जी माणसं हवीहवीशी वाटतात , ती माणसं पुन्हा हव्याहव्या रूपात भेटत नाही..
कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे
माणसांशिवाय हे आयुष्य ‘आयुष्य’ नाहीच..!!
अशी माणसे येता जीवनी
हृदयात घर ती करूनी जाती…
अन् जाताजता नकळत
डोळ्यांच्या कडा ओलावून जाती…!!
आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारची , वेगवेगळ्या रूपातली , वेगवेगळ्या ढंगाची माणसं येतच राहतात. पण त्यातली काही मोजकीच असतात जी नेहमी हवीहवीशी वाटतात. पण जी माणसं हवीहवीशी वाटतात ,ती पुन्हा पुन्हा त्याच हव्याहव्याशा रूपात मात्र सहसा भेटत नाही.
आणि जी नकोनकोशी असतात ती मात्र अगदी पावलोपावली डोळ्यासमोर उभीच असतात. मग इच्छा नसतानाही माना डोलवाव्या लागतात. अगदी इतकच नाही तर त्यांच्या कणभर सहवासाने संपूर्ण दिवस खराब जातो.पण त्या हव्याहव्याशा वाटणाऱ्या माणसांची आपल्याला इतकी सवय झालेली असते की त्यांच्याशिवाय जगणं अगदी अशक्य वाटतं.
ती माणसं कधी अचानकपणे आयुष्यातून एका फुलपाखरासारखीच निघून जातात. आणि हो ती माणसं फुलपाखरू बनूनच आयुष्यात येतात.क्षणाक्षणांच्या सहवासानेही आयुष्यभरासाठी प्रेम , जिव्हाळा देऊन जातात.
रणरणत्या ऊन्हात हिरवीगार सावली देणारी झाडं , जीवाची काहीली होताना अचानक बरसणाऱ्या थंडगार वर्षासरी , काटा टोचल्यावर जखमेवर मलमपट्टी करणाऱ्या मऊ- मखमली अशा नाजूक पाकळ्या ,अबोल असताना बोलायला येणाऱ्या सळसळत्या लाटा , अश्रु पुसणारा तो रूमाल ,काही सतत वाचावीशी वाटणारी सुंदर पुस्तकं , किनाऱ्यावर सुखरूपपणे घेऊन जाणारी होडी , अंधारातील प्रकाशाचा किरण…
अशा आणि यांसारख्या कितीतरी रूपात आपल्या आयुष्यात काही माणसं येतात.आणि त्यांना मनापासून पुन्हा पुन्हा आपल्याला साद घालावीशी वाटते.अशा वेगवेगळ्या रूपात ही माणसं येतात आणि केव्हा आयुष्याच रूपडं पालटून टाकतात कळतच नाही.इतकच नाही तर आपल्याला कितीतरी गोष्टी ही माणसं शिकवून जातात.
आपल्यासाठी केवळ ही माणसं स्वतःच लढत नाही तर…आपल्यालाही ती वेळप्रसंगी तलवार कसं व्हायच आणि आणि तलवार कशी चालवायची हे अगदी कटाक्षाने शिकवतात. शिकवतो तो गुरु…. अशा गुरूरूपातही ही माणसं नकळतपणे येतात.
जाताना इतकं काही भरभरून देऊन जातात ही माणसं…अगदी आयुष्यभर किंवा श्वासांच्या माळा तुटेपर्यंत….!! म्हणून कदाचित आपल्याला ही हवीहवीशी वाटणारी माणसं , त्याच त्या हव्याहव्याशा रूपात पुन्हा पुन्हा भेटत नसावी. नाहीतरी आयुष्य जगायला कधीकधी काही सुखद आठवणीही पुरेशा असतात. पण……पण तरीही एकदा त्यांच्या सहवासात क्षणभर का होईना रममाण होऊन आयुष्याची गाणी गुणगुणाविशी वाटतात.
आणि…..आपण बोलतो , की तुझी जागा कोणीही घेऊ शकत नाही… बहुधा तसच या माणसांच्या बाबतीत असावं.या अशा माणसांची आपल्या आयुष्यातील एक हक्काची वेगवेगळी जागा ठरलेली असते.त्यांची जागा अशी सहजासहजी कुणालाही घेणं शक्य नाही. कारण आयुष्यात कितीही गोड-आंबट व्यक्ती असल्या तरी प्रत्येकाशी आपलं ‘Bonding’ हे वेगवेगळ असतं.
म्हणूनच ही अशी माणसं पुन्हा पुन्हा भेटणं फार कठीण असतं……..भेटली तर नव्या रूपात नवी माणसं भेटतात…त्यामुळे जुन्या आठवणींना घेऊन, हव्याहव्याशा वाटणाऱ्या माणसांच्या हव्याहव्याशा रूपाला डोळे हलकेच मिटून…. मनातून मनापासून एक ‘आओ ना…….आओ ना…..म्हणत हलकीशी साद घालायची. क्षणभर का होईना… ती माणसं भेटतात……च…!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


