Skip to content

“चुकीच्या विचारसरणीमुळे आयुष्यात प्रॉब्लेम सतत निर्माण होत असतात.”

“चुकीच्या विचारसरणीमुळे आयुष्यात प्रॉब्लेम सतत निर्माण होत असतात.”


मधुश्री देशपांडे गानू


हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये देशमुख कुटुंबीय चिंताक्रांत बसले होते. विनायक रावांना जबरदस्त अटॅक आला होता. प्रकृती चिंताजनक होती. त्यांची पत्नी सुमती, दोन्ही मुलं आकाश आणि साक्षी आणि त्यांचे मोठे बंधू गजानन राव उपस्थित होते.. डॉक्टरांनीही ४८ तास क्रिटिकल आहेत, असं सांगितलं होतं.

बसल्या बसल्या सुमती बाईंच्या डोळ्यासमोरुन त्यांचा जीवनपट उलगडू लागला. अवघ्या एकविसाव्या वर्षी बी. ए. चं शिक्षण पूर्ण झाल्या झाल्या त्यांच्या वडिलांनी विनायक रावांचं स्थळ पसंत करून त्यांचे चार हात करून दिले होते. खरं तर सगळं चांगलं होतं. खाऊन पिऊन सुखी कुटुंब होतं. विनायकरावांची नोकरी चांगली होती. फक्त विनायकरावांचा स्वभाव सोडून.

अत्यंत अहंकारी, पुरुषी वर्चस्व मानणारे, हम करे सो कायदा, शीघ्रकोपी असे होते विनायकराव… स्त्रियांनी फक्त घरात बसून चूल आणि मूल करावं, संसार सांभाळावा, स्वतःची अक्कल वापरू नये अशा ठाम मतांचे ते होते. असा त्यांचा स्वभाव का होता? ते सुमती बाईंना कधीच कळलं नाही. पण त्यांची काही बोलायची टाप नव्हती. ते म्हणतील ती पूर्व दिशा! माहेरचे संस्कार म्हणा किंवा एकूणच स्त्रीवर असलेली सामाजिक बंधने यामुळे आणि त्यांच्यात धाडस नसल्याने त्यांनी निमूट मन मारून पण संसार मार्गी लावला. मुलांचे संगोपन, त्यांचं शिक्षण यातही अंतिम निर्णय विनायक रावांचाच असे. जसजशी मुलं मोठी होऊ लागली तसतसं त्यांचं विनायकरावांशी पटेनासं होऊ लागलं. घरात सतत वाद भांडणं होऊ लागली. कर्तव्य आणि जबाबदारी म्हणून केवळ संसार सुरू होता. कित्येकदा संतापाच्या भरात आणि अहंकारा पायी विनायक रावांनी चुकीचे निर्णय घेतले होते. त्याचा आर्थिक आणि इतरही फटका त्यांना वेळोवेळी बसला होता. पण त्यातून ते काहीच शिकले नव्हते.

मोठ्या आकाशला संगीताची उत्तम जाण आणि आवड असूनही त्याला इंजिनियर व्हावे लागले होते. आणि आता कोणत्याच नोकरीत तो रमत नव्हता. त्याच्या धरसोडपणा मुळे ही घरात सतत वाद भांडणं होत. साक्षीचंही तेच. कुठेही जायला यायला कडक नियम होते. तिला कोणी मैत्रिणी नव्हत्या. तिचं तारुण्यसुलभ पेहराव, नटणे मुरडणे या व्यक्त होण्यावर ही वाद होऊ लागले. एकदा ताण असह्य होऊन साक्षीने आत्महत्येचा प्रयत्न केला. नशीब बलवत्तर म्हणून ती वाचली. पण आत्मविश्वास पूर्ण गमावून बसली. नैराश्यग्रस्त झाली.

सुमती बाईंनी नेटाने उचल खाल्ल्यामुळे निदान तिच्यावर योग्य मानसोपचार होऊ लागले. त्यातही विनायक रावांचा सहभाग शून्य आणि दोषारोपच जास्त होते. अजूनही त्यांना हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्या वागण्यामुळे, आपल्या चुकीच्या विचारसरणीमुळे होत आहेत हे जाणवतच नव्हतं. वास्तवाचं भान नव्हतं. ते स्वतःच्याच गुर्मीत घरातील कर्ता पुरुष हे बिरुद मिरवत होते. साक्षीच्या लग्नासाठी त्यांनी आता जोर लावला होता. तिची पसंती ही विचारात न घेता. आणि परत एकदा घरात विसंवादाचा स्फोट झाला. यातच विनायक रावांना जबरदस्त हार्ट अटॅक आला. आणि आता सगळंच चिंताजनक होतं.

