“जग बऱ्याच वेळा रडवेल आपल्याला, पण आपण मात्र हसायचं सोडायचं नाही.”
मधुश्री देशपांडे गानू
किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार जीना इसी का नाम हैं…
का कुणास ठाऊक? पण या विषयाचे शीर्षक वाचल्यावर मला हेच गाणं आठवलं. जीवन जगण्याचा सोपा मंत्र सांगितला आहे या गाण्यात. माणुसकी जपत, समोरच्या व्यक्तीला समजून घेत, प्रेमाने जीवन जगता येतंच की! पण हेच आज माणूस विसरून गेला आहे का?? प्रचंड स्वार्थ , अप्पलपोटेपणा, हेवा, मत्सर अशा नकारात्मक भावना प्रखरतेने व्यक्त होताना दिसतात.
आजची प्रत्येक क्षेत्रातील जीवघेणी स्पर्धा, अशाश्वत जगणं, कशाचीही खात्री नसणं हे याला कारणीभूत आहेच. पण माणसाची वृत्तीही यामुळे बदलली आहे. अत्यंत अहंकारी, असमाधानी, स्वार्थी वृत्ती वाढीस लागली आहे. त्यामुळे स्वतःच्याच कुटुंबातील व्यक्तींबरोबर छुपी स्पर्धा, प्रचंड मत्सर, त्यांचंच वाईट चिंतणे, मुद्दाम सगळ्या बाबतीत नुकसान होईल असं वागणं हे सहज दिसून येतं. एखाद्याच्या दुःखाने ज्यांना आनंद होतो अशांना माणूस तरी म्हणायचं का??
प्रत्येक व्यक्तीचा जन्मापासून मृत्यूपर्यंत अखंड प्रवास सुरू असतो. सारेच प्रवासी इथे. संपूर्ण ब्रम्हांडाचा विचार करता आपलं अस्तित्व किती य:कश्चित् आहे. जीवन तर क्षणभंगुर आहे. तरीही मी, माझं, अहंभाव जपत असतो आपण.
प्रत्येकाला सुख-दुःखांना सामोरं जावंच लागतं. कधी नैसर्गिक आपत्ती, कधी अचानक प्रेमाच्या व्यक्तीचा मृत्यू, कधी चुकीच्या निर्णयामुळे उभे राहिलेले संकट. आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक, मानसिक, शारीरिक अशा कितीतरी छोट्या-मोठ्या आपत्तींना आपण तोंड देत असतो. नकोशा, कठीण प्रसंगांना सामोरे जाताना आपली मनस्थिती नाजूक, दुबळी, हळवी असते.
निर्णय क्षमता बिघडलेली असू शकते. मनावर अतिशय ताण आलेला असतो. यातून सावरायला कित्येकांना वर्षे जावी लागतात. अशावेळी जवळच्या व्यक्तींची, मित्र-मैत्रिणींची भक्कम साथ असेल तर तुम्हीं लवकर सावरता. पण खूपदा असेही पाहण्यात येते की, तुमच्या याच मनस्थितीचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. तुम्हांला आणखी संकटात टाकण्यासाठी काही लोक प्रयत्नशील असतात. अशावेळी तुम्हांला अत्यंत मानसिक त्रासातून जावं लागतं. सगळे जग आपलं शत्रू आहे की काय? असंही वाटू लागतं.
पण हीच वेळ असते स्वतःची स्वतःलाच भक्कम साथ देण्याची. आत्मविश्वास ढळू न देण्याची. संयमाने स्वतःला सावरण्याची. जग आपल्याकडे कुत्सित नजरेने ही पाहते. पण आपण मात्र आपलं जीवन संपूर्ण विश्वासाने जगायचं.
कितीतरी रोजच्या पाहण्यातील उदाहरणे देता येतील. दिव्यांग मुलांचं संगोपन करणे व त्यांना वाढवणे, त्यांचं संपूर्ण आयुष्य सुरक्षित करणं हे त्यांच्या पालकांसाठी अत्यंत कठीण जबाबदारी आहे. अशावेळी या मुलांना कोणी आपलं तर करत नाहीच, पण त्यांच्या पालकांनाही कोणी जवळ करत नाही. नातेवाईक तुमच्यापासून जाणीवपूर्वक दूर जातात. जणू तुम्हांला वाळीत टाकलं जातं.
अशा पालकांचे दुःख, पीडा, भावना फक्त तेच जाणोत. “ज्याचं जळतं त्यालाच कळतं.” पण अशा परिस्थितीतही अत्यंत आत्मविश्वासाने, नेटाने, सकारात्मक विचार आणि कृतीने पालक आपल्या या विशेष पाल्याला शिकवतात, वाढवतात आणि त्याचं वर्तमान आणि भविष्य कायमस्वरूपी सुरक्षित करतात. इथे जगाने त्यांना रडवण्याचा, एकटं पाडण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला असतो. पण ते मात्र जे हातात आहे ते आनंदाने स्वीकारून हसत मुखाने जीवनाला सामोरे जातात.
अनेक नातेसंबंध आपण जीवापाड जपत असतो. नवरा-बायको, प्रियकर-प्रेयसी, आई-वडील–मुलगा/ मुलगी, भाऊ-बहिण कितीतरी. खुपदा काही कारणाने नात्यांमध्ये दुरावा येतो. नाती संपुष्टात येतात. आपल्याला मनापासून हवी असतानाही काही नाती दुरावतात. अशावेळी अतिशय दुःख होतं. सगळं संपल्याची भावना होते. खास करून प्रेमभंग झाला तर! काही तर आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. यातून सावरायला काही काळ जावा लागतो. तरीही त्या नात्याला, त्या व्यक्तीला माफ करून आपण आपल्या आयुष्यात पुढे जाण्यातच शहाणपण असतं.
आपल्या जीवनाचे शिल्पकार आपणच आहोत. ते ओबड-धोबड दगड ठेवायचे की त्याची सुंदर मूर्ती घडवायची हे सर्वस्वी आपल्या हातात असतं. प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर ही आपण परत नव्या उमेदीने जीवनाला आपलंसं करतोच की! सकारात्मक आणि वास्तवाचा विचार करून आपण हसत मुखाने आला क्षण आनंदाने जगत असतो. कोणाचंही आपल्या बद्दल काय मत आहे?, कोण काय म्हणेल? याची जराही पर्वा न करता, हे माझं आयुष्य आहे आणि प्रत्येक क्षण मला ते संपूर्ण आनंदाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे, हे समजून घेऊन प्रत्येक क्षण भरभरून जगण्यातच मौज आहे. हेच आपले ध्येय असले पाहिजे.
जगाने जरी रडवलं तरी त्याचा आपल्यावर परिणाम होऊ द्यायचा की नाही हे तर आपल्याच हातात असतं ना! जे आपल्याला रडवतात त्यांना प्रतिक्रिया देऊन आपण त्यांचं महत्त्व का वाढवायचं?? उलट त्यांच्या नकारात्मकतेला आपल्या सकारात्मक दृष्टीकोनाने, स्वभावाने, जिंदादिलीने, हसतमुखाने उत्तर द्यायचं. आणि फक्त स्वतःवर स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करायचं. स्वतःवर मनसोक्त प्रेम करायचं. आपल्या ऊर्जेची गुंतवणूक स्वतःच्या सुमधुर हास्यासाठी, आनंदासाठी, सुंदर जीवनासाठी करायची. हो ना!…
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Khup chan
Jakhas awesome….