Skip to content

चांगली माणसं सोबत असली की वाईट दिवसही चांगले जातात.

चांगली माणसं सोबत असली की वाईट दिवसही चांगले जातात.


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


सोबतीने वाहू सारे आयुष्याचे ओझे…
थोडे तुझे नी थोडे माझे …!!

आयुष्यात कुणाचीतरी सोबत असणं म्हणजे एक सुखच आहे. आणि त्यात चांगल्या माणसांची सोबत असेल तर आयुष्य जगायला नवा हुरूप येतो.माणसांशिवाय हे आयुष्य खरतरं अपूर्ण आहे. वेगवेगळ्या प्रकारची माणसं आपल्या आयुष्यात असतात.प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो.कुणाची वृत्ती चांगली असते तर कुणाची वृत्ती वाईट असते.

आणि आयुष्य म्हणजे एक प्रवासच आहे. या प्रवासात थोडेफार खड्डे तर येणारच.प्रवास करताना वाटेत काही काटे बोचणारच असतात.आपण फक्त त्यांना हसतहसत पार करायच असतं.पण अनेकदा कसं होतं तर आयुष्यात जेव्हा असे खडतर प्रसंग , वाईट दिवस येतात तेव्हा जगणच नकोसं होतं.आणि त्यात कुणाची सोबत , कुणाच आधार नसला तर जरा जास्तच एकटं एकटं वाटतं.

पण या अशा काळात जेव्हा काही चांगली माणसं आपल्या जवळ असतात तेव्हा ते दिवसही चांगलेच वाटतात. अरे आयुष्य जगणं अवघड नाही आपण त्याला अवघड बनवतो.हा दृष्टिकोन समजायला या माणसांची सोबत होते.कारण चांगल्या माणसांची सोबत ही नेहमीच सुखद वाटते.काट्यांवरून चालतानाही मग त्या काट्यांच भय या मनाला वाटत नाही. मन बिंधास्त चालत रहातं त्या काट्यांवरून…!!

आयुष्याचा प्रवासही सुखकर चाललाय असच कुठेतरी वाटत रहातं.पण अशी चांगली माणसं आयुष्यात असणं जरा दुर्मिळच…!

कारण हल्लीच्या जगात स्वार्थीपणा इतका वाढलाय की त्याला काही मर्यादाच नाही.केवळ स्वार्थासाठी एखाद्याच्या आयुष्यात शिरकाव करायचा आणि काम झालं की निघून जायचं अशी आजकालची मानसिकता झाली आहे. त्यामुळे माणसांवर विश्वास ठेवायचा की नाही हाच मोठा प्रश्न पडतो.

कारण काही लोकांना तर आपल्या आयुष्यातील चांगल्या लोकांच स्थानही पहावत नाही.आणि आपलं चांगल चाललेलही पहावत नाही. पण तरीही अशी माणसं जरी आजुबाजुला असली तरी काही चांगल्या लोकांमुळे या असल्या माणसांच काही एक वाटत नाही.सगळे दिवस कसे चांगलेच वाटतात.अशा माणसांच्या केवळ सहवासाने सुद्धा वाईट दिवसांशी लढायला नवं बळ येतं.

त्यामुळे नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा… नेहमी चांगल्या माणसांच्या सहवासात आपलं आयुष्य घालवण्याचा प्रयत्न करा.चांगल्या म्हणजे श्रीमंत , उच्च वगैरे या अर्थाने नाही तर ज्या लोकांकडे माणूसकी आहे अशा लोकांच्या सहवासात रहा.कारण हीच माणसं खऱ्या अर्थाने आयुष्याला पुन्हा अर्थ प्राप्त करून देतात. वेळप्रसंगी आपल्या खांद्यावर हात ठेवून ” मी आहे” असं बोलणारी ही काही माणसं खरच खूप काही सांगून जातात. मनाला एक दिलासा देऊन जातात.

काही प्रसंगातून आपण अनुभव घेतला असेल.जसं की… आपल्या घरातील आर्थिक चणचण , घरातील सतत चालणारे निरर्थक वाद , अपघात , किंवा अचानक झालेली कोणती दुखापत , किंवा अचानक ओढवलेलं एखादं संकट असो…या अशा प्रसंगात या चांगल्या माणसांची जी काही सोबत असते ती खरच आधार देणारी असते.पावलांना वेग येतो तो या चांगल्या माणसांमुळेच…!

असा आधारस्तंभ म्हणून उभा राहणारा एक तरी चांगला माणूस आपल्या आयुष्यात असू द्यावा. अंधारात एखादी उजेडाची वाट सापडावी तशी ही माणसं भासतात. अंधारलेल्या आयुष्यात लख्ख प्रकाश पसरवण्यासाठी ही माणसं अहोरात्र मेहनत करतात. ही अशी काही चांगली माणसं म्हणजे आपल्या आयुष्यातील अविभाज्य भागच असतात. अशा माणसांना कधी चुकूनही दुःखावू नका. आपल्याला समजून येत नाही पण आतून खूप तुटतात ती माणसं…! स्वतःच दुःख बाजूला ठेवून इतरांच्या आयुष्याच कल्याण कसं होईल याचा प्रामाणिक विचार ती करतात.

अशी चांगली माणसं तुमच्या आयुष्यात असतील तर त्यांना हृदयाच्या कुपीत जपून ठेवा.आणि त्यांच्या वाईट प्रसंगात त्यांनाही मदतीचा हात द्यायला विसरू नका.कारण आपल्याला जशी त्यांची सोबत असते तशीच आपणही त्यांना सोबत केली पाहिजे.

आपण अशावेळी त्यांची साथ सोडता कामा नये.त्यांच्या वाईट दिवसात आपणही त्यांना चांगली सोबत केली पाहिजे.अशी माणसं पुन्हा पुन्हा आयुष्यात येणं कठीण असतं.त्यांना जपा , त्यांची काळजी घ्या.त्यांनी आपल्या वाईट काळात आपली सोबत केलेली असते ह्याची जाणीव कायम असुद्या.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!