“छत्तीस गुण जुळूनही जोडप्यांमध्ये भांडणे का होतात??”
मधुश्री देशपांडे गानू
“जन्म, लग्न आणि मृत्यू हे कोणाच्याही हातात नसतात.” “लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात.” अशा लग्नासंबंधी अनेक म्हणी आपल्याला परिचित आहेत. पूर्वीच्या काळी लहान वयातच लग्न होत असत आणि एकत्र कुटुंब पद्धतीत तडजोडीची सवय असल्याने संसारही निभावले जात. पण आता सगळे चित्र बदललेलं आहे. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये “लग्न” या कार्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
जरा मुलगा किंवा मुलगी विशी, पंचविशी कडे झुकू लागली की सगळ्या कुटुंबाला, घरादाराला, शेजारी-पाजारी यांना त्यांच्या लग्नाचे वेध लागतात. आणि सगळे अति उत्साहात (जरा जास्तच) लग्न लावण्याच्या मागे लागतात. पत्रिका मिलन हा लग्न जुळवण्यासाठी महत्त्वाचा टप्पा. मुळात ज्योतिष हे शास्त्र आहे. ते शंभर टक्के अचूक नाही. आडाखे बांधलेले असतात. अगदी छातीठोकपणे ज्योतिषी “छत्तीस गुण जुळतात हो! अगदी उत्तम संसार करतील.” असं सांगतात. पण हे तंतोतंत खरं असतं का?
मुळात माझा वैयक्तिक ज्योतिषशास्त्रावर विश्वास नाही. त्यामुळे या विषयावर मी बोलणे उचित नाही. कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. ज्या घटना आपल्या आयुष्यात घडणार आहेत त्या घडतातच. चांगल्या किंवा वाईट घटनांना तुम्ही कसे सामोरे जाता याचे अनेक मार्ग आहेत.
अगदी कधीही पत्रिका न बघितलेली आणि उत्तम सौख्याचा संसार करणारी जोडपी ही मी माझ्या कुटुंबातच पाहिली आहेत. आणि उत्तम पत्रिका जुळूनही लग्न केलेली जोडपी अत्यंत वाईट पद्धतीने घटस्फोट घेतानाही पाहिली आहेत. त्यामुळे सुखी संसारासाठी पत्रिका, 36 गुण जुळणे गरजेचं आहे असं मला तरी वाटत नाही. यासाठी त्या दोन व्यक्तींचे स्वभाव आणि मन जुळणं जास्त गरजेचे आहे.
मुळात आपल्याकडे लग्न ठरवणे याचे ठोकताळेच चुकीचे आहेत. मुलगी वयात आली लग्न करून द्या.. आमच्या डोक्यावरची एक जबाबदारी कमी होईल. मुलगा वाया गेला, नोकरी धंदा करत नाही, व्यसनाधीन आहे, गुंड आहे.. लग्न करून द्या म्हणजे सुधारेल. अरे! तुमचा मुलगा नीट वागत नाही तर त्यासाठी दुसऱ्या कोणाच्या मुलीचा बळी द्यायचा? कसा सुखाचा संसार होणार तिचा? तिचं आयुष्य उध्वस्त करायचा तुम्हाला काय अधिकार आहे?
समाजात प्रतिष्ठा, पत आहे, पैसा आहे मग लग्न करा. ज्या गोष्टी लग्न टिकण्यासाठी गरजेच्या आहेत त्याकडे लक्षच दिले जात नाही. साधी वीस रुपयाची कोथिंबीर खरेदी करताना आपण नीट पारखून घेतो. पण लग्नासाठी मात्र कोणतीही अनोळखी व्यक्ती लगेच चालते आपल्याला.
लग्न यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही कुटुंबांची वैद्यकीय पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे. रक्तगट, शिक्षण, करियर एकमेकांच्या महत्वाकांक्षा, भविष्यातील स्वप्ने, एकमेकांची आवड निवड याबद्दल मोकळेपणाने बोलले गेले पाहिजे. जोडीदाराकडून काय अपेक्षा आहेत? लग्नासाठी मानसिक तयारी आहे का? हे लक्षात घेणे खूप गरजेचे आहे.
