उत्क्रांती-घोरणे
विजय लिमये
गाढ झोप लागलेली असताना, तोंडातून विचित्र आवाज निघणे, यालाच घोरणे म्हणतात. हा आवाज बराचसा भेसूर, व इतरांना त्रासदायक असतो.
आधुनिक जीवन शैलीत मानवाने घोरणे हा एक आजार आहे असे ठरवून टाकले आहे, आणि अनेक डॉक्टर उपचाराच्या नावाखाली स्वतःचे उखळ पांढरे करून घेत आहेत.
होय, माझे मत भिन्न आहे, ज्यांना पटेल त्यांनी घ्यावे, इतरांनी सोडून द्यावे. मी म्हणतो घोरणे हे गाढ झोप लागल्याचे उत्तम उदाहरण आहे. आधुनिक मानवाची सुद्धा उत्क्रांतीच्या प्रवासात घोडदौड सुरू आहेच, पण म्हणून तो आदिमानवाचे सर्व गुण थोडीच टाकून देऊ शकला आहे?
आदिमानवाचा मेंदू प्रगत होऊ लागला, त्यामुळे तो मर्कट योनीतुन मानव योनीत प्रवेशला. या बदलात, सर्वात प्रथम तो आत्मसंरक्षणासाठी झाडावर व गुहेत वास्तव्य करू लागला. मर्कट जीवनात तो झाडावर होताच, पण गुहेत व दगडांच्या कडीकपारित लपण्याची कला ही त्याने आत्मसात करण्यास सुरुवात केली.
हे सर्व मिळवताना काहीतरी गमवावे लागतेच, हा निसर्ग नियम इथे ही लागू पडलाच. त्याला झोप लागण्यास सुरवात झाली, ही “सावध झोप” म्हणूया, हा गुण मर्कट योनीतुन त्याच्याकडे आला होताच, पण प्रगत मेंदूने या गुणावर जास्त मेहनत घेऊन त्याला अजून समृद्ध करण्याचा कसोशीने प्रयत्न केला, जो बऱ्याच अंशी यशस्वी झाला ज्यामुळे आदिमानव “गाढ झोपी” जाऊ लागला.
आपल्या कॉम्प्युटर मध्ये प्रोसेसर वापरण्यात येतो, हा प्रोसेसर जितका तल्लख तितका कॉम्पुटर उच्च दर्जाचा, आणि हाच प्रोसेसर सर्वात जास्त ऊर्जा खातो व तितकाच जास्त गरम होतो. प्राण्यांचा मेंदू मेमरी साठवण्याचे व प्रोसेसर असे दुहेरी काम करतो, म्हणून त्याला प्रचंड ऊर्जा लागते. जितका मेंदूचा वापर जास्त, तितकी त्याला विश्रांतीची गरज जास्त. मेंदूला विश्रांती म्हणजेच गाढ झोप.
गाढ झोपी जाण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे “भक्ष” होणे. त्याच्या या अद्वितीय मिळालेल्या गुणासोबत अवगुण ही आलाच, म्हणजे उत्क्रांतीच्या या प्रवासात नफ्यासोबत तोटा ही आलाच. पण, थांबेल तो निसर्ग, कसला?, त्याने या समस्येवर शक्कल लढवलीच, व स्वरक्षणासाठी क्लुप्ती शोधली, त्यालाच आपण आधुनिक युगात “घोरणे” म्हणतो.
ही एक प्रकारची फसवणूक आहे, ज्याला इंग्रजीमध्ये कॅमोफ्लेज म्हणतात. निरीक्षण करा, आपण कुत्रा, मांजर, पाल, साप, सरडा, उंदीर, बेडूक, गाय, म्हैस, बैल, गाढव, डुक्कर, माकड याना कधी बोली भाषेत हुसकवतो का?
नको असलेला प्राणी आपल्याजवळ येत असेल तर आपण त्याला हुसकावून लावण्यासाठी सर्वात प्रथम तोंडातून हवेचा वापर करून विचित्र आवाज काढूनच धमकवतो. असा आवाज आपल्या तोंडातून अगदी नैसर्गिक येतो, ज्याला शब्दांकित करता येत नाही. आपण प्राण्यांना कधीही बोली भाषेतील शब्द वापरून चेतावणी देत नाही.
अगदी तश्याच प्रकारचा किंवा त्याहून भेसूर आवाज घोरण्यातून येतो, ज्यातुन एखाद्या हिंस प्राण्याला आपल्यावर न हल्ला करण्याची आपण चेतावणी देत असतो, ही आपल्याला उत्क्रांतीच्या प्रवासात मिळालेली देणगी आहे असे मानायला हरकत नाही. आदिमानव याच क्लुप्तीचा वापर करून गाढ झोपेतही स्वतःचे संरक्षण करून घेत असणार.
आधुनिक युगात आपण बंद खोलीत झोपतो, व गाढ झोपेत भेसूर आवाजात घोरतो, ही व्याधी नसून, उत्क्रांतीच्या प्रवासातील एक लक्षण आहे, जे टाळू शकत नाही. घोरणाऱ्या माझ्या तमाम सावंगड्याना घोरण्यासाठी हार्दिक शुभेच्छा. कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड न बाळगता, गाढ झोपेचा आनंद लुटा.



खूप छान माहिती दिली. त्या बद्दल धन्यवाद. मी सुद्धा घोरण्याचा पुरेपूर वापर करून घेतो ,पण माझ्या लक्षात आले की माझ्या घोरण्याचा घरातील सर्व सदस्य याना त्रास होत आहे. म्हणून मी डॉक्टर कडे जाणार होतो पण तुमचा लेख वाचला आणि माझे पूर्ण समाधान झाले त्या बदल मनापासून धन्यवाद..???
घोरणे या विषयावर च लेख आवडला पण प्रश्न निर्माण होतो की घोरताना अनेकदा मनुष्य काहीसे जागे असतात किंबहुना त्या व्यक्तीला देखील झोप लागलेली नसते, त्यांना झोपेचे समाधान मिळत नाही. (इतरांना त्या आवाजामुळे झोप येत नाही).याबाबत मार्गदर्शन व्हावे…ही विनंती.