेली असते, प्रेम करत असते. Involve असते. आणि त्या प्रेमात एक अधिकार किंवा ती आता माझी तो माझा हा स्वार्थ ,पझेसिव्ह झालेली असते आणि ती आपल्याच प्रेमाकडून नकार पचवू शकत नाही स्वीकारू शकत नाही…
म्हणून राग ही जशी इतरांच्या वागण्याची प्रतिक्रिया तसे वर्तन आपल्याच व्यक्ती बाबत घडते..अर्थात या उलट काही वेळेस केवळ सत्तेपोटी , स्वार्थ , पैसा मिळविण्याकरिता ही खून यासारखी विकृती निर्माण होते ती वेगळी..प्रत्येक घटना ही वेगळ्या मानसिकतेतून घडत असते. पण तनु आणि तिची आई यांनी त्यांच्या षड्रीपू वर संयम ठेवला आणि स्वतः स्वार्थी दूनिये पासून पुढे सुरुवात केली सांभाळून चालायची.
तर पुढे आता आई आणि तनुवर खूपच जबाबदारी..आपले असून कोणी आर्थिक मदत तर करणारच नव्हते.परिस्थिती च्या या ठेचावर ठेचा तनु आणि तनुच्या आई ला अजून खंबीर राहायला शिकवत होत्या..येईल त्या परिस्थितीला खचून न जाता तोंड देण्याची शक्ती देत होत्या.
तनु आणि आई मात्र या वास्तविकता स्वीकारून परिस्थिती आणि आपल्या माणसांपासून जगण्याकरीता करत असलेल्या प्रयत्नांत पदोपदी ठेचा खात होत्या ..
पण अतिशय खंबीरपणे दोघी उभ्या राहिल्या .त्यांनी हळूहळू सुरुवात केली सांभाळून चालायची.जसे दूध पिताना गरम दुधाने तोंड भाजते तेव्हा दुधासारखे पांढरे ताक ही माणूस फुंकून पितो.तसेच तनु आणि तिच्या आई चे जवळचे नातेवाईक असोत दूरचे, शेजार पाजारचे वेळेला कोणी येणार नाहीत . आपणच स्वतः खंबीर उभे राहून , सांभाळून पुढची सुरुवात केली पाहिजे याकरिता त्या सज्ज झाल्या.
तनु दहावी मध्ये असून तिने तिचे classes सुरू केले..तिचे maths आणि सायन्स चांगले असल्यामुळे ती ते दोन विषय शिकवू लागली..सुरुवातीला तिच्याच घराशेजारील दोन मुली येवू लागल्या..पण तनु चे मनापासून शिकविणे ,समजावणे त्यांना खूप आवडले आणि त्यांचे नावडते विषय असून त्या आवडीने शिकू लागल्या..त्यामुळे इतर लोकांना ही तनु किती छान शिकविते हे समजले मग तिच्याकडे दहा student येवू लागले..त्यांना शिकवता शिकवता तनु चा ही अभ्यास परत परत होत होता..तनु बोर्डात आली आणि तिला scholarship ही मंजूर झाली.
आणि आई ने ही आपल्या भरतकाम कौशल्याचा वापर डिझायनर साड्या भरून देणे सुरू केले..तिचे ते बारकावे आणि रंगसंगती यातून ती एका मोठ्या बुटिक ची डिझायनर झाली.
आयुष्यातली बाबा जाण्याची नकळत लागलेली ठेच तनु आणि तिच्या आई करिता पुढे किती सांभाळून चालत राहवे लागेल हेच शिकवून गेली..जसे आर्थिकृष्ट्या strong रहाणं असेल, अचानक आपल्या आवडत्या जवळच्या व्यक्तीचे दूर जाणे असेल, किंवा कायमचे दूर जाणे असेल, आपल्याच व्यक्तींनी , नातेवाईकांनी मदतीचा हात राहू देत पण जे वारसाहक्काने मिळाले त्यात ही वाटा करून आपण ठरविलेले प्लॅन्स अचानक फेल होवू शकतात त्या करिता परत नवे प्लॅन्स करणे आणि वास्तविकता स्वीकारून पुढे सकारात्मक प्रयत्न करणे .
म्हणजे पुढे जात राहणे.
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपण कुठे ना कुठे ठेचकाळत असतो ..कधी शारीरिक दृष्ट्या ..पण कधी मानसिक दृष्ट्या .कधी आपलीच लोक आपल्या आयुष्यात अडथळे निर्माण करतात, कधी मैत्री मध्ये , कधी जवळच्या नात्या मध्ये , कधी प्रियकर प्रेयसी आपल्या नात्यात खूप पुढे जावून अचानक त्यांच्यामध्ये मतभेद , वाद होतात.अपेक्षा वाढतात किंवा अचानक अशी कलाटणी येते की त्यांचे नातं धोक्यात येते.. संपुष्टात येते.
