Skip to content

जीवनाचा कंटाळा येणे थांबवण्यासाठी या १० गोष्टी जरूर करून पहा.

जीवनाचा कंटाळा येणे थांबवण्यासाठी या १० गोष्टी जरूर करून पहा.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


आयुष्य मनासारखं जगायला कोणाला आवडत नाही. सर्वच आपआपल्या पद्धतीने आयुष्याचा आनंद घेत असतात, आयुष्य जगत असतात. पण तरीही कधीतरी अशी वेळ येतेच जेव्हा आपल्याला जीवनाचा कंटाळा येऊ लागतो. याची अनेक कारण असू शकतात. जसे की नोकरी, कामात आलेले अपयश, सतत होणारे वाद तंटे, गोष्टी आपल्याला हव्या तश्या न होणे अश्या गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा आपण का जगत आहोत? हे कसलं आयुष्य आहे? मला या सर्वाचा आता कंटाळा आला आहे अस वाटून जात.

मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरात जिथे दिवसरात्र राबाव लागत, डे नाईट ड्युटी करावी लागते तिथे माणसाला वेळच काढता येत नाही. रोजच तेच ठरलेले रूटीन, तिच काम तोच एकसारखेपणा आयुष्यात येतं गेला की ते निरस, कंटाळवाण वाटू लागतं. यातून माणूस कंटाळून जातो आणि काम करत आहे त्यात पण मन लागत नाही, त्याचाही आनंद निघून जातो. पण हे आयुष्य आपलं आहे आणि हे आपल्याला एकदाच मिळत. मग ते छान मनमोकळ्या पद्धतीने जगण्याचा अधिकार पण आपल्याला आहे व तो आनंद आपणच निर्माण केला पाहिजे. तेही आपल्याच हातात आहे. म्हणून जीवनाचा कंटाळा येणे थांबवण्यासाठी आपल्याला काही बदल करावे लागतील काही गोष्टी कराव्या लागतील. त्यासाठी या १०गोष्टी करून पहाव्यात.

१. रूटीन बदलणे: जे जॉब करतात, काम करतात त्यांचं एक फिक्स रूटीन झालेले असत आणि या रूटीन ची त्यांना इतकी सवय होते की ते त्यांच्या स्वभावाचा भाग होऊन जात. पण यातून त्यांना कधी स्वतःसाठी वेळ काढता येत नाही की स्वतःच्या माणसांसाठी. नुसत काम एके काम. सर्व आयुष्य एकसुरी होऊ लागतं आणि म्हणून एका टप्प्यानंतर कंटाळा येतो. रोज तेच तेच काम करणे त्याच पद्धतीने आयुष्य जगणे. आपण आपलं आयुष्य एखाद्या यंत्राप्रमाणे जगू लागतो आणि आपणही रोबोट होतो. म्हणून हा एकसुरीपणा काढायचा असेल तर रूटीन मध्ये थोडा बदल करायचा. म्हणजेच काय तर जरी काम करत असू तरी त्यातून स्वतःला थोडा वेळ देणे, कधीतरी सुट्टी घेऊन फिरणे , काहीतरी नविन ट्राय करणे अश्या गोष्टी कराव्यात.

२. नवीन शिकण्याचा ध्यास लावावा: अनेक जणांना वाटत की शालेय शिक्षण हेच खर शिक्षण आहे. ते पूर्ण करून बाहेर पडलो की शिकायला काही रहात नाही. पण हे खरं नाही. खर शिक्षण तेव्हा सुरू होत. त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे की आपलं शिक्षण कधीही संपत नाही. ते आयुष्यभर चालूच राहतं. फक्त आपली शिकायची ईच्छा पाहिजे. म्हणून फक्त एकच गोष्ट शिकून त्यावर संतुष्ट न राहता सतत नवीन काहीतरी शिकत रहा. मग ती कोणतीतरी भाषा शिकणं असेल, वाद्य शिकणं असेल, कोर्स असेल असंख्य अश्या गोष्टी आहेत ज्या आपण शिकू शकतो आणि याच गोष्टी आपल्याला ताजतवान ठेवतात. आपला उत्साह तिकवतात.

३. आपला दृष्टिकोन बदला: आपल्याला अस वाटत असतं की आपल्या आयुष्यात जे घडत आहे तेच आपल्या दुःखाला कारणीभूत आहे. त्यामुळेच आपलं आयुष्य अस रटाळ झालं आहे. पण असत नसत. कारण आपल्याहून वाईट असे अनेकांच्या आयुष्यात घडलेल असत तरी ते त्यातून बाहेर पडतात. हे कश्यामुळे शक्य होत? तर त्यांचा दृष्टिकोन. ते आयुष्याला वेगळ्या नजरेने पाहत असतात. आपणही जर आपली दृष्टी बदलली आणि हे समजून घेतलं की प्रसंग नाही आपले विचार आपल्याला त्रास देत आहेत ते आपण बदलायला पाहिजे तर आपलं बराचसा त्रास कमी होतो.

४. कृतज्ञ रहा: आपण अनेकदा आपल्याकडे जे नाही त्याकडेच पाहत राहतो. मग ते मोठं घर असेल, गाड्या असतील, विदेशात फिरणं असेल किंवा हॉटेल मध्ये खाणे असेल. पण आपल्याकडे आता काय चांगल्या गोष्टी आहेत हे आपण पाहत नाही. त्यामुळेच आपण आपला आनंद घालवतो व आपल्याला आयुष्य कंटाळवाण वाटत. पण आपण आपल्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टीचा पण विचार केला पाहिजे. त्याबद्दल कृतज्ञ राहील पाहिजे. आपल्याला चांगलं आरोग्य लाभलं आहे, आपल्याकडे विचारशक्ती आहे, आपण काहीतरी करु शकतो, चांगल्या ठिकाणी राहत आहोत, आपली माणसं आहेत आपल्यात याही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कित्येकांच्या नशिबी हे ही नसत. म्हणून जे आहे तेही पाहायला शिका.

