Skip to content

“जगण्याची गम्मत म्हणजेच जे मनापासून हवं होतं, ते आज दुसरा व्यक्ती जगतोयं.,

“जगण्याची गम्मत म्हणजेच जे मनापासून हवं होतं, ते आज दुसरा व्यक्ती जगतोयं..


मधुश्री देशपांडे गानू


“जिंदगी कैसी है पहेली.. हाय..

कभी ये हंसाये, कभी ये रुलाये..

कभी देखो मन नही जागे,

पीछे पीछे सपनों के भागे…”

माणसाला आयुष्य आनंदाने जगण्यासाठी, जगण्याची उर्मी असण्यासाठी अनेक कारणे, गोष्टी, माणसं लागतात. प्रत्येकालाच प्रत्येक क्षण स्वतःच्या मनाप्रमाणे, इच्छेप्रमाणे जगायचं असतं, अगदी भरभरून. पण खरंच हे जीवन एक कोडं आहे ना! कधी कोणती कोडी घालेल आणि ती आपल्याला सोडवता येतीलच हे सांगता येत नाही. सगळ्यांनाच मनासारखं नाहीच जगता येत. खूप मनापासून हवं असलेलं काही क्षणांत निसटून जातं कायमचं किंवा कोणी दुसराच आपल्याला हवं तसं आयुष्य जगताना दिसतो. आपल्याला हव्या असलेल्या माणसाबरोबर. हीच तर आयुष्याची गंमत ( irony) आहे.

जे मनापासून हवं असतं अगदी भौतिक सुख असू दे किंवा प्रेमाचं माणूस. जर नाही मिळालं तर अत्यंत दुःख होतं. मनाला यातना होतात. मन सैरभैर होतं. हताश, निराश वाटू लागतं. यातून बाहेर कसं पडावं कळत नाही. प्रत्येकाला अशा प्रसंगांतून जावं लागतं. प्रत्येकाच्या सुखाच्या, आनंदाच्या व्याख्या, अपेक्षा वेगळ्या असतात. त्यानुसार घडलं नाही तर अपेक्षाभंगाचे दुःख पदरी येतंच. असं असूनही आपण पुढे जात राहतो. कारण हीच जीवन जगण्याची कला आहे.

अगदी सर्वसामान्य सोप्पं उदाहरण घेऊ. अगदी कोणत्याही वयात नकळत्या किंवा कळत्या, माणूस एकदा तरी प्रेमात पडतोच. पौगंडावस्थेतील शारीरिक आकर्षण म्हणा किंवा प्रगल्भ प्रेम म्हणा. आपण त्या स्वप्नवत दुनियेत वावरत असतो. भविष्यात एकत्र असण्याची स्वप्नं बघतो. पण काही कारणांनी बहुतेक वेळा हे सत्यात उतरत नाहीच. अशावेळी मनापासून हवं असणारं माणूस आपल्या आयुष्यातून निघून जातं. अत्यंत दुःखदायक असतं हे. आपलं प्रेमाचं माणूस दुसऱ्या कोणा  व्यक्तीचं होतं कायमचं. हे सहन करणं कठीण असतं. तरीही आपण सावरून, त्यावर मात करून पुढे जात राहतो. आपलं आयुष्य जमेल तेवढे व्यवस्थित पार पाडत राहतो. पण मनात कुठेतरी हा सल असतोच.

कायम खूपदा आपण आपल्या यशस्वी जीवनाचे स्वप्न पाहिलेलं असतं. नोकरी व्यवसायात बढती, सुबत्ता, आर्थिक पातळीवर यश, स्थैर्य, श्रीमंती सगळं हवं असतं. श्रीमंती थाटामाटात जगणे हे तर प्रत्येकाचं स्वप्न असत. असायलाच हवं. पण त्यासाठी लागणारे कष्ट, मेहनत, परिस्थिती, वास्तव, क्षमता, कुवत आणि नशीब काहीतरी कमी पडतं. आणि मनासारखं नाही जगता येत. आपल्या डोळ्यासमोर काही आदर्श असतात किंवा आपण सतत स्वतःची कोणाशी तरी तुलना करत असतो.

