Skip to content

” जीवनात आपण कितीतरी गोष्टी मागे सोडलेल्या असतात आणि त्या सोडायला ही हव्यात.”

” जीवनात आपण कितीतरी गोष्टी मागे सोडलेल्या असतात आणि त्या सोडायला ही हव्यात.”


मधुश्री देशपांडे गानू


“बर्बादीयों का सोग मनाना फिजूल था

बर्बादीयों का जश्न मनाता चला गया…

जो खो गया मैं उसको भूलाता चला गया…

गम और खुशी में फर्क ना महसूस हो जहाँ..

मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया….

मैं जिंदगी का साथ निभाता चला गया”

गीतकार साहिर लुधियानवी चे अप्रतिम गीत. संपूर्ण जीवनाचे तत्वज्ञान या गीतात सांगितले आहे. भूतकाळ कसा सहज विसरावा आणि आनंद आणि दुःख एकाच समान तटस्थ पातळीवर कसा अनुभवावं याचा साक्षात धडाच आहे हे गाणं. अगदी सामान्य माणसाला तर हे शक्य नाही. तरीही जीवनाच्या या वळणावळणाच्या वाटेवर फुलेही आहेत आणि काटेही. तरीही आपण पुढे चालत राहतो. एक एक स्टेशन मागे टाकत रेल्वे कशी आपल्या नियोजित स्टेशनवर पोहोचते.

अगदी त्याचप्रमाणे घडून गेलेल्या चांगल्या-वाईट घटना, गोष्टी म्हणजेच भूतकाळ मागे सोडून आपणही पुढे पुढे जात राहिले पाहिजे. जर आपण अशाच एखाद्या घटनेपाशीच थांबून राहिलो तर हा प्रवास संपून जाईल. मग आयुष्य जगण्याची, हा प्रवासाचा थरार अनुभवण्याची गंमत कशी येईल??

बालपण किती सुखावह असतं ना! “लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा”. पण किती पटकन बालपणीचे रम्य दिवस संपतात. राहतात फक्त गोड आठवणी. आपण परत लहान होऊ शकतो का? नाही ना.. तर त्या आठवणी मनात ठेवूनच आयुष्याचे नवे अनुभव घेण्यासाठी सज्ज होतो.

पण होतं काय की! बरेचदा आपण भूतकाळात तरी फार रमतो, नाहीतर भविष्याची स्वप्न बघण्यात वेळ घालवतो. वर्तमान अगदी आपल्या समोर हात पसरून उभा असला तरीही मग आपल्याला दिसत नाही. आत्ताचा क्षण, आत्ता आपल्या सोबत असलेली आपली प्रेमाची माणसं हे आपण सर्वस्वाने, भरभरून अनुभवतच नाही. वर्तमानाला आज आपण आपलं सर्वस्व दिलं नाही तर  भवितव्य आनंददायी, सुखाचं कसं होईल?? पण नाहीच समजत ना!

अगदी अत्यंत सुखद आणि अत्यंत दुःखद घटना, प्रसंग यांच्या आठवणी जतन केलेल्या असल्या तरीही तो “भूतकाळ” आहे. पुन्हा ते क्षण कधीच आपल्या आयुष्यात येणार नाहीत, हेच लक्षात येत नाही. सुखाचे क्षण प्रसंग जर आपण गोंजारत राहिलो तर हीच सुखाची परिसीमा आहे असे समजून आपण नवीन आनंदी क्षण निर्माण करणारच नाही. त्या बाबतीत उदासीन होऊ. आणि जर अत्यंत दुखी प्रसंग कुरवाळत राहिलो तर आत्ताचा वर्तमानातील आनंदी क्षण मोकळेपणाने स्वीकारू शकणार नाही.

तुमचं अत्यंत प्रेमाचं माणूस अवेळी तुम्हांला सोडून गेलं तर तुम्ही त्याच दुःखात तिथेच वर्षानुवर्ष अडकलात तर कसं होईल?? पुढे येणारे कितीतरी आनंदाचे क्षण या एका दुःखद घटनेने झाकोळून जातील. जर तुम्हीं या जखमा धरून ठेवल्या तर त्या भरणार कशा?? त्यातून भूतकाळात घडून गेलेल्या एखाद्या दुख:व घटनेवरून पुढे आयुष्यात सतत विक्टिम कार्ड खेळणारे माणसंही खूप असतात. यामुळे ते स्वतःचा आज आणि उद्याही स्विकारू शकत नाहीत.

कित्येक वेळा अशी कितीतरी नाती असतात जी आपल्या जवळची,  महत्त्वाची, जीवाभावाची असतात पण काळाच्या ओघात हीच नाती भंग पावतात. एकमेकांशिवाय एकही क्षण न करमणारी दोन माणसं कायमचे अनोळखी होतात.  हे सत्य स्वीकारून, ही माणसे मागे सोडूनच पुढे जायचे असते. काही नात्यांचा प्रवास ठराविक वळणापाशी संपतो. काही नाती ही गंगेवर सोडावी लागतात. अत्यंत वाईट अनुभव आल्याने, विश्वासघात त्यामुळे नाती तुटतात. आपण जगणं सोडतो का?? नाही ना! तर नवी नाती, नवे गणगोत तयार होतच राहतात.

अर्थात नकारात्मक, यातनादायक आठवणी या दीर्घकाळ त्रासदायक ठरू शकतात. जाणीवपूर्वक प्रयत्न करून या गोष्टी मागे सोडण्याची मनाची तयारी करायलाच हवी. नाहीतर हे ओझं घेऊन तुम्ही आज दमदार पावलं कशी टाकणार?? यासाठी वेळ तर लागणारच. पण आजच्या वर्तमानासाठी आणि चांगल्या भविष्यासाठी हे करावंच लागेल.

तुमच्या भूतकाळात रमण्याचे नेमके कारण शोधून काढा. स्वतःच्या नेमक्या भावना जाणून घ्या. स्वतःच्या चांगल्या वाईट भावना स्वीकारायला शिका. तुम्हीं जितक्या त्या नाकाराल तितके तुम्ही भूतकाळात रमाल. तुमच्या भावनांचा खरेपणा जाणून घ्या. तुम्ही आणि तुमची प्रेमाची माणसं यांच्या हातून चुका होऊ शकतात.

स्वतःला दोषी मानू नका. क्षमा मागितल्याने आणि क्षमा केल्याने तुम्ही गोष्टी लवकर सोडून द्यायला शिकता. कधीही स्वतःला दोषी समजू नका. चांगल्या वाईट आठवणी, गोष्टी हा जीवनाचा भाग आहे, हे स्वीकारा. नकारात्मक विचार जाणीवपूर्वक टाळा. तुम्हांला प्रेरणा देणाऱ्या घटना, प्रसंग छान आठवणी म्हणून जपा. अप्रिय घटनांमधून तुम्ही काय शिकलात ते लक्षात ठेवा. आधी घडून गेलेल्या गोष्टींमुळे तुम्ही आज माणूस म्हणून किती प्रगत व प्रगल्भ झालात हे जास्त महत्त्वाचे आहे.

जीवनाचा हा प्रवास सुखकर व्हावा असं वाटत असेल तर काही गोष्टी, व्यक्ती आपण मागे सोडायलाच हव्यात. तरच हा प्रवास सुकर होतो. त्यासाठी सर्वांना मनापासून शुभेच्छा!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “” जीवनात आपण कितीतरी गोष्टी मागे सोडलेल्या असतात आणि त्या सोडायला ही हव्यात.””

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!