५. स्वतःवर विश्वास ठेवा: जेव्हा आयुष्याचा कंटाळा येतो, जीवन नकोस होत तेव्हा माणसाचा सगळ्या वरचा विश्वास उडून जातो. कुठेच अाशा दिसत नाही. मग त्यात तो स्वतः असेल, लोक असतील आणि परिस्थिती पण. आपण काहीच करू शकत नाही अस वाटत. नैराश्य येण्यामागे हीच कारण असतात. यात व्यक्ती सर्व आशा गमावून बसतो. म्हणून आयुष्य पूर्ववत करायचं असेल तर सर्वात आधी स्वतःवर विश्वास ठेवा. मी काहीतरी करू शकतो, माझ्यात ती क्षमता आहे हे स्वतःला पटवून द्या. जरी चुका झाल्या असतील तरी हार न मानता त्यातून धडा घेऊन पुढे जा.

६. बकेट लिस्ट तयार करा: ही एक खूप चांगली संकल्पना आहे. आपण जसे जसे मोठे होत असतो तशी तशी आपण नाव नवीन स्वप्न पाहत असतो आणि ती आपल्याला पूर्ण करायची असतात. पण बऱ्याचदा अस होत की ती फक्त स्वप्नच बनून राहतात. आपण नंतर फार लक्ष देत नाही आणि अनेकदा आपल्याला वाटत असून देखील बाकीच्या गोष्टीमुळे पूर्ण करायची राहतात. म्हणूनच अश्या स्वप्नांसाठी एक छान डायरी घालायची, त्यात ही लिस्ट लीह्यायची आणि हळू हळू ती लिस्ट पूर्ण करायचा प्रयत्न करायचा. आपल्या नकळत आपण आपली अपूर्ण राहिलेली सप्न जगत जातो आणि ह्याच गोष्टी आयुष्यात रंग भरतात.

७. यांत्रिक गोष्टींशी खूप जास्त जोडले जाऊ नका: कामाच्या ठिकाणी पीसी आणि ऐनवेळी फोन हेच माणसाचं हळू हळू व्यसन होत चाललेलं आहे. दिवसभर फोन हातात घेऊन बसणे यातून माणूस आपल्या खाण्यापिण्याकडे पण लक्ष देत नाही. तसेच एकलकोंडा होत जातो. म्हणून फोन वैगरे अतिप्रमाणात न वापरणे कधीही योग्य.

८. घरातल्या लोकांसोबत तसेच आपल्या मित्रपरिवरासोबत वेळ घालवा: जे काम गोळ्या औषध करत नाहीत ते काम माणसं, त्यांचा सहवास करत असतो. नेहमी चांगल्या माणसांच्या सहवासात वेळ घालवणे, गप्पा मारणे आपल्याला अर्ध बर करत. म्हणूनच वेळ मिळेल तेव्हा आपल्या मित्र मैत्रीणीना भेटणे, मस्त फिरायला जाणे, ट्रीप काढणे, घरातल्यांसोबत मनातलं सर्व शेअर करणे, वेळ घालवणे आपला आयुष्य अजून मोठं करतील. ही नातीच आपल्याला आधार देतात.

९. शारीरिक तसेच मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या: दिसायला जरी या गोष्टी वेगवेगळ्या दिसत असल्या तरी या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. म्हणून या दोन्ही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी चांगला आहार, पुरेशी झोप, व्यायाम, चांगले विचार, तसच स्वभावामध्ये योग्य तो बदल आणणे आवश्यक आहे.

१०. योग्य त्या वेळी मदत मागा: आपल्याला काही शारीरिक आजार झाला तर आपण लगेच मदत मागतो. पण तेच जर आपल्या मानसिकतेशी संबधित असेल तर मात्र आपण मदत मागायला कचरतो. कारण परत इथे आपला दृष्टिकोन आडवा येत असतो. लोक काय म्हणतील, नाव ठेवतील वैगरे. पण आपले हे अंदाज बरोबर नसतात. आपल्याला आपल्या जीवनाचा कंटाळा येणे हे आपल्या मानसिकतेशी संबधित आहे. म्हणून कोण काय म्हणेल याहून आपलं आरोग्य लक्ष्यात घेऊन आपल्या त्रासाचा अतिरेक न होऊ देता योग्य वेळी योग्य त्या तज्ज्ञ व्यक्तीची मदत घ्यावी.

अश्या प्रकारे या दहा गोष्टी आपल्या आयुष्यात नक्की बदल आणु शकतात.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “जीवनाचा कंटाळा येणे थांबवण्यासाठी या १० गोष्टी जरूर करून पहा.”

  1. सुंदर लेख आहे. मित्रां सोबत ट्रीपला जायला हवे असे वाटते.

  2. अप्रतिम लेख आहे.मनापासून धन्यवाद तुम्हाला. जीवनातील वाईट अनुभवांची मरगळ झटकून नवी सुरूवात करते.खूप खूप धन्यवाद.

  3. या 10 पैकी एक ही माझ्या कामाचा नाही. मला माझे आयुष्य संपवायचे आहे.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!