अशावेळी हृदयाला , मनाला लागलेली ठेच इतकी जोरात असते की आयुष्य निराश वाटू लागते, नकारात्मक विचार येतात. आयुष्य संपले आहे आता जगण्यासारखे काही नाही आत्महत्या यासारखे विचार ही येतात..पण प्रत्येकवेळी हेच लक्षात घ्या घरचा उंबरठा , किंवा देवळात जाताना जे कासव असते त्याला बरेचदा आपण ठेचकाळत असतो का तर आपले लक्ष नसते.
पण जसं कासव आपले पाय तोंड कवचात ओढून घेऊ शकतं तशी अवस्था मानवाला प्राप्त करता यावी. षड्रीपूंपासून इंद्रीयांना बाजूला करुन भगवंताच्या चरणी नतमस्तक होत आपल्या जागी ठाम राहणं कासव सांगतं.
म्हणजेच कासवासारखं या मायावी जगापासून अलिप्त राहून आपले जीवन पुढे चालू ठेवा हे सूचित करत असते. जसे इंद्रीये मोकाट सोडून भगवंताची भक्ती होऊ शकत नाही. म्हणूनच कासवाप्रमाणे षड्रीपू जे काम क्रोध, लोभ, मोह, मत्सर आणि माया यांपासून अलिप्त होऊन भगवंताच्या दर्शनासाठी यावे.
हेच उदाहरण लक्षात घ्या घरचा उंबरठा असो किंवा बाह्य जगात खावी लागणारी पहिली ठेच असेल किंवा वारंवार येणाऱ्या संकटांचा सामना असेल तुम्ही तुमच्या मनावर ताबा ठेवा..क्रोध आला तरी त्यावर मात करून शांत राहण्याची सवय लावा..
दुसऱ्यांच्या वर्तनाचा स्वतः वर परिणाम करून घेवू नका कारण कित्येकदा त्यांच्या ध्यानी मनी ही नसते की आपण समोरच्याला दुखावले.
आयुष्यातली कधी शैक्षणिक अपयश असेल, संधी हुकली असेल, नोकरी जाणे – व्यवसायातील नुकसान असेल किंवा जवळच्या नात्यात बिघाड किंवा आयुष्यभराचा दुरावा आलेला असेल.
सगळ्यात आपण आपल्या मनाची दोलायमान अवस्था होवू द्यायची नाही..मनाचा बॅलन्स साधत पुढे जायचे..आपले ध्येय साध्य करण्याकरिता मिळालेली संधी म्हणूनच बघायचे.
धावण्याच्या स्पर्धेत स्पर्धा सुरू झाल्यावर प्रत्येक खेळाडू पूर्ण ताकदीने धावत असतो. आता शर्यत आपण जिंकणार असे समोर दिसत असतानाच अचानक पायाला ठेच लागते आणि त्याचा स्पीड कमी होतो पण तरीही पहिला नाही पण दुसरा क्रमांक येईल म्हणून अंगठा रक्तबंबाळ आहे अशा ही परिस्थितीत तो आपल्या मनाचा समतोल साधत, सकारात्मक राहून , जिद्दीने पुढे धावत जावून स्पर्धा पूर्ण करतोच शिवाय दुसरा क्रमांक ही.
आणि तेव्हा पहिला क्रमांक आला नाही म्हणून खंत नाहीच पण आपण ज्या परिस्थितीतून बाहेर पडून प्रयत्न सुरू ठेवले, स्पर्धा पूर्ण करण्याची जिद्द ठेवली सकारात्मकता ठेवली , दुसरे आलो म्हणून , हरलो म्हणून हताश नाही निराश नाही तर आपली विजयश्री साजरी केली जणू आपण आपल्या दृष्टीने प्रथमच आलो आहोत. ही ठेच हाच अनुभव असतो तो आपल्याला पुढच्या वेळी उपयोगी पडतो , प्रयत्न करणे आपल्या हातात असते , त्याकरिता शिक्षण घेणे , स्किल घेणे , अनुभव घेणे , नवीन गोष्टी करत राहणे , किंवा मैत्री आणि नाती ती बिघडू नयेत म्हणून आधीच प्रयत्न करणे पण त्यातून जर बिघडली तर मग तो स्वीकार करावा काही वेळेस वेळ हेच सगळ्यांवर चांगले औषध असते..
म्हणजेच काय तेव्हा आपण राग , लोभ या सगळ्यापासून दूर असतो ..आणि शांतपणे सगळ्या बाजूने विचार करण्याच्या मनःस्थितीत असतो.तेव्हा कदाचित आपलाच बालिशपणा वाटेल ही..किंवा चूक लक्षात येईल आणि परत नव्याने सुरुवात होईल मैत्री आणि नात्यांची..
त्यामुळे हेच लक्षात घ्या जेथे ठेच लागते, तेथूनच सुरुवात होते सांभाळून चालायची आणि पुढे यशस्वी वाटचाली ची.
जेवढे अनुभव जास्त तेवढे तुम्ही जास्त काळजीपूर्वक पुढे जात रहाता.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



आपल्या या लेखाने खूप मदत झाली.अप्रतिम विचार.
मन खूप तणावमुक्त झालं.ज्या वेळी ह्या विचाराची गरज होती त्या वेळी हा लेख माझा समोर आला.
खूप खूप धन्यवाद