“जसे आहात तसेच राहा, कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊन जगू नका.”
मधुश्री देशपांडे गानू
हम तो ऐसे ही हैं जनाब,
दिल में कुछ, जुबां पें कुछ
ये बातें हमें नही आती…
अगर आपको रास आये
या ना रास आये
मर्जी आपकी…..
प्रत्येक व्यक्तीचं खरं तर असंच मत असायला हवं ना! प्रत्येक व्यक्ती गुणदोषांसहितच असते. काही चांगले, काही वाईट प्रत्येकात असतंच की! प्रत्येकाला असं वाटत असतं की मी खूपच चांगला आहे/ चांगली आहे. पण कोणासाठी तरी आपण खूप चांगले असतो, तर कोणासाठी खूप वाईटही असू शकतो. प्रत्येकाच्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकत नाही ना! आणि कोणी काय विचार करायचा, काय अपेक्षा करायच्या यावर आपलं नियंत्रण नसतं. चांगलं आणि वाईट या मुळातच व्यक्तिसापेक्ष गोष्टी आहेत. मला जे चांगलं वाटेल ते एखाद्याला वाईट वाटू शकतं. या चक्रव्यूहात आपण अडकायचंच नाही.
मग काय करायचं? इथे तर कोणीही कोणावरही कसेही ताशेरे ओढतो. सहज एखाद्या विषयी मत मांडून मोकळे होतो. आपल्याला दुसऱ्यांच्या वागण्या-बोलण्याचा न्यायनिवाडा करायला मजा येते. गॉसिपिंग करणं, एखादी गोष्ट तिखटमीठ लावून सांगणं, मुद्दाम एखाद्या विषयी वाईट मत समाजात पसरवणे, एखादी व्यक्ती यशस्वी होत असेल तर त्याचे पाय खेचून त्या व्यक्तीची मागे निंदानालस्ती करणे, प्रचंड असूया असणं अशा अनेक समाजविघातक गोष्टी लोक आनंदाने करत असतात.
मुळात “लोक काय म्हणतील?” असं काही अस्तित्वातच नाही, असं प्रख्यात मानसोपचारतज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे म्हणतात हे मी आधीच सांगितलं आहे. हे सगळे आपल्याच मनाचे खेळ असतात. त्यामुळे कोणासाठीही कधीही स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करू नका. कोण चांगलं म्हणतं, कोण वाईट म्हणतं याचा विचार करू नका. तसेही लोक दोन्ही बाजूने बोलतात. याकरिता स्वतःवर ठाम विश्वास असायला हवा.
सर्वात प्रथम स्वतःला आहात तसे स्वीकारा. अगदी शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक सर्व स्तरांवर. तुम्हीं स्वतःला पूर्णपणे स्वीकारलं की स्वतःमध्ये तुम्हांला हवे ते बदल तुम्हीं यशस्वीपणे करू शकता. जे तुमच्याच सर्वांगीण प्रगतीसाठी उपयुक्त ठरतात.
स्वतःची कोणाशीही कधीही तुलना करू नका. स्त्रियांमध्ये ही गोष्ट प्रकर्षाने दिसून येते. काळा रंग असलेल्या स्त्रीला गोरा रंग असणाऱ्या मैत्रिणीबद्दल प्रचंड न्यूनगंड असतो. किंवा एखाद्या हुशार मैत्रिणीने आपल्यालाही हुशार म्हणावे म्हणून आपण प्रयत्न करत असतो. बायकांना तर “ऑलराऊंडर” च बनायचे असते.
पण जे तुमच्यात उपजत नाही त्यासाठी तुम्हीं किती प्रयत्न करणार?? अशा वेळी तुमचे प्रयत्न हास्यास्पद होतात. यापेक्षा तुम्हांला जे करायला मनापासून आवडतं त्यातच प्राविण्य मिळवा. स्वतःची प्रगती होण्यावर सर्व लक्ष केंद्रित करा. म्हणजे मैत्रिणींमध्ये या वैशिष्ट्यांसह, प्रावीण्यासह तुम्हीं उठून दिसाल. तुम्ही इतरांशी स्वतःची तुलना करून स्वतःचाच अपमान करत आहांत हे लक्षात ठेवा. स्वतःला कमी लेखू नका. तसेच इतरांनाही कमी लेखू नका. भौतिक गोष्टींमध्ये तुलना करू नका. याकरता ऋण काढून सण साजरे करायची काही गरज नाही.