आज अनेक लग्न केवळ आई-वडील, नातेवाईक यांच्या दबावामुळे केली जातात. काहीवेळा एकमेकांना मनापासून पसंत नसतानाही लग्न लावली जातात. “गरिबाघरची मुलगी आणली की ती उत्तम संसार करेल.” हा आणखी एक गैरसमज. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. तिला असे ढोबळ नियम लावून कसं चालेल?
लग्न हे दोन शरीर-मनांचं मीलन असतं. आणि ते आयुष्यभर निभवायचं असतं. नुसतं लग्न करण्याने दोघांचेही आयुष्य कायमस्वरूपी बदलून जातं. जबाबदाऱ्या वाढतात आणि त्या वाढतच जातात. यासाठी दोघेही प्रथम एकमेकांना आवडायला हवेत. आणि या सगळ्यासाठी त्या दोघांची शारीरिक, मानसिक तयारी हवी. आता लव मॅरेज ही सर्रास होतात. पण लग्न कोणत्याही पद्धतीने झालं तरीही तास दोन तास एकमेकांना भेटून गोड बोलणं वेगळं.
आणि 24 तास आयुष्यभरासाठी एकमेकांसोबत राहणं वेगळं. यामध्ये एकमेकांसोबत कायमस्वरूपी राहताना प्रचंड अपेक्षाभंग होऊ शकतो आणि भांडणं होतात. लग्न आणि संसार यशस्वी करायचा असेल तर मनापासून एकमेकांवर प्रेम हवं. लग्नामुळे नवीन व्यक्तीशी नाही तर संपूर्ण नवीन कुटुंबाशी नातं जोडलं जातं.
ही नवीन नाती स्वीकारायची, जबाबदारी घ्यायची मनाची तयारी हवी. नवरा-बायको या नात्यात प्रेम, विश्वास, एकमेकांचा आदर, एकमेकांच्या कुटुंबीयांचा योग्य मान, आदर, एकमेकांच्या मतांचा आदर, जोडीदाराचा गुणदोषांसहित स्वीकार, मनमोकळा संवाद, एकमेकांच्या आवडी-निवडी यांची जपणूक आणि जरी वाद झाले तर मोकळेपणाने बोलून ते मिटवणे या आणि अशा अनेक गोष्टी येतात.
नवरा-बायको या नात्याची शारीरिक आणि मानसिक, भावनिक गरज असते तीही एकमेकांनी जपत पूर्ण करायला हवी. नाहीतर भांडणाचं मूळ या असमाधानातच , अपूर्णतेतच असू शकतं. नवरा-बायको असले तरीही प्रत्येक नात्याला मर्यादा असते याची जाणीव घेत जोडीदाराची स्पेस जपली पाहिजे. मनमोकळे वागू दिलं पाहिजे. सुखात आणि दुःखात ही खंबीर साथ हवी. काही झालं तरी “मी आहे ना” ही जाणीव प्रकर्षाने हवी. माझं हक्काचं माणूस माझ्या बरोबर आहे ही भावना दोन्हीकडे हवी. तर आणि तरच लग्न आणि नवरा बायकोचं नातं यशस्वी, सुखाचं, आनंदाचं होऊ शकतं मग त्यासाठी छत्तीस गुण नाही जुळले तरी चालतील.
आजच्या स्पर्धेच्या जगात दोघेही उच्चशिक्षित असतात. शिक्षण आणि करियर याला जास्त महत्त्व असल्याने लग्नाचे सरासरी वय पुढे गेले आहे. त्यामुळे मुलगा असो वा मुलगी यांची स्वतःची अशी ठाम मतं तयार झालेली असतात. आर्थिक दृष्ट्या सक्षम असतात. बहुतेक वेळा एकुलती एक असतात. त्यामुळे तडजोडीची तयारी नसते. अहंकार, मीपणा असतोच. “मीच का पडतं घ्यायचं?” ही भूमिका असते. भौतिक सुखांच्या अतिरेकाने ही एखादी गोष्ट घरात नसेल तर भांडणं होऊ शकतात.
