जगावसं वाटेल असं आपल्या सभोवतालचं वातावरण आपण सहज बनवू शकतो.
गीतांजली जगदाळे
(मानसशास्त्र विद्यार्थिनी)
कधी-कधी अशी काही मनस्थिती होऊन जाते की जगावंसं च वाटत नाही, अगदी जगण्याची इच्छाच मेल्यासारखी वाटते, असं का होत असावं? आणि बघायला गेलं तर हे प्रमाण पूर्वी इतक्या प्रमाणात कधीच नव्हतं. अधून मधून येणारा उदासीनपणा हा दिवसेंदिवस वाढत चाललेला जाणवतो. त्याला कारणीभूत खूप गोष्टी आहेत.
तंत्रज्ञानाने खूप गोष्टी जलद गतीने शक्य होऊ लागल्या. दळण-वळणाच्या साधनांपासून ते दिवसभरात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीत जलदपणा आला. आणि वस्तूंसोबतच माणसाचं आयुष्य देखील खूप जलद गतीने धावायला लागलं. प्रत्येक गोष्टीचे ज्या प्रमाणे फायदे आणि तोटे असतात, ज्याप्रमाणे नाण्याच्या दोन बाजू असतात त्याचप्रमाणे मानवी जीवन सुखमय बनवणाऱ्या या तंत्रज्ञानाच्या देखील दोन बाजू आहेत हे आपण कधी लक्षातच घेतलं नाही.
एका ठराविक लिमिट च्या बाहेर गेल्यास उपयोगी पडणाऱ्या गोष्टीदेखील अपव्यय देऊ लागतात, नुकसान करू लागतात. त्याचप्रमाणे पटकन होणाऱ्या , जलद गतीने सगळीच कामे होणाऱ्या या सवयीने आपल्या धीर धरण्याच्या क्षमतेवर खोलवर परिणाम झाला. आणि जगावंसं न वाटणाऱ्या किंवा टेन्शन लवकर येणाऱ्या लोकांमध्ये याचा अभाव दिसून येतो.
जगावंसं न वाटणाऱ्या लोकांमध्ये फक्त तेच लोक नसतात ज्यांना खूप मोठे प्रॉब्लेम्स असतात किंवा खरंच अशी परिस्थिती असते की जगणंच खूप अवघड झालेलं असत, यामध्ये अशीही लोक आढळतात की ज्यांच्याकडे पैसे आहेत,जवळची माणसे आहेत, आणि आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट आहे आणि तरी देखील त्यांना जगावंसं वाटत नाही. आणि ही गोष्ट खरंच खूप धक्कादायक आहे!
प्रत्येकाचं आयुष्य, त्यातले प्रॉब्लेम्स हे खूप भिन्न प्रकारचे आहेत. पण तरी देखील काही गोष्टी आपण सर्वजण अशा करू शकतो ज्याने आपली जगण्याची इच्छा नेहमी जागरूक राहील, आणि जगण्यामध्ये, त्याचा आनंद घेण्यामध्ये आपण हरवून जाऊ आणि जगण्याचा आनंद लुटू.
आपल्यात खूप माणसं अशी असतात ज्यांना त्यांची ध्येय पूर्णपणे स्पष्ट असतात.
आणि त्यांचा ते शेवटपर्यंत पाठलाग करत राहतात जोपर्यंत ती पूर्ण होत नाहीत. पण काही लोकांना आपली ध्येय काय आहेत हेच कळत नाही आणि त्यामुळे त्यांचं संपूर्ण आयुष्य हे confusion मधेच निघून जात. ‘ध्येय’ ही गोष्ट अशी आहे जी माणसाला कायम जगण्याची उम्मेद देत राहते, आणि जिच्यामुळे जगण्यात ही एक रोमांच वाटत राहतो. त्यामुळे प्रत्येकाने आपलं ध्येय काय आहे याचा विचार नक्की करावा. जगावंसं न वाटणाऱ्या लोकांमध्ये ही एक कमी सुद्धा भासते.
