Skip to content

जिवनाबद्दलची विचारसरणी संकुचित न ठेवता विस्तृत (व्यापक) ठेवायला हवी …हो..ना…

जिवनाबद्दलची विचारसरणी संकुचित न ठेवता विस्तृत (व्यापक) ठेवायला हवी …हो..ना…


मयुरी महाजन


आपण प्रत्येक जण जीवनाबद्दल कमी-अधिक प्रमाणात विचार करतोचं, परंतु जीवनाबद्दलची ती विचारसरणी कशी ठरत जाते, आणि ती किती संकुचित स्वरूपाची असते, कधीकधी आपण तेही स्वीकारत नाही, कारण आपल्याला फक्त विचार करण्याची ती चौकट मर्यादित आणि तितकीच आहे, असे वाटत राहते, परंतु खरं म्हणजे त्याही पलीकडे काहीतरी जीवन आहे, आणि त्याला खरच आपण अनुभवायला हवं, हे आपण लक्षपूर्वक बघण्याचा प्रयत्न करायला हवा… हो …..ना,

जीवन हे अमर्यादित आहे, ते या अर्थी की आपल्याला वाटते की हे जीवन आहे, जीवन फक्त तितकेच नाही, त्याही पलीकडे आहे ,आणि जी माणसे जीवनाबद्दल असा विस्तृत व विशाल दृष्टिकोन ठेवतात, त्यांना जीवन त्या विशाल दृष्टीने दिसत असते ,त्यासाठी फक्त आपल्या विचारसरणीला व्यापक ठेवायला हवं.. हो….ना ..,

जीवनाकडे प्रत्येक व्यक्तीचा बघण्याचा आपला एक दृष्टिकोन असतो ,आणि प्रत्येक व्यक्ती त्या त्या दृष्टीने जीवनाला आपल्या आयुष्यात साकारही करतो, या ठिकाणी मला एक उदाहरण आठवते, हत्तीचा दृष्टांत श्री चक्रधर स्वामींचा दृष्टांत की ज्यामध्ये डोळे नसलेली व्यक्ती आपल्या हाताला हत्तीच्या ज्या अवयवाचा स्पर्श झाला , त्या त्या-त्याचा अवयवाला हत्ती समजून हत्ती असा आहे, हत्ती तसा आहे, असा अंदाज लावतात, त्यामुळे कुणाला हत्ती सुपासारखा ,कोणाला ऊखडासारखा, कोणाला केरसुणी सारखा अशा पद्धतीने आढळला, परंतु डोळसपणे बघणाऱ्या त्या व्यक्तीलाच माहिती असते, हत्ती खरंच प्रत्यक्षात कसा आहे, असंच आपल्या सर्वांकडून जीवनाकडे बघताना होते,

आपण त्या आंधळ्या माणसांप्रमाणे आपल्या हाती लागलेल्या गोष्टीला आणि त्याविषयीचे आपल्या अंदाजालाचं जीवन आहे, असे समजतो, परंतु तो फक्त जीवनाचा एक भाग आहे, त्यासाठी आपण जीवनाबद्दलची विचार सरणी संकुचित न ठेवता विस्तृत व व्यापक व विशाल ठेवायला हवी, आपल्या हाती एक गोष्ट लागल्यावरती आपण आंधळे होऊन जातो ,त्याच गोष्टीत हरवून जातो ,आणि फक्त तितक्याच विचारावरती थांबून जातो, परंतु जेव्हा आपण आपल्या विचारसरणीला विस्तृत आणि व्यापक दृष्टीने बघतो, तेव्हा आपल्याला कळते अरे हा फक्त जीवनाचा एक भाग आहे, जिवन तर यापेक्षाही विशाल आहे,

आपल्या प्रत्येकाने क्षितीज काय असते, हे पाहिले असेल किंवा ऐकले असेल, परंतु त्या पलीकडेही जग आहे, हे माहिती असूनही आपण फक्त क्षितीज बघण्यातच धन्यता मानतो, हे उदाहरण जर आपल्या जीवनाकडे बघण्याच्या दृष्टीने वापरले, तरं नक्कीच आपण जीवनाकडे एक संकुचित दृष्टीने न बघता व्यापक दृष्टीने बघायला सुरुवात करू…

आपल्या प्रत्येकाच्या मूलभूत गरजा आपण पूर्ण करण्यासाठी जीवाचा आटोकाट प्रयत्न करून का होईना, ते पूर्ण करतोचं.., परंतु प्राणीमात्र जीवजंतू हे प्रत्येक जण आपला उदरनिर्वाह चालवतातचं, तसे तर आपण मानव म्हणून जन्माला आलो यामध्ये आपण किती आणि काय काय करू शकतो, याचा आपल्यालाच थांगपत्ता नसतो, कारण इतर प्राणीमात्रांपेक्षा मानवाला लाभलेल्या शक्तीचा महिमा अगाध आहे,आज जी जी साधने ,ज्या ज्या गोष्टी आपण आजूबाजूला बघत आहोत ,हे मानवाच्या कल्पनाशक्तीतून कृती रूपाने तयार झालेल्या आहेत, हे मानवाने तयार केलेले असले तरी आपण त्याला आपल्या विचारसरणीचा लाभलेला प्रतिसाद हा महत्त्वपूर्ण ठरतो,

काही गोष्टी हातात असतील, किंवा काही गोष्टी आपल्या हातातून सुटून गेलेल्या असतील, परंतु कुठेही थांबा घेऊ नये, जीवनाच्या प्रवाहात अखंडपणे चालत राहावे, कारण जी माणसे जीवनात येऊन आपला प्रपंच सांभाळतात, हे तर आहेच, पण त्याही पलीकडे काय, असा जेव्हा प्रश्न येतो, तेव्हा आपण त्यासाठी अशी एक गोष्ट स्वतःमध्ये जोपासावी, ज्यामुळे खरच जीवन असंही असतं, हे आपल्याकडे बघून वाटायला हवं…

काही जणांना निराशा खूप लवकर विळखा घालते, त्यांना एक सांगावसं वाटते, ज्या वेळेस मी हात नसलेल्यांना पायाने लिहिताना बघितले, आणि असं असूनही जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन असा होता, जर हात असले असते, तर पायातही ही शक्ती आहे ,हे कधी उमगले नसते, हाताने सर्वच लिहितात, पायाने लिहिण्याचा पराक्रम आपल्या वाट्याला आला, यामध्ये समाधान आणि चेहर्‍यावर सुंदर अप्रतिम हसू ,,तेव्हा कळत आपल्याला अरे आपण जीवनाला खरं ओळखलेलेच नाही,

आपण जीवना बद्दल खूप लहान विचार करतो, जीवन या पेक्षाही खूप काही शिकवून जाणारे विस्तृत विशाल आहे ,जेव्हा आपण जीवनाकडे विशाल दृष्टीने बघू तेव्हाच, आपल्याला ते विशाल दिसणार नाही, नाही तर संकुचित विचाराने ते संकुचित दिसणार, त्यासाठी महत्त्वाचे आहे, आपण आपल्या विचारांमध्ये किती प्रगल्भता आणतो, आणि ती प्रगल्भता आपल्या जीवनाकडे प्रगल्भतेने आणि विशाल दृष्टीने बघायला लागणारं, हे मात्र नक्की त्यासाठी आपण आपल्या विचारांना प्रगल्भ करूया…


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!