“जेंव्हा तुम्ही फ्रेश फील करता, तेंव्हा आयुष्याचे प्लॅनिंग करा.”
मधुश्री देशपांडे गानू
“आयुष्याचं प्लॅनिंग”.. बापरे! खूप मोठा शब्द आहे ना! म्हणजे संपूर्ण आयुष्याचं सार दडल्यासारखं वाटतंय.. पण खरंच प्रत्येक व्यक्ती असंच स्वतःच्या आयुष्याचं आखीवरेखीव प्लॅनिंग करू शकते का?? किंवा समजा केलं तरी निभावू शकते का?? अगदी प्रचंड मेहनतीची, कामाची, सचोटीची तयारी असली तरीही कुठेतरी एक टक्का नशिबाचा भाग असतोच. बहुतेक वेळा आपण जसं आपलं आयुष्य ठरवतो, जसं आयुष्य जगायचं आपली इच्छा असते, तसं नाहीच घडत ना! काही वेगळ्याच, अकस्मात प्रसंगांना आपल्याला सामोरे जावं लागतं आणि एका क्षणातत चित्र पालटतं. एका वेगळ्याच वळणावर, वेगळ्याच अनोळखी वाटेने आयुष्य आपल्याला घेऊन जातं. आणि आपल्याला हे वास्तव स्वीकारून पुढे जात राहावं लागतं.
पण म्हणजे आयुष्याचं प्लॅनिंग करायचंच नाही का?? तर असं नाही. नक्कीच करायचं. सगळ्या चांगल्या-वाईट शक्यता गृहीत धरून, सगळ्या चांगल्या-वाईट प्रसंगांना धीराने समर्थपणे तोंड देऊन, शांत मनाने फ्रेश फिलींग असेल तेव्हाच प्लॅनिंग करायचं.
प्रत्येक व्यक्तीचं स्वतःचं असं जग असतं. त्याची आपली जवळची, प्रेमाची माणसं असतात. त्याने स्वतःसाठी, कुटुंबासाठी पाहिलेली स्वप्नं असतात. ही स्वप्नं पूर्ण करण्यासाठी त्याच्या मनात कल्पनाचित्र रेखाटलेले असतं. प्रत्येकाला सुखी, आनंदी, समाधानी, यशस्वी आयुष्य हवं असतं. पण प्रत्येकाला ते तसं मिळतंच असं नाही. माणूस आयुष्याला सामोरा जाताना, रोजचे आयुष्य जगताना त्याच्या चांगल्या वाईट सवयी, त्याचा स्वभाव, दृष्टिकोन, त्याच्या आसपासची माणसं यामुळे आयुष्यावर चांगला वाईट परिणाम होतो. खुपदा आपण आपल्या क्षमतेपलिकडचे ही स्वप्न बघतो. पण ती पूर्ण होण्यासाठी लागणारे प्रयत्न मात्र आपल्या हातून होत नाहीत.
येणारे बरे-वाईट अनुभव माणसाला घडवत असतात. खूपदा आपण एखाद्या प्रसंगाने दुःखी, उद्विग्न होऊन एखादा टोकाचा निर्णय घेतो. नंतर मात्र पश्चाताप करायची वेळ येते. नवरा-बायकोचं भांडण झालं तर एखादी शीघ्रकोपी बायको लगेच घर सोडून माहेरी जाऊन कायमची राहते. हा निर्णय चुकला आहे हे तिच्या तेंव्हा लक्षात येत नाही. पण या एका रागाच्या भरात घेतलेल्या निर्णयामुळे दोघांच्याही आयुष्यावर कायमचा वाईट परिणाम होतो.
सांगायचा मुद्दा हा, जेंव्हा तुम्ही मानसिक दृष्ट्या खचलेले असता, एखाद्या घटनेने उदास होता, दुःखी असता, प्रचंड राग आलेला असतो, म्हणजे जेंव्हा तुमची मानसिक स्थिती अशी नैराश्याची, उदासवाणी, हतबल असते तेव्हा कोणताही मोठा निर्णय, आयुष्याचं प्लॅनिंग करू नका. बहुतेक वेळा आपण अशाच मनस्थितीत अडकून निर्णय घेतो आणि आयुष्यभराचे आर्थिक-सामाजिक, नातेसंबंधांमध्ये नुकसान करून घेतो. अशावेळी आपल्या आयुष्याचं प्लॅनिंग कोसळतंच ना!!