स्वतःसाठी खूप जण जगताना दिसतात. पण ज्यांना जगावंसं वाटत नाही अशा लोकांनी एक-दोनदा का होईना जमेल तशी गरजू लोकांना मदत करून पाहावी. इतर कोणासाठी तरी जागून पाहावं. कारण कधी कधी आपल्याला आवडत असणाऱ्या गोष्टींतून देखील जो आनंद, जे समाधान मिळत नाही ते दुसऱ्याला केलेल्या मदतीने, त्याच्या चेहऱ्यावरच्या आनंदाने आपल्याला मिळून जात. आणि ही गोष्ट आपल्याला जगण्याची प्रेरणा देऊन जाते.
आपल्याला जगावंसं का वाटत नाही याचा खोलवर विचार केला गेला पाहिजे. ‘जगावंसं वाटत नाही’ हा प्रॉब्लेम आहे , त्याच सोल्युशन काढणं गरजेचं आणि महत्वाचं आहे. त्यामुळे ती काय कारण आहेत ज्यामुळे असं वाटत, हा विचार करून त्या कारणांना मुळापासून कसं खोडून काढता येईल हे आपण पाहू शकतो. आपल्या आजूबाजूच्या माणसांबद्दल चांगला विचार करणे, लोकांची मदत करणे, निसर्गासाठी काहीतरी करणे (झाडे लावणे, त्यांची काळजी घेणे, प्राणिमात्रांवर प्रेम करणे इत्यादी) अशी बरीच कामे करून आपण आपल्या सभोवतालचं वातावरण बदलून टाकू शकतो.
आणि तसं बघायला गेलं तर या गोष्टी फार अवघड ही नसतात. आणि गरजुंना मदत करायची झाल्यास ती फक्त आर्थिक रुपातच मदत नसते, तुम्ही ज्येष्ठ नागरिकांसोबत वेळ घालवू शकता, त्यांच्याशी गप्पा मारू शकता, लहानमुलांमध्ये रमू शकता, त्यांचे विचार जाणून घेऊ शकता. ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यातील अनुभव , लहानमुलांमधला निरागसपणा आणि फारसं कळत नसून देखील असणारे, आपल्या मोठ्यांना सुद्धा लाजवतील असे चांगले विचार या गोष्टींनी जे मानसिक वातावरण तयार होईल आणि त्याने जी जगण्याची उम्मेद मिळेल, प्रेरणा मिळेल ती कधीच तुम्हाला ‘जगावंसं वाटत नाही’ अशी भावना पुन्हा येऊच देणार नाही.
‘जगावंसं वाटत नाही’ या भावनेमध्ये खरंतर खूप काही दडलेलं असत. यामध्ये फक्त इतर लोकांबाबत वाटणाऱ्या तक्रारी किंवा दुःखच शामिल नसतात तर, स्वतःबाबतीतल्या निराशा आणि अपेक्षाभंग देखील असतात. मुळातच आपण आपल्या आयुष्यात स्वतःला इतके केंद्रस्थानी मानत असतो की जस काही हे संपूर्ण जग आपल्याभोवती फिरत असत असा आपला attitude असतो. पण जेव्हा गोष्टी खूप बिघडतात,
सावरण्यापलीकडे जातात, किंवा आयुष्यातली मजा, रोमांच नाहीसा होऊन जातो तेव्हा जगण्याची उम्मेद च मावळून जाते. अशावेळी स्वतःतून डोकं बाहेर काढून थोडं लक्ष इतर माणसांकडे दिले असता आणि अशा लोकांसोबत वेळ घालवला असता खूप प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळून जातात आणि त्याचबरोबर खूप सारे मूल्यवान अनुभव मिळतात जे आपल्याला आयुष्य मनमुरादपणे कसं जगता येईल हे ही शिकवून जातात!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


So nice
Khup chan .I really want to live like others who are happily live their life.Money is temporary thing of life .Only connected people’s are real life love animals helping others is real happiness