Skip to content

“जर कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर त्यांना ते करू द्या, जरा धीर धरा..”

“जर कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर त्यांना ते करू द्या, जरा धीर धरा..”


मधुश्री देशपांडे गानू


दुनिया वालों की नजर में

आज ना तुम्हांरी शख्सियत

ना ही तुम्हारी झांकी हैं….

सब्र कर ऐ जांबाज परिंदे

ऊंची उड़ान भरनी अभी बाक़ी हैं ……

माझ्याच शायरीच्या काही ओळी आहेत या. आज तुम्हीं एक सामान्य व्यक्ती म्हणून समाज तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल, पण तुमची दुर्दम्य इच्छाशक्ती, तुमची स्वप्ने, प्रयत्न आणि मेहनत पणाला लावायची तुमची ताकद असेल तर एक दिवस तुम्ही यशस्वी होताच. आणि दुनियेला तुमच्याकडे लक्ष द्यायला भाग पाडताच.

प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य हे वेगळे असते. एका व्यक्तीच्या आयुष्याची दुसऱ्या व्यक्तीच्या आयुष्याशी तुलना होऊ शकत नाही. प्रत्येकाचे नशीब, कर्म, परिस्थिती, प्रयत्न, अनुभव, मानसिकता, विचार प्रक्रिया, निर्णय प्रक्रिया, जबाबदारी व परिणाम पेलण्याची ताकद वेगवेगळी असते. काही व्यक्ती नशीबवान असतात. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य वेळी योग्य गोष्टी त्यांच्या बाबतीत घडतात. अर्थात त्यांच्या प्रयत्नांचा, बुद्धिमत्तेचा ही वाटा असतोच. पण प्रत्येकाचे जीवन सुखकर सहज सोपे नसते.

अत्यंत विपरीत परिस्थितीत, अनेक धक्के पचवून, अनेक संकटांना सामोरे जाऊन त्यांना पुन्हा आपले आयुष्य उभे करायचे असते. साधारणपणे वयाच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर आपण एक एक प्रगतीचे पाऊल टाकत असतो. शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण, नोकरी, लग्न, मुलं-बाळं इत्यादी. काहींच्या बाबतीत या सगळ्या गोष्टी अगदी वेळेत नेमक्या घडतात. तर काहींना मात्र प्रत्येक टप्प्यावर किंवा एखाद्या टप्प्यावर वेळ लागतो.

अशावेळी आपल्या संकुचित समाजाचा दृष्टीकोन सदोष असतो. उदाहरणार्थ एखाद्या मुलाच्या/ मुलीच्या लग्नाला उशीर होत असेल तर लगेच त्यांच्यात दोष शोधले जातात. तुमच्यामध्ये काही न्यून असेल तर समाज, लोक तुमच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. उदाहरणार्थ दिव्यांग मुले. यांना सहज समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेतलं जात नाही. त्यांच्याशी सहज मैत्री ही कोणी करत नाही. हे अत्यंत निंदनीय आहे. पण तरीही समाजात हेच घडताना दिसतं. आज जर तुमच्याकडे लोक दुर्लक्ष करत असतील तर अशावेळी आपण संयमाने वागणंच श्रेयस्कर ठरतं. धीराने वागणं शहाणपणाचं ठरतं.

आपण एक उदाहरण घेऊ. अगदी तिशीत असलेल्या सागरने नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. पहिला विरोध त्याला घरातूनच आई-वडिलांकडून झाला. फक्त बायकोची भक्कम साथ होती. होतं नव्हतं ते सगळे व्यवसायात भांडवल म्हणून लावलं. फक्त स्वतःच्या स्वप्नांवर, प्रयत्नांवर आणि अथक परिश्रमांवर ठाम विश्वास होता. आज सगळे जग फक्त पैशापुढे झुकतं. सागरची सुरुवातीची वर्षं हलाखीची परिस्थिती होती.

त्यामुळे परिचित, नातलग, मित्र, शेजारी पाजारी हे त्याच्याशी, त्याच्या पत्नीशी फटकून वागत. त्या दोघांनाही समाजात मान नव्हता. अगदी हळदीकुंकवाला ही त्याच्या पत्‍नीला बोलावलं जायचं नाही. तरीही त्या दोघांनी कसलीही प्रतिक्रिया न देता फक्त आपलं कार्य चालू ठेवलं. अत्यंत परिश्रमाने व्यवसाय नावारूपाला आणला. गावातच बंगला बांधला. गाडी घेतली. आता जे लोक त्यांना ओळखही दाखवत नव्हते, ते त्याला येता-जाता मान देऊ लागले. साहेब, शेठ अशी बिरुदे त्याच्या नावामागे लागली. सगळ्या सामाजिक कार्यक्रमांना दोघा पती-पत्नीला सन्मानाने बोलावले जाऊ लागले. पण दोघेही हे पुरते ओळखून होते की आज त्यांच्याकडे असलेल्या आर्थिक सुबत्तेलाच हा मान आहे.

त्या दोघांनी मात्र संपन्नतेत ही माणुसकी सोडली नाही. कधीही उन्मत्त होऊन वागले नाहीत. म्हणजेच लोकांनी तुमच्याकडे कशाही कारणाने दुर्लक्ष केलं तरी आपण मात्र धीर धरायचा. स्वतःचा आत्मविश्वास ढळू न देता आपलं काम, आपलं कर्तव्य चोख बजावायचं. प्रयत्नांची कास धरायची. एक दिवस यश वाजत-गाजत आपल्या दारी येतंच. मग आपल्यामागे आपल्याला तुच्छ लेखणारे, आपल्याला नावं ठेवणारे  हे लोकच आपल्या पुढे पुढे करून आपला सन्मान करतात.

पैशाला सर्वस्व मानणारा समाज आज सगळीकडेच आहे. आर्थिक सुबत्ता मग ती कोणत्याही मार्गाने आलेली असो लोक त्याच्यापुढे झुकतातच. आपण मात्र आपले प्रामाणिक प्रयत्न, आपला मार्ग कदापि सोडायचा नाही. आज आपण कोणाच्याही खिजगणतीतही नसलो तरीही एक दिवस आपण यशस्वी होतोच. आणि काल तोंड फिरवणारी माणसं आज आपलं तोंड भरून कौतुक करताना दिसतात.

आपण माणूस म्हणून याही अनुभवातून काय शिकलो ते महत्त्वाचं. चुकीचं कसं वागायचं नाही, हे आपण या लोकांकडून शिकतोच. “प्रत्येक व्यक्तीचा आत्मसन्मान अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो जपायलाच हवा”, हे शिकतो. आपण मात्र आज काही नाव, स्वतंत्र अस्तित्व नसणाऱ्या पण मेहनतीने काही बनू पाहणाऱ्या नवीन व्यक्तींकडे दुर्लक्ष करायचं नाही. उलट जेवढी जमेल तेवढी त्यांना मदत करायची.

अगदी जवळचे नातलग , मित्र मैत्रिणी, परिचित कोणी का असेना, आपल्याकडे दुर्लक्ष करतात यासाठी वाईट वाटून न घेता जिद्दीने स्वतःचं नाव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करायचा. वेळ सगळ्यांसाठी सारखी नसते. प्रत्येकाची वेळ येतेच. फक्त त्याचा अहंकार आणि गर्व न बाळगता माणूस म्हणून आपलं माणूसपण, माणुसकी जपण्याचा नक्कीच 100% प्रयत्न करायचा.. काय?? पटतंय ना!…


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!