Skip to content

‘जास्त पैसा, तो श्रीमंत’ या वृत्तीनेच घात केला !!

ठेहराव…


कौस्तुभ प्रकाश वाडते


अन्न.. वस्त्र.. आणि निवारा.. या मूलभूत गरजां सोबतच पैसा ही एक जगण्यासाठी फार महत्वाची गोष्ट बनली आहे.. आपले जीवन सुरु झाल्यापासून आपण जे काम करतो ते फक्त पैसे कमवण्यासाठीच..

म्हणजेच घ्या ना.. आपले नाव शाळेमध्ये दाखल केले जाते, ते म्हणजे पुढे जाऊन चांगले कॉलेज मिळण्यासाठी, मग आपल्याला एक चांगले कॉलेज मिळते, ते एक उत्तम नोकरी करण्यासाठी, मग नोकरीतून.. ठराविक पैसे मिळू लागतात.. आणि मग हेच पैसे कमवणे आयुष्यभर चालूच असते..

पैसे कमवावे लागतातच, प्रत्येकालाच लागतात.. पण याचे कारण काय? कारण या पैश्यांतून आपण हवे ते विकत घेऊ शकतो.. गाडी, घर, बंगला,  दागिने, टीव्ही, फ्रिज, ऐसी, मोबाईल, कपडे, वस्तू.. अगदी काहीही..

एक सुखकारक जीवन जगण्यासाठी पैसे कमवणे हे फार महत्वाचे आहे.. त्यात वाईट काही नाहीच.. पण यात आपली हाव.. आहे तरी अजून मिळवण्याची वृत्ती तयार झाली आहे.

आपण थोडया पैश्यात, दोन वेळच्या साध्या जेवणात, काही थोडक्या कपड्यात, एका छोट्याश्या घरातही फार चांगले जीवन जगू शकतो..

पण आपण एकमेकांत तुलना करायला लागतो, जर त्याच्याकडे गाडी आहे तर मलाही घ्यावी लागेलच, जर त्याच्याकडे मोठे घर आहे तर मलाही घ्यावे लागणारच, जर तो जास्त पैसेवाला आहे तर मलाही व्हावे लागेलच, माझे या समाजात एक स्टेटस राहिलेच पाहिजे..

जर आज माझ्याकडे Name.. Fame.. Money.. आहे तर मी यशस्वी आणि नाही तर माझी या समाजात काहीच किंमत नाही..

ज्याच्याकडे जास्त पैसा आहे तो श्रीमंत, मोठा माणूस आणि ज्याच्याकडे कमी तो गरीब, तुच्छ.. अशी विचारसरणी आपण सहज ठरवलीच आहे.

समाजात एका स्टेटस च्या मागे, पुढे जाण्याच्या मागे, मोठे नाव कमावण्याच्या मागे, जास्त पैसे कमावण्याच्या मागे आपण एवढे धावत आहोत की आजच्या क्षणातले जीवन जगायला आपण विसरलोच आहोत..

जीवन जगण्यासाठी आपल्याकडे वेळच नाही. “वय वाढत आहे आणि जगणे कमी होत आहे”.. आपल्या आयुष्यामध्ये आता ठेहराव राहिलाच नाही..

जीवनात कुठेतरी थांबून काहीतरी वेगळे बघण्याची, काहीतरी वेगळे करण्याची वृत्तीच निघून गेली आहे. एक ठेहराव.. म्हणजे थांबणे, कुठेतरी रेंगाळणे, काहीतरी नवीन पाहणे, काहीतरी वेगळे अनुभवणे.. संपलेच आहे.

आणि हा ठेहराव म्हणजेच जीवन खऱ्या अर्थाने जगणे होय.. शेवटी.. जीवन ही एक जिवंत, सजीव गोष्ट आहे आणि पैसे ही एक निर्जीव. म्हणून जरा आयुष्याच्या सतत धावणाऱ्या गाडीतून उतरून..

जरा थांबून बघा..
जरा रेंगाळून बघा..

काहीतरी नवीन अनुभवून बघा..
मग जीवन खऱ्या अर्थाने जगायला सुरुवात होईल…..



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!