Skip to content

“चांगले दिवस केव्हा येतील? हे आपल्या मानसिकतेवर अवलंबून आहे.”

“चांगले दिवस केव्हा येतील? हे आपल्या मानसिकतेवर अवलंबून आहे.”


मधुश्री देशपांडे गानू


“सुख हैं इक छांव ढलती

आती है जाती है

दु:ख तो अपना साथी है…”

हे गाणं सगळ्यांनाच ठाऊक आहे. मानवी स्वभाव आहे हा!  दुःखाला आपण जास्त कुरवाळतो. सुखाचे क्षण कधी उडून जातात कळतही नाही. बघा हं!  आपल्याला समजा बरं नसेल किंवा एखादा अवयव दुखत असेल तर आपलं सगळं लक्ष तिथेच लागलेलं असतं. आपली मानसिक स्थिती ही बेचैन, उदास असते. पण याच वेळी शरीरातील इतर अवयव आपलं काम चोखपणे बजावत आहेत हे आपल्या ध्यानातही येत नाही. नैसर्गिकच आहे म्हणा हे! प्रत्येक व्यक्तीला आपले आयुष्य समाधानी, आनंदी, यशस्वी व्हावं असं वाटत असतं. त्यानुसार तो प्रयत्नही करत असतो. पण जीवन हा प्रवास आहे, चांगल्या वाईट घटनांचा.

आपण सर्व एकाच वैश्विक ऊर्जेने बनलो आहोत हे तर मान्य आहेच. आपण जसा विचार करतो त्याच लहरी विश्वात जाऊन आपल्याकडे परत येतात, हे अनेक तज्ञांनी सांगितलेले आहे. मग आपण चांगलेच, सकारात्मक विचार केले तर आपले चांगलेच होणार हा विश्वास आपल्याला जीवनात पुढे नेतो. कोणताही बदल हा आधी मनात, विचारांत करावा लागतो. बुद्धीला पटावा लागतो. नंतरच तो कृतीत येतो. चांगले दिवस येणे हे आपल्याच हातात आहे. आपल्या मानसिकतेवर अवलंबून आहे.

खरं तर या विषयाला अनेक कंगोरे आहेत. स्त्री पुरुषांची मानसिकता, प्रत्येक व्यक्तीचा कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक स्तर, त्या व्यक्तीचा स्वभाव, दृष्टिकोन, त्याची सुख आणि दुःख पेलण्याची क्षमता.. खरं म्हणजे सांगणं, लिहीणं सोपं आहे. जी व्यक्ती एखाद्या दुःखद घटनेला सामोरी जात असते, तिला तेव्हा काहीही सुधरत, समजत नसतं. पण हीच वेळ सावरण्याची असते. नाहीतर उदासीनता, नैराश्य येतं. आता जीवनात काही राम राहिला नाही असं वाटू शकतं. माणूस त्याच घटने पाशी आयुष्यभर अडकून राहू शकतो.

“जब वी मेट”  हा काही वर्षांपूर्वी एक चित्रपट आला होता आणि खूप लोकप्रिय झाला होता. त्यात नायकाच्या तोंडी एक वाक्य आहे “जो भी बुरा होना था वो हो चुका. इस से बुरा कुछ नही हो सकता. अब जो भी होगा अच्छा ही होगा.” म्हणजे हा विचार आपण करायला हवा की “जे झालं ते अत्यंत वाईट झालं. यापेक्षा वाईट काही होऊ शकत नाही. आता जे होईल ते चांगलंच होईल.” हा आत्मविश्वास स्वतःला द्यावा लागतो. तरच आपण आहे त्या परिस्थितीतून बाहेर पडून एक आशादायी नवीन सुरुवात करू शकतो. मग मन आणि शरीरही त्यादृष्टीने विचार आणि कृती करायला लागतात.

आज मी स्वतःचं उदाहरण देणार आहे. अत्यंत सुखवस्तू आणि सुरक्षित असे आयुष्य जगत असताना अचानक अकस्मात कोणताही आजार नसलेले माझे पती पन्नाशीत असताना आम्हांला सोडून गेले. हा धक्का जबरदस्त होता. आयुष्य इथे थांबलं, संपलं असं वाटत होतं. यातून बाहेर पडायला मला आणि माझ्या मुलाला खूप त्रास झाला. पण केवळ मानसिक सामर्थ्य आणि कुटुंबीयांची साथ याने आम्ही हळूहळू यातून बाहेर पडलो. आजही ते ऊर्जेच्या स्वरूपात आमच्या बरोबर आहेत आणि त्यांना आवडेल, रुचेल असे आचरण करायचे, हे आम्ही दोघांनी ठरवले. अर्थात हे व्हायला काळ जावा लागला. पण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांच्या चांगल्या आठवणीं बरोबर घेऊन आज आम्ही चांगले जीवन जगत आहोत.

सांगायचा मुद्दा एवढाच आहे, प्रत्येक मनुष्याला या आणि अशा प्रसंगातून जावे लागतेच. फक्त आपलं आयुष्य तिथे थांबत नाही तर स्वतः साठी आणि आपल्या प्रेमाच्या माणसांसाठी आपण जगण्याची उभारी घेतली पाहिजे. कालच मी एक वाक्य वाचलं,” ज्याने मरण पाहिलं त्याला जीवन कळलं.” अक्षरशः हे खरं आहे माझ्या बाबतीत.

मग मी असा विचार करते की जीवन किती क्षणभंगुर आहे. काहीच भरवसा नाही. आज आत्ताचा हा क्षण फक्त माझा आहे आणि मी तो भरभरून आनंदाने पूर्ण जगणार. आणि माझ्या प्रेमाच्या माणसांनाही आनंद देणार.

एखाद्या व्यक्तीवर खूप जबाबदाऱ्या

असतात आणि तो सतत पिचलेला चिडचिड करत असतो. फक्त आपलीच समस्या मोठी असं त्याला वाटत असतं. पण असं नसतं. जर आपण सकारात्मकतेने जबाबदाऱ्या मनाने स्वीकारल्या तर त्या पार पाडताना होणारे कष्ट जाणवत नाहीत. आज अनेक कुटुंबांमध्ये ज्येष्ठतम व्यक्ती असतात. त्यांचं करताना राग राग करू नये. त्यांनी तुम्हाला त्यांचं सर्वस्व दिलेलं असतं. जे काही करायचं ते प्रेमाने करावे, म्हणजे त्रास होत नाही. काही माणसे सतत एक न्यूनगंड बाळगून जगत असतात. काही व्यक्ती प्रत्येक घटनेला स्वतःला दोषी धरतात. आणि या मानसिकतेचा त्यांच्या पुढील आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो.

चांगले दिवस केव्हा येतील? याचा सतत विचार करून आपली ऊर्जा वाया घालवू नका. तर आपली ऊर्जा आजचा दिवस चांगलाच आहे या विचारांमध्ये गुंतवा. आणि बघा फरक पडताना दिसेल. प्रत्येक नवा उगवणारा दिवस हा चांगलाच असतो. आपण भूतकाळाचे ओझे घेऊन त्या दिवसाला सामोरे जातो म्हणून आपल्या हातून चांगलं घडत नाही. कितीही दुःखदायक असलं तरीही भूतकाळ मागे टाकायचा असतो. विसरायचा असतो. त्यातून तुम्ही धडा घेऊ शकता फक्त. आणि आज पासून सगळे येणारे दिवस चांगलेच आहेत आणि असतील अशा आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने जीवनाला सामोर जायचं असतं. हो ना…

 


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!