देवाच्या कृपेने म्हणा आणि सुमती बाईंच्या प्रार्थनेने विनायकराव यातून सुखरूप बचावले. हळूहळू प्रकृती सुधारू लागली. त्यांचे मोठे बंधू गजाननराव हे मदतीला धावून आलेले. नातेवाइकांशी, भावंडांशी ही विनायकराव कधी सलोख्याने वागले नव्हते. चार-पाच महिन्यांनी गजानन राव यांनी पुन्हा एकदा विनायकराव यांची भेट घेतली. तेव्हा मात्र सुरुवातीपासूनच विनायकराव यांचे काय आणि कसं चुकत गेलं हे गजानन रावांनी सौम्य भाषेत समजावून सांगितलं. सोन्यासारखी बायको आणि मुलं असतानाही तू हा आनंद कायम दूर लोटलास, हे ठणकावून सांगितलं. केवळ पुरुष म्हणजे श्रेष्ठ, स्त्री ही त्याच्या हातातलं बाहुलं, स्त्रीला स्वतःची अक्कल नाही, पुरुषी अहंकार महत्त्वाचा या चुकीच्या विचारसरणीने त्यांनी पत्नी वर तर अन्याय केलाच पण मुलांवरही केला.

आणि स्वतःवरही केला. सगळी सुखं हात जोडून उभी असतानाही त्यांच्या विचित्र स्वभावामुळे ते कोणतंच सुख मनमुराद अनुभवू शकले नाहीत. आणि आता मृत्यूच्या दाढेतून परत आल्यावर गजानन राव यांच्या सांगण्यावरून त्यांना उपरती झाली. त्यांनी स्वतःचा स्वभाव बदलण्याचा मनापासून प्रयत्न करण्याचं कबुल तर केलंय. आतातरी त्यांना आयुष्यातला खरा आनंद समजेल अशी आशा करूया…

ही होती एका विनायकरावांची कथा. अशा कित्येक व्यक्ती आपण आजूबाजूला पाहतो. एका चुकीच्या विचारसरणीने त्या ग्रासलेल्या असतात. मान्य आहे परिस्थितीमुळे, अनुभवांमुळे माणूस घडतो. पण एक चुकीचा गैरसमज आणि आपण आपली नाती कायमची तोडतो. आपण एखाद्या प्रसंगाचा, घटनेचा दुसराही दृष्टिकोन असू शकतो, याचा विचारही करत नाही. स्वतःशीच विचार करून पहा.. आपण कित्येक क्षुल्लक गोष्टींवरूनही खूप गैरसमज करून घेतो. आणि तेच पूर्वग्रहदूषित समज आपण आपले ठाम मत बनवतो. आयुष्यभर त्याच चुकीच्या विचारसरणीने त्रासलेले राहतो. अनेकदा समोरच्या व्यक्तीला त्याची बाजू न मांडू देता ही आपण संबंध तोडतो. यात आपलंच नुकसान आहे ना!

कित्येक वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक निर्णय आपण एका चुकीच्या विचारसरणीने घेतो. आणि स्वतःचे कायमचे नुकसान करून घेतो. कितीक वेळा येणाऱ्या पिढ्यांचे नुकसान करतो. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो हे मान्यच. पण आपला दृष्टिकोन, आपली विचारसरणी ही लवचिक, वास्तववादी हवी. तीस चाळीस वर्षांपूर्वीची राहणीमानाची पद्धत आज चालणार नाहीच, नाही का! त्याचप्रमाणे बदलत्या वेळेनुसार आपले धोरणही लवचिक हवं.

बरेचदा आपण आपल्या प्रेमाच्या व्यक्तींना गृहीत धरतो. एखादा वाईट प्रसंग, घटना, अनुभव आला तर आपण सहज नशिबाला, दुसऱ्या व्यक्तीला दोष देतो. म्हणतात ना स्वतःचे दोष कधीच दिसत नाहीत. आणि अशाच घटनांचा सतत विचार करून आपण स्वतःला त्रास करून घेत असतो. ही आपली चुकीची विचारसरणीच आहे.

चुकीचे समज, अहंकार, स्वार्थी वृत्ती, भांडकुदळ स्वभाव, टोकाचा मत्सर, अत्यंत नकारात्मक भावना या सगळ्या चुकीच्या विचारसरणीने आपण आपलेच आयुष्य अडचणीत टाकत असतो. आपण आपलाच आनंद दूर सारत असतो.

अत्यंत सकारात्मक भावना, वास्तववादी लवचिक विचारसरणी याचा अंगीकार करून आपण आपले आयुष्य, आपली प्रेमाची माणसं आनंदी बनवू शकतो. आपली ऊर्जा चांगल्या मार्गाने सुयोग्य ठिकाणी वापरून आपण आपल्या जीवनाचा परिपूर्ण आस्वाद नक्कीच घेऊ शकतो. पटतंय ना!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on ““चुकीच्या विचारसरणीमुळे आयुष्यात प्रॉब्लेम सतत निर्माण होत असतात.””

  1. म्हणून कधीही चुकीचे विचार करू नयेत नेहमी सकारात्मक विचारच कामी येत असतात

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!