मुळातच संपूर्ण आयुष्याचं प्लॅनिंग करण्यापेक्षा छोट्या छोट्या कालावधीसाठी प्लॅनिंग करा. जिना चढताना आपण प्रत्येक पायरी चढतच वरचा मजला गाठतो ना, अगदी तसंच! टप्प्याटप्प्याने प्लॅनिंग करा. म्हणजे तुम्ही त्याला योग्य न्याय देऊ शकाल. प्लॅनिंग किंवा कोणताही मोठा निर्णय घेताना सर्वप्रथम तुमची मानसिक स्थिती उत्तम हवी. आत्मविश्वासपूर्ण आणि आल्हाददायक मनस्थिती मध्ये तुम्ही सर्वोत्तम निर्णय घेऊ शकता. बघा.. तुमच्या घरात एखादी सतत आजारी पडणारी, तक्रारीचा सूर लावणारी व्यक्ती असेल आणि तिच्या आजारपणामुळे ती स्वतः आणि तुम्हीही अगदी बेजार झालेले असाल अशावेळी तुम्ही ठरवून सुद्धा एखादा योग्य निर्णय घेऊ शकत नाही. मागच्या पानावरून पुढे आयुष्य ढकलत राहता. ही वस्तुस्थिती आहे. अशावेळी तुम्ही आयुष्याचे प्लॅनिंग कसं करणार???
आता आपण अगदी फ्रेश फील करत आहोत , आनंदी मनस्थिती आहे, तर प्लॅनिंग करण्यासाठी काय करता येईल ते पाहू..
१) सर्वात प्रथम खूप मोठ्या कालावधीसाठी कोणतेही प्लॅनिंग करू नका. स्वतःकडून अवास्तव अपेक्षा नकोत. तुमच्या क्षमतेनुसार वास्तवाचं भान ठेवून तुम्ही पूर्ण करू शकाल असेच प्लॅनिंग करा.
२) आर्थिक निर्णय घेताना संपूर्ण वास्तविक विचार करून घ्या. तुमच्या निर्णयाचे फायदे-तोटे, सकारात्मक नकारात्मक दोन्ही बाजूंनी साधक-बाधक विचार करून ते लिहून काढा. त्यावर पूर्ण विचार करायला स्वतःला वेळ द्या.
३) कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका. स्वतःला विचार करायला वेळ द्या. पण अति विचार आणि चिंता टाळा. आणि इतकाही वेळ घेऊ नका की तुमची निर्णय क्षमता क्षीण होईल. ४) आत्मविश्वासाने निर्णय घ्या. पण अतिआत्मविश्वास अडचणीत आणू शकतो हेही लक्षात घ्या.
५) तुमच्या प्लॅनिंगमध्ये अचानक काही कारणांनी बदल होऊ शकतो यासाठी मनाची तयारी ठेवा. तुमचे विचार , वर्तन येणाऱ्या परिस्थिती साठी लवचिक ठेवा.
६) स्वतःच्या चांगल्या वाईट सवयी ओळखा. आणि त्या बदलण्याची तयारी ठेवा. एवढा वेळ, इच्छा आणि प्रयत्न कराच. उदाहरणार्थ. समजा तुम्ही निवृत्त झाल्यानंतरही कार्यरत राहण्यासाठी प्लॅनिंग केले असेल तर तुम्ही शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या फिट असणे गरजेचे आहे. आज जर तुम्ही रोज फास्टफूड खात असाल आणि आता काहीही त्रास होत नाहीये. तरी त्याचा नंतर तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. आणि तुमचे निवृत्तीनंतरचे प्लॅनिंग बिघडवू शकतो. तर अशा सवयी ज्या प्लॅनिंग मध्ये अडथळा येतील त्या प्रयत्नपूर्वक बदला.
७) तुमच्या अडचणींकडे, यशाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदला.
८) कोणताही मोठा निर्णय किंवा प्लॅनिंग करताना तज्ञांचा सल्ला घ्या. तुमच्या वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक कोणत्याही प्लॅनिंग मध्ये कुटुंबीयांना विश्वासाने सामावून घ्या. अत्यंत शांत, विचारी मनाने निर्णय घ्या.
९) कोणतेही प्लॅनिंग करताना हे मला उपयुक्त आहे ना! मला आनंददायी आहे ना! याचा विचार करा.
१०) स्वतःच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, स्वतःला प्राधान्य देऊन प्लॅनिंग करा. कोणतीही स्पर्धा म्हणून किंवा कोणालाही कमी लेखण्यासाठी हे करू नका.
प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे म्हणतात काहीही कृती करण्याआधी, बोलण्याआधी, विचारही करण्याआधी “पाॅज” घ्या. दोन क्षण थांबा. त्यावर शांतपणे विचार करा. आणि मग कृती करा. तेच आयुष्याच्या प्लॅनिंग करण्यातही लागू पडतं. उत्तम, आनंदी, फ्रेश मनस्थिती असतानाच सर्वोत्तम निर्णय घेतले जातात. असंच तुमच्याही आयुष्याचं प्लॅनिंग करून त्यात आनंद, सौख्य, समाधान यांना प्राधान्य द्या. सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा….
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



Lekh khupch chan aahe