मग “मला मनापासून जे हवं होतं ते अमका मात्र छान जगतोयं” असं वाटून आपण निराश, दु:खी होतो. साधारणपणे स्त्रीया अशी तुलना करताना दिसतातच. साड्या, दागिने, गाडी, फर्निचर, सौंदर्य सगळ्यांमध्ये त्या कोणाशी तरी सतत स्वतःची तुलना करत असतात. आणि “तिच्याकडे आहे, माझ्याकडे नाही” म्हणून दुःखी होतात. मग मत्सर, असूया, चिडचिड करणे ओघाने आलेच.

एक सामान्य माणूस म्हणून आपल्या मनासारखं दुसऱ्यालाच जगताना पाहून सहज दुःख होतं. पण किती काळ हे दुःख वाटून घेणार तुम्ही?? ठीक आहे, तुम्हांला जे मनापासून हवं होतं ते दुसरा व्यक्ती जगतोय. मग?? तुम्हांला हे दुःखदायक, त्रासदायक आहे. तुमचं काय नियंत्रण आहे या परिस्थितीवर?? नाही ना! मग ज्या गोष्टींवर, परिस्थितीवर ,व्यक्तीवर तुमचं नियंत्रणच नाही त्यामुळे तुम्ही किती आणि का दुःखी व्हायचं??

आयुष्यात खरंच कशाला महत्व द्यायचं, हे जाणून घ्या. शांतपणे साधक-बाधक विचार करा. भौतिक सुखं कितीही असली तरी समाधान, शांती देत नाहीत. आज तुम्ही विकत घेतलेला स्मार्टफोन उद्या शिळा होतो. कारण बाजारात अधिक जास्त स्मार्टफोन आलेला असतो. आणखी हवं, आणखी हवं हे कधीच संपत नाही. खरं म्हणजे आपलं कुटुंब, आपली प्रेमाची माणसं, खरे मित्र-मैत्रिणी, प्रेम, समाधान, मन:शांती, आपुलकीचे, कौतुकाचे दोन शब्द हे मनापासून हवं असतं आपल्याला आणि याला तर काहीच किंमत मोजावी लागत नाही.

माझ्यासाठी माझ्या आयुष्यात काय महत्त्वाचं आहे हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे.

अशा परिस्थितीत काय करावं ते पाहू १) काय मिळालं नाही यापेक्षा काय आहे यावर लक्ष केंद्रित करा.

२) जे मिळालं नाही त्यावर अतीविचार करून ऊर्जा वाया घालवू नका.

३) भूतकाळात जे हवं होतं आणि मिळालंय अशा गोष्टींची यादी तयार करा.

४) आता या क्षणी तुमच्याजवळ, तुमच्या आसपास काय आहे, कोण आहे हे महत्त्वाचं आहे.

५) जे तुमच्याकडे आहे त्याबद्दल नक्कीच कृतज्ञता बाळगा.

६) तुमच्या जवळ जे आहे वस्तू, माणसं त्यांच्याबरोबर जास्त वेळ घालवा.

७) जी भौतिक सुखं तुम्हांला आज मिळाली नाहीत त्याबद्दल दुःख करण्यापेक्षा आज माझे पैसे वाचले असा विचार करा.

८) खरंच वास्तवात शक्य आहे अशा नवीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करा.

९) आवडत्या छंदांमध्ये, खेळात मन रमवा. व्यायाम, फिरणं, मित्र-मैत्रिणींबरोबर वेळ घालवा. गप्पा मारा.

१०) “प्लॅन ए” यशस्वी नाही झाला तर “प्लॅन बी” तयार करा. प्रयत्न करत रहा. थांबू नका. निराश होऊ नका.

११) स्वतःची, स्वतःच्या जीवनमानाची, स्वतःच्या प्रेमाच्या माणसांची कधीही कोणाशीही तुलना करू नका.

प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे नेहमी सांगतात,” Here And Now ” हेच फक्त महत्वाचं आहे. आत्ताचा हा क्षण माझा आहे. महत्त्वाचा आहे. आत्ता माझ्याजवळ काय आहे यावरच लक्ष केंद्रित करा. आत्ता माझ्या जवळ जे आहे, माझी प्रेमाची माणसं यांच्याबरोबर आत्ताचा क्षण आनंदाने, प्रेमाने भरभरून जगणं हीच आयुष्याची खरी गंमत आहे.. हो ना!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on ““जगण्याची गम्मत म्हणजेच जे मनापासून हवं होतं, ते आज दुसरा व्यक्ती जगतोयं.,”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!