“जगण्यासाठी नेमकं काय लागतं? पूर्ण लेख नक्की वाचा.”
मधुश्री देशपांडे गानू
“जीवन गाणे गातच रहावे… जीवन गाणे.
झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे….
जीवन अमूल्य आणि सुंदर आहे. संपूर्ण भरभरून जगण्यासाठी खरं तर एक आयुष्यही कमीच आहे. कारण आयुष्य छोटं आहे. जेवढं आहे ते तरी भरभरून आनंदाने जगता यावं यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील असायला हवंच ना! कोणाच्यातरी सिद्धांतावरून, कोणाच्यातरी जगण्याच्या फुटपट्टी वरून आपलं जगणं ठरवू नये. आपलं मन आणि आपला आतला आवाज हीच आपली खरी ताकद असते. आपल्याला आपल्या जगण्यासाठी नेमकं काय लागतं हे फक्त आपल्यालाच माहित असतं. हो ना!
जगण्यासाठी नेमकं काय लागतं? अन्न, पाणी, निवारा, कपडालत्ता, पैसे आणि आता वायफाय. जगता येतं की एवढं असलं तर! पण एक माणूस म्हणून खरंच एवढं पुरेसं आहे?? नाही ना! छान जगायला खूप काही लागतं हो.. मुख्य म्हणजे आपल्यावर निरपेक्ष, जीवापाड प्रेम करणारी माणसं लागतात. भक्कम साथ लागते या माणसांची. तरच आपण प्रत्येक चांगल्या-वाईट दिवसाला ताकदीने सामोरे जातो. खरं ना!
पैसा, बँक बॅलन्स, हक्काचं घर, गाडी, सुखाची परिसीमा असलेल्या वस्तू हेही आज जगण्याचा अविभाज्य घटक आहेत. पण तरीही गडगंज श्रीमंत माणसांना दुःख, शारीरिक-मानसिक वेदना असतातच. कारण सगळं असूनही एका मर्यादेनंतर प्रत्येक व्यक्ती एकटी असते. प्रत्येकाचा स्वतःचा असा प्रवास असतो. चांगल्या वाईट घटनांना सामोरं जावंच लागतं. पण प्रत्येक भल्याबुऱ्या दिवसातून काय उत्तम घ्यायचं ते आपण ठरवू शकतो.
शेवटी जीवन एकदाच मिळतं. घडणाऱ्या घटनांवर, प्रसंगांवर, माणसांच्या स्वभावावर आपलं नियंत्रण असू शकत नाही. पण त्याकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन आपण बदलू शकतो. लवचिक विचारसरणी आणि दृष्टिकोन ठेवून आपण आपल्या आयुष्याला मनासारखा आकार देऊ शकतो.
एक माणूस म्हणून जगण्यासाठी नेमकं आपल्याला काय हवंय हे माहीत असणं जास्त महत्त्वाचं आहे. स्वतःचा आनंद, समाधान आणि मन:शांती ही आदर्श जीवन जगण्यासाठी अत्यावश्यक आहे, असा मला प्रकर्षाने वाटतं. खरंतर अगदी आखीव-रेखीव, आदर्श जीवन कोणाचंच नसतं. पण त्यातूनही अत्यंत सकारात्मक आणि वास्तववादी दृष्टिकोन ठेवून आपण जीवनाला आकार देऊ शकतो.
नकारात्मक घटना घडणार. नकारात्मक विचार येणार. दुःखीकष्टी होणारच. निराश उदास वाटणारच. पण या भावनांमध्ये अडकून न राहता सकारात्मकतेने पुढे जाणं म्हणजेच जीवन होय..
स्वतःचं जीवन जगण्यासाठी आपण नेमकं काय करू शकतो ते पाहू.
१) ” ऐ जिंदगी, तेरी हर अदा से बेहद प्यार है मुझे! ” ही माझीच ओळ आहे.
“या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.” कविवर्य मंगेश पाडगावकरांनी काय सुंदर लिहून ठेवलंय. या जीवनावर, स्वतःवर निस्सीम प्रेम करा.
२) उगवणारा प्रत्येक दिवस नवा आहे. त्याला नव्या उत्साहाने सामोरे जा. “रात गयी बात गयी.” गेल्या दिवसांचं ओझं बाळगू नका.
३) स्वतःला आहात तसे स्वीकारा. कोणाच्या सांगण्याने, मताने तुम्हीं जसे नाही आहात तसे बनण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःची कोणाशीही तुलना करू नका.
४) आपण सतत “complaint mode” मध्ये असतो. सतत तक्रारी, दुःख उगाळत असतो. सतत कोणाला तरी नावं ठेवत असतो. सतत कोणाचातरी मत्सर करत असतो. या ऐवजी स्वतःचे छोटे छोटे आनंद शोधा. तुमच्या आनंदाबद्दल, तुमच्या छोट्या-छोट्या यशाबद्दल भरभरून बोलायची सवय लावून घ्या.
५) स्वावलंबी बना. कुणीतरी माझ्यासाठी हे करेल, ते करेल अशी वाट बघणं सोडून द्या. स्वतःच्या आनंदाची बाग स्वतः फुलवा. लोकांच्या बागेतून फुले तोडून आणू नका.
६) जे तुम्हीं बदलू शकत नाही त्याचा विचार करून दुःखी, निराश होणे सोडून द्या. तुम्ही काय करू शकता यावर लक्ष केंद्रित करा.
७) मला काय हवंय? हे नेमकं माहीत असणं गरजेचं आहेच. पण मी ते कसं करू शकतो/ शकते यासाठी प्रयत्न करा.
८) स्वतःची सर्वांगीण प्रगती सातत्याने होईल याकडे लक्ष द्या. नवनवीन गोष्टी शिका. आत्मविश्वास ठाम ठेवा.
९) स्वत्वाची जाणीव होणे गरजेचे आहे. स्वतःबद्दल अवास्तव अपेक्षा नकोत. स्वयंशिस्त हवी.
१०) तुमची प्रेमाची माणसं ज्यांच्यावर तुमचं जीवापाड निस्सीम प्रेम आहे त्यांना जपा. ती कायमची दुरावतील असं वागू नका. वेळप्रसंगी क्षमा करा, क्षमा मागा.
११) अशी नाती जपा, जी तुम्हांला माणूस म्हणून श्रीमंत, प्रगल्भ करतील. त्रासदायक नात्यातून लवकरात लवकर शांतपणे बाहेर पडा.
१२) तुम्हीं तुमच्या नोकरी व्यवसायात व्यग्र असलात तरीही कुटुंबासाठी वेळ काढा. सहल, चित्रपट, सहभोजन, खेळ अशा मनोरंजनाने तुम्हीं नव्या उत्साहाने कामाला लागता.
१३) दिवसातून एकदा तरी खळखळून हसा.
जीवन आनंदाने जगायला ज्या नेमक्या गोष्टी लागतात त्यांना पैसे पडत नाहीत. मुक्त उधाण वारा, पक्षांची किलबिल, निसर्गाची उधळण, प्रेमाची माणसं, सच्चे मित्र मैत्रिणी, मुक्त हास्य, निर्मळ मन, शारीरिक-मानसिक आरोग्य हे सगळं आपण आपल्या कृतीने, विचारांनी मिळवू शकतो. यासाठी प्रयत्नशील राहा. आणि नुसतं नेमकं जीवन नाही, तर हे अमूल्य जीवन आनंदी, समाधानी, भरभरून जगण्यासाठी स्वतःला सर्वार्थाने घडवा…..
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



खूप सुंदर लेखन🙏