Skip to content

जर तुझा स्वतःवर विश्वास नसेल तर कोणीही तुला सहज त्रास देऊन जाईल.

जर तुझा स्वतःवर विश्वास नसेल तर कोणीही तुला सहज त्रास देऊन जाईल.


गीतांजली जगदाळे

(मानसशास्त्र विद्यार्थिनी)


सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपण आपल्या स्वतःसाठी करू शकतो ती म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढण्यात, इतर माणसांना तुमच्यावर विश्वास ठेवण्यात आणि निर्णय घेण्याची प्रक्रिया सुलभ करण्यास मदत होते. जो स्वतःवर विश्वास ठेवत नाही, त्यावर जग देखील विश्वास ठेवू शकत नाही. स्वतःवर विश्वास ठेवण्यासाठी तुम्हाला स्वतःवर प्रेम करण्याची गरज आहे, स्वतःच्या अंतर्मनात डोकावण्याची गरज आहे, ही सुरुवात स्वतःवर विश्वास ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे.

स्वतःवर विश्वास ठेवणे म्हणजे काय, तर आपली gut feeling किंवा अंतर्मन जे सांगत त्यावर विश्वास ठेवून तसे निर्णय घेणे. बहुतेक करून आपलं अंतर्मन आपल्याला योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करत असत. कधी कधी भूतकाळात केलेल्या चुकांमुळे आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवणे अवघड जात असते.

मग काही लोक स्वतःवर विश्वास ठेवण्यापेक्षा इतरांवर जास्त विश्वास ठेवतात. आपल्या जीवनातल्या गोष्टी आपल्याहून जास्त इतर कोणाला चांगल्या कळत नसतात. खूप वेळा आपले हितचिंतक असणारी लोक चांगले सल्ले देत असतात, पण तरी आपल्याला तसं वागणं जमतच असं नसत, कारण शेवटी आपला स्वभाव, आपले प्रॉब्लेम्स यासाठी तो उपदेश किती पूरक आहे हे आपल्यालाच ठरवावं लागत.

त्यामुळे इतरांचं ऐकून आपले निर्णय घेणं म्हणजे खूपच घातकी आहे. सल्ले देणारी माणसं चांगली असोत किंवा वाईट तरी देखील पूर्ण विचार करून आपले निर्णय आपण स्वतः घ्यायला हवेत. एकदा निर्णय चुकू शकतो, दोनदा चुकेल पण प्रत्येक वेळी तो चुकेल असं नाही. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवून स्वतःला देखील नवी संधी देण्यास काहीच हरकत नाही. शेवटी प्रत्येक माणूस हा चुकांमधूनच शिकत असतो. तसेच आपण ही शिकू.

इतरांवर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवणे, किंवा स्वतःवर कमी असणे, यामुळे आपलं खूप प्रकारे नुकसान होत असत. नुकसान स्वतःवर विश्वास न ठेवून इतरांचं ऐकल्यामुळे होत तरी देखील त्या व्यक्ती आपल्याला असं भासवून जातात की आपल्याच चुकांमुळे आपलं नुकसान होतंय ना की त्यांच्या सांगण्यात काही चूक होती.

म्हणजेच काय तर लोकांचं ऐकून देखील आपलं भलंच होईल किंवा निर्णय चुकणार नाहीत याची हमी नसतेच. त्यापेक्षा थोडा स्वतःवर विश्वास दाखवला आणि आपले निर्णय, आपले विचार याची जबाबदारी आपणच घेतली तर आज ना उद्या आपण योग्य निर्णय देखील घेऊ. शेवटी निर्णय चुकीचे असोत किंवा बरोबर त्यांची जबाबदारी आपणच घेणं भाग आहे कारण त्याचे परिणाम देखील आपल्यालाच भोगायचे असतात.

कधीतरी स्वतःवर संशय येणं हे खूप नॉर्मल आहे. कुणाचे सल्ले घेऊ नयेत असं नक्कीच मी म्हणत नाही, जे खरंच आपल्या भल्याचा विचार करतात अशा लोकांचं नक्की ऐकून घ्यावं पण त्यावर ही विचार करून मगच निर्णय घ्यावा कारण शेवटी तो निर्णय आपल्याला निभवायचा देखील असतो.

स्वतःवर विश्वास नसेल तर आपलाच आपल्याला इतका त्रास होत असतो की पदोपदी माणूस स्वतःशी झगडत असतो.त्यात आपल्या अवतीभवती बरीच अशी लोकं सुद्धा असतात जी आपल्या सारख्या माणसांचा गैरफायदा घेतात, त्यांना त्रास देतात. पण अशा लोकांनी त्रास दिल्यावर सुद्धा बऱ्याचदा स्वतःवर विश्वासाचा अभाव असलेली माणसं स्वतःलाच त्यासाठी दोषी मानतात.

त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवण्यासाठी आणि तो वाढवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेच आहे. जस की..

१. स्वतःवर प्रेम करायला सुरुवात करणे, त्यासाठी आपण जसे आहोत तसं स्वतःला स्वीकारणे. मग ज्या गोष्टी स्वतःबद्दल पटत नसतील त्या बदलायचा प्रयत्न करणे.

२. आपलं अंतर्मन ज्याला आपण इंग्लिश मध्ये intuition किंवा gut feeling असं म्हणतो , तीच ऐकणे, तिच्यावर विश्वास ठेवणे. कारण आपलं अंतर्मन आपल्याला कधीच चुकीचं सांगत नाही.

३. निर्णय चुकला तरी खचून न जाता परत स्वतःवर विश्वास ठेवून स्वतःलाच पुनःपुन्हा निर्णय घ्यायला लावून निर्णयक्षम बनवणे. त्यासाठी शांत डोक्याने विचार करून कुठे काय चुकले, कशामुळे चुकले याचा विचार करणे. आणि त्या चुकांचा पुढचे निर्णय घेण्यात सकारात्मकपणे उपयोग करून घेणे.

४. भूतकाळात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांसाठी, किंवा इतर चुकांसाठी स्वतःला माफ करणे, किंवा माफ करायचा प्रयत्न तरी करणे. कारण तुम्ही माफ न केल्यामुळे स्वतःवर विश्वासाचा अभाव निर्माण होतो, आणि त्यामुळे पुढे अजून चुका होण्याचा संभव काही टाळता येत नसतो. पण त्या चुकांमुळे आपण अधिकाधिक खचायला लागतो.

५. स्वतःची काळजी घेणं हा ही एक प्रकारचा स्वतःवर विश्वास ठेवण्याचं पाहिलं पाऊल आहे. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयी, झोपेच्या वेळा, पुरेशी झोप, आणि आपली तत्व पालन करणे, यामुळे देखील आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “जर तुझा स्वतःवर विश्वास नसेल तर कोणीही तुला सहज त्रास देऊन जाईल.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!