चूक पकडली जातेय असं वाटू लागलं की माणसं विषय बदलतात किंवा भांडतात.
हर्षदा पिंपळे
जन्मापासून ते मृत्युपर्यंत जे आपण जगतो त्याची एका शब्दात व्याख्या करायची झाली तर अनेकदा आपण सहजपणे त्याला ‘आयुष्य’ असं म्हणतो.मग हे आयुष्य जगताना आपण कितीतरी गोष्टी शिकत असतो.जगत असतो, अनुभवत असतो.आयुष्य केवळ एका विशिष्ट गोष्टीभोवती कधीच फिरत नाही. आयुष्य म्हणजे समाज,नाती,करिअर, वादविवाद, यश-अपयश या अनेक गोष्टी येतात.
आणि या सगळ्यामध्ये चूकांचाही समावेश होतो.मनुष्य आहे म्हंटल्यावर चूक तर होणारच. पण एक चूक कितीदा करायची यालाही मर्यादा असाव्यात. अनेकांना याची कणभरही जाणीव नसते.सतत चूकांवर चूका करून त्या चूका न सुधारणारी माणसं आजही या जगात आहेत.खरतरं अशी नाना प्रकारची वृत्ती आपण पाहू शकतो.चूकांवर पांघरूण घालणारी,तीच चूक वारंवार करणारी,चूक कबूल न करणारी /करणारी वगैरे वगैरे. जितक्या बोलाव्या तितक्या कमीच..!
खरचं या चूकांच्या बाबतीत बोलावं तितकं कमीच आहे. पहा अशीही काही लोकं आपल्या आजुबाजूला असतात की जेव्हा चूक पकडली जातेय असं ज्यावेळेस त्यांना वाटतं त्यावेळी ती माणसं एकतर विषय बदलू पहातात नाहीतर मग भांडत बसतात.कधीकधी आपणही यापैकी एक असतो.कशासाठी हे सगळं…? असा मध्येच विषय बदलण्याने चूका बदलणार आहेत का..? त्या लपून राहणार आहेत का…? किंवा भांडणाने त्या चूका टाळल्या जाणार आहेत का…? तर नाही.
आपल्याला वाटत राहतं की असं केलं तर कदाचित चूका लपून राहू शकतात. त्या सहजासहजी बाहेर येऊच शकत नाही. पण असं नसतं.केलेली चूक असो वा चोरी….ती एक ना एक दिवस पकडली जातेच.आणि ते सत्य कुणीही बदलू शकत नाही.प्रत्येकाला केलेल्या चूकांचा पाढा वाचावाच लागतो.स्वतः वाचला नाही तर दुसरे तो वाचून दाखवल्याशिवाय शांत बसत नाही. पहा अशी अनेक उदाहरणं आपल्या अवतीभवती असतात.
आपण परिक्षेच एक उदाहरण पाहूयात…
शाळा किंवा कॉलेजमध्ये आजतागायत कॉपी करणे हा प्रकार चालूच आहे.सर्रासपणे मुलं परिक्षेत कॉप्या करताना आढळतात. खरतरं कॉपी करणं गुन्हाच आहे.आणि एक प्रकारची चूकसुद्धा.
इतका सगळा अट्टहास कशासाठी करायचा…? माणूस आहे म्हंटल्यावर चूका तर होणारच हे जरी खरं असलं तरी त्या चूका कितीदा करायच्या नी कितीदा नाही हेदेखील प्रत्येकाला समजायला हवं.अनावधानाने झालेल्या चूकांच आपण एकवेळ समजू शकतो पण मुद्दाम ,ठरवून करणाऱ्या चूकांच काय…? आणि मूळातच चूक केली किंवा झाली तरी ती मान्य करता यायला हवी.जितक्या सहजतेने आपण चूका करतो तितक्याच सहजतेने त्या मान्य मात्र करत नाही.तर त्या चूका वेळीच मान्य करायला हव्या. स्वतःच्या चूकांची कबुली स्वतःहून दिली पाहिजे. जेणेकरून चूक पकडली जाताना नको ती धडपड करावी लागणार नाही.
आणि अशा चूका लपवून काय साध्य करायच…? मी कधी चूकतच नाही, माझ्या हातून चूका घडतच नाही, की चूका करणं वगैरे माझ्या तत्वातच बसत नाही. नक्की काय..?
अहो इथे असणारा प्रत्येकजण चुकतो आणि चूकांमधूनच तो शिकतो.चूका झाल्याच नाही तर माणसाला कळणारच नाही त्याच कधी- केव्हा- कुठे -काय चुकतंय ते.चूक करताना जितकं धैर्य लागत नाही तितकं धैर्य त्या मान्य करताना लागतं.त्यामुळे ते धैर्य प्रत्येकाने बाळगायला हवं.चूक केली/झाली तर ती कधी ना कधी समोर येणार , ती कधी ना कधी मान्य करावी लागणार हे प्रत्येकाने लक्षात ठेवायलाच हवं.
एकच लक्षात ठेवा..चूका करताना जितक्या कॉन्फिडन्टली चूका करता…तितकाच तोच कॉन्फिडन्स आपल्या चूका मान्य करतानाही दाखवा.चूक पकडली जात असेल तर तसं होऊद्या पण तेव्हा त्यावेळी त्याच चूकांची सारवासारव करायला जाऊ नका.विषय बदलू नका.उगाचच विषय टाळण्यासाठी भांडू नका.त्यापेक्षा प्रामाणिकपणे कबूली द्या.आणि केलेल्या चूकांच ओझं हलकं करून घ्या.कारण केलेल्या चूका मान्य केल्या तर किमान एक तरी चान्स तीच चूक सुधरण्यासाठी आपल्याला मिळू शकतो.अन्यथा चूकांवर चूका करून त्या लपवून चूकांचा भार वाढतच राहील. एक दिवस असा येईल ज्या दिवशी स्वतःचा चेहरा पहायची स्वतःलाच लाज वाटेल. दिवस-रात्र केवळ चूकाच आठवत राहतील. आयुष्य जगणं मुश्कील होऊन जाईल.
So…अशा चूकांमुळे त्या आयुष्याचा बेरंग होऊ देऊ नका.कारण,आयुष्य सुंदर आहे… ते भरभरून जगण्याचा प्रयत्न करा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