मुळात “मीच बरोबर, माझं काहीच चुकत नाही.” हा हेका भांडणाचं मूळ असतो. समजूतदारपणा, तडजोडीचे धोरण, संयम, समोरच्याचे नीट ऐकून घेणे, सारासार विचार, विवेक, आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा स्वीकार या सगळ्यांचीच वानवा असेल तर नवरा-बायकोचं नातं विस्कळीत होतं. मग सारखी भांडणं व्हायला कोणतेही क्षुल्लक कारणही पुरतं. आणि भांडणं विकोपाला जाऊ शकतात. लग्नापूर्वी घेतलेली वचने, अपेक्षा लग्नानंतर पूर्ण होताना दिसत नाहीत मग भांडण होतात. काहीवेळा नवऱ्याच्या किंवा बायकोच्या कुटुंबियांशी पटत नाही.
यावरून तर सगळ्यात जास्त भांडणं होत असतील. मला वाटतं सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे तुम्ही नवरा-बायको होण्याआधी तुमची जी काही नाती होती ती अबाधित राहायला हवी. नवीन नातं जोडताना आधीची नाती कशी तुटतील? एकमेकांच्या कुटुंबियांचा स्वीकार, आदर राखायला हवा. याला सासू सासरे ,कुटुंबीयही जबाबदार आहेत. दोघांच्याही आई-वडिलांची अति लुडबुड ही भांडणाचं कारण असू शकते. नवीन आलेल्या सुनेला/ जावयाला तुम्ही प्रेम दिलेत तर तेही प्रेम देतील. तुमची जबाबदारी आधी आहे.
कधीही आयुष्यात पत्रिका न पाहिलेली जोडपी अत्यंत सुखाने, समाधानाने प्रदीर्घ संसार करताना दिसतात ती त्यांच्यातील स्वभावामुळे, वागण्यातील लवचिकतेमुळे आणि एकमेकांवरील प्रेमामुळे. त्यामुळे लग्न ठरवताना व्यक्ती “माणूस” म्हणून कशी आहे हे आधी समजून घ्या. तेवढा वेळ एकमेकांना द्या. फक्त पैशाच्या पॅकेज कडे बघू नका. संपूर्ण मानसिक, भावनिक तयारी असेल, सगळ्या जबाबदाऱ्या पेलण्याची तयारी असेल तरच लग्न करा.
नाहीतर आज बहुसंख्य संसार केवळ घटस्फोटाचा निर्णय घेता येत नाही म्हणून, लोक काय म्हणतील? म्हणून, मुलांना त्रास नको म्हणून सुरू आहेत. यशस्वी, आनंदी, सौख्याचा संसार करण्यासाठी पत्रिका नाही तर माणसांचा स्वभाव आणि मन जुळायला हवं.. बरोबर ना!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



dhawaleramkrushna@gmail.com
खुप छान माहिती दिली आहे.नात्याची जपवनुक कशी करावी हे सांगितले आहे.
शेवटचा प्यारेग्राफ 99.9% आपल्या समाजाला लागू पडतो. सर्व लेख तारतम्याने सुंदर मांडलात. आभारी.
अगदी खरंय मॅडम , एकदम सत्य आणि वास्तव लिहिलतं ,आजही काही कुटुंबांमध्ये वडीलधारी मंडळी आपला शब्द पाळला जावा म्हणून आग्रही असते . काही मुले-मुली दबावाखाली जोडीदार मनासारखा नसताना लग्नाला होकार देतात आणि त्यांच्या मर्जी खातर आयुष्याचं मातेरे करतात.
खरचं खूप मार्मिक आणि वास्तव लेख .👍🙏