Skip to content

चेहऱ्यावरच तेज हे आपल्या अंतःकरणातल्या विचारांवर अवलंबून असत.

चेहऱ्यावरच तेज हे आपल्या अंतःकरणातल्या विचारांवर अवलंबून असत.


गीतांजली जगदाळे


आपण काय खातो याचा जसा आपल्या शरीरावर आणि मनावर परिणाम होतो त्याचप्रमाणे आपण काय विचार करतो याचा ही आपल्या शरीरावर परिणाम झालेला दिसून येतो. मनात इतरांविषयी प्रेम असले की चेहरा सात्विक दिसतो, मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो, आणि मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो, मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात.

सुंदर दिसायला कोणाला आवडत नाही? आणि सुंदर दिसण्यासाठी आपण काय-काय करत नाही? पण हीच सुंदरता आपल्याला विचारांनी मिळाली तर? बाह्य शरीरावर फार मेकअप, सुंदर कपडे न घालताही साधे राहून सुद्धा आपण सुंदर, ताजेतवाने, आणि इतरांपेक्षा उठून दिसलो तर, काय मजा येईल ना ! बाह्यरूप छान दिसण्यासाठी आपण इतके कष्ट घेतो, पैसे खर्च करतो पण तेच छान दिसणं आपल्याला फक्त आपले विचार स्वच्छ, मनमोकळे आणि चांगले ठेवून मिळणार असेल तर अजून काय पाहिजे?

थोडे कष्ट आपल्या विचारांवर केले तर चांगले विचार येणं, करणं आणि त्याप्रमाणे कृती होणं हे ही आपोमतच होऊन जाईल. पण ते होण्यासाठी चांगले विचार आधी जाणून बुजून आपल्याला करावे लागतील त्यासाठी चांगल्या गोष्टींचं वाचन, मनन, चिंतन केल्यास ते येणं अधिकच सोप्प होऊन जाईल.

मग एकदा का मनाला एका ठराविक पद्धतीने विचार करायची सवय झाली की मग मात्र फार कष्ट घ्यावे लागत नाहीत, पण तरीही लक्ष मात्र नेहमी ठेवावं लागत. अंतःकरणात असणारे विचार, हेतू, दृष्टिकोन हे फार काळ, किंवा नेहमीच आपल्या लपवता येणं शक्य नसत. आयुष्यात प्रत्येक क्षणी आपण चांगलेच विचार करू असं ही होत नाही पण तरीही जेव्हा जेव्हा लक्षात येईल तेव्हा तेव्हा मनाला योग्य दिशा दाखवल्यास नक्कीच मदत होईल.

आजपर्यंत सकारात्मक विचार करा, आयुष्यात आशावादी रहा असं आपण कितीतरी वेळा ऐकत आलो. सकारात्मक राहण्याने, चांगले विचार करण्याने फक्त आयुष्यच सोप्प आणि मजेशीर होत नाही, तर आपला चेहरा आनंदी, समाधानी दिसून आपल्याला बघून समोरचा माणूस ही प्रसन्न होऊन जातो. म्हणजेच काय तर, आपण प्रसन्न राहण्याने आणि दिसण्याने न कळत आपल्यामुळे कितीतरी व्यक्ती प्रसन्न होतात. अशा व्यक्तींच्या सहवासाने ही मनाला एक तजेला मिळून जातो.

चांगले कपडे, मेकअप यानेच फक्त आपण छान दिसतो का? नाही! याने नक्कीच आपल्या सौंदर्यात भर पडते. पण खरी सुंदरता येते ती आतून. मन प्रसन्न असल्यास चेहरा देखील खुललेला दिसतो. आपण जे-जे आणि जसे-जसे विचार करतो त्याचा आपल्या दिसण्यावर परिणाम होतो.

जस मन आनंदी असल्यास चेहरा टवटवीत दिसतो तसेच मन दुःखी असताना चेहरा कोमेजलेल्या फुलाप्रमाणे दिसतो. त्यामुळे बऱ्याचदा आपण आपल्या भावना लपवायचा प्रयत्न करून ही समोरची व्यक्ती खऱ्या भावना ओळखून जाते. कारण आपण शब्दरूपाने ठीक असल्याचा दावा नक्कीच करू शकतो पण आपले डोळे आणि चेहरा आपल्या मनात असणाऱ्या त्रासाची झलक दाखवून जातात.

आपल्याला निसर्गाकडून मिळालेल्या देणग्या खरंच खूप सुंदर आहेत. पण कुठेतरी आपण त्यांना खूप हलक्यात घेतो. विचार करण्याची शक्ती, चांगलं-वाईट यातला फरक करण्याची शक्ती सगळ्या प्राण्यांत फक्त माणसालाच अवगत आहे. पण त्याचा तरी आपण पुरेपूर आणि योग्य वापर करतोच असं होत नाही.

विचारांमध्ये खरंच एवढी शक्ती असते की अशक्य गोष्टी फक्त विचार करून ही सत्यात उतरलेल्या आहेत अशी बरीच उदाहरणे आपण बघतो. म्हणजे बऱ्याचदा आजूबाजूच्या लोकांना आपण यशस्वी होण्याबद्दल आश्चर्य वाटून जात पण यशस्वी होण्याआधी, ते सगळे कष्ट करण्याआधी ती गोष्ट आपल्या मनात फक्त विचाररूपीच असते. म्हणजे सुरुवात कुठेतरी विचारानेच झालेली असते. बाकीचांनी विचार केलेला नसला तरी तो आपण आपल्यासाठी ठामपणे केलेला असतो आणि त्यामुळे ती गोष्ट पूर्ण ही होताना दिसते.

तुमचा चेहरा हा तुमच्या विचारांचा आरसा असतो. जसे तुमचे विचार तसा तुमचा चेहरा. त्यासाठी माणसाने घडघड बोलले पाहिजे, खळखळून हसले पाहिजे… दिलखुलास विनोद केले पाहिजेत… मनसोक्त रडले पाहिजे…थोडक्यात स्वतःचे व्यक्तिमत्व खुलवले पाहिजे.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

4 thoughts on “चेहऱ्यावरच तेज हे आपल्या अंतःकरणातल्या विचारांवर अवलंबून असत.”

  1. Great . भारी लेख . या विषयाला धरून किंवा विचार या विषयावरील काही पुस्तके सुचवाल का ?

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!