Skip to content

घर किती मोठंय हे महत्त्वाचं नसून घरात समाधान आहे का हे महत्त्वाचं आहे.

घर किती मोठंय हे महत्त्वाचं नसून घरात समाधान आहे का हे महत