स्वतःच्या भावनांशी, आनंदाशी, समाधानाशी प्रामाणिक राहा. ज्या गोष्टी करण्यात तुम्हांला आनंद मिळतो त्या गोष्टी आवर्जून करा. मग तुम्हांला कोणी वाईट म्हटलं तरी हरकत नाही. आपल्याबद्दल असूया बाळगणारे लोक हे आपल्या मागे असतात. आपण त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत हेच ते सिद्ध करत असतात. आपण आपले प्रामाणिक प्रयत्न मनापासून करत राहायचं.
स्वतःला प्राधान्य द्या. असे केल्याने तुम्ही स्वार्थी आहात असा त्याचा अर्थ होत नाही. कोणीतरी आपल्याला चांगलं म्हणेल यासाठी इतकेही वाकू नका की तुमचा स्वाभिमान शून्य होईल. उदाहरणार्थ घरातील मुख्य स्त्री मग ती गृहिणी असो किंवा घर नोकरी दुहेरी जबाबदारी सांभाळणारी असो. घरातील सदस्यांच्या गरजा, हट्ट, मागण्या पुरवताना तिची दमछाक होते.
सगळी नाती निभावताना ती स्वतःलाच विसरून जाते. या तिच्या कष्टाची, भावनिक गुंतवणुकीची किती जाण ठेवली जाते?? उलट ती करते म्हणून तिलाच वेठीस धरले जाते. आणि गृहीतही धरले जाते. आणि कुटुंबातील सदस्य इतकं करूनही खुश असतीलच असे नाही. अशा वेळी तिने आवर्जून स्वतःला प्राधान्य द्यायला हवं. स्वतःची सर्वतोपरी काळजी घ्यायलाच हवी. वेळप्रसंगी स्पष्टपणे नाही म्हणायलाच हवं. स्वतःचे छंद, आवडीनिवडी जोपासायला हव्यात. त्याकरता वेळ काढायलाच हवा. मग अगदी वाईटपणा आला तरी चालेल.
“मला काय हवंय?” याबद्दल आपली मतं ठाम, स्पष्ट असायलाच हवीत. स्वतःच्या सर्व जबाबदाऱ्या स्वतः घ्यायला शिका. आपण स्वावलंबी असू तर कोणावर अवलंबून राहण्याची वेळ शक्यतो येत नाही. आपला आत्मविश्वास तर वाढतोच, पण कोणी चांगलं वाईट म्हणण्याचा प्रश्नच उरत नाही. आणि आपल्याला त्याची फिकीरही वाटत नाही.
अगदी प्रियकर-प्रेयसी च्या नात्यातही स्वाभिमान गमावून इतकंही तुमच्या प्रेमाच्या माणसासाठी सतत उपलब्ध राहू नका. एक दिवस ती तुमची प्रेमाची व्यक्ती तुमची किंमत शून्य करेल आणि तुम्ही मात्र अंतर्बाह्य उध्वस्त व्हाल.
कोणासाठी अगदी कोणासाठीही स्वतःला बदलू नका. “दुसऱ्यांच्या चांगल्या-वाईटाची फुटपट्टी स्वतःच्या आयुष्याला लावू नका.” आपण स्वतःचा स्वाभिमान जपला तरच समोरची व्यक्ती आपला योग्य आदर राखते, हे लक्षात ठेवा. तुमची आपली प्रेमाची माणसं, जवळच्या मित्र-मैत्रिणी तुम्हांला तुम्हीं आहात तसे स्वीकारतातच की!
“तुम्हीं जसे आहात तसेच मस्त राहा.” स्वाभिमानी, आत्मविश्वासपूर्ण पण गर्विष्ठ आणि अहंकारी नाही. तुमच्या आयुष्याशी, सुखदुःखाशी, यशापयशाशी एका ठराविक बिंदू नंतर कोणालाही काहीही देणंघेणं नसतं. तुमचं आयुष्य ही सर्वस्वी तुमची जबाबदारी आहे, लोकांची नाही. “त्यांच्या चांगल्या-वाईट म्हणण्याने तुमचं घर चालत नाही.” तुम्हीं तुमच्या नजरेत एक चांगला माणूस होण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहा. आणि “हम तो ऐसे ही हैं जनाब, और ऐसे ही रहेंगे..” असं बिनधास्त म्हणा…
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



Khup chhan explanation kelat mam , kharach apn apli kimmat krtch nahit n , swatahasathi pn jgl pahije , khup anand zala ha lekh vachun thank you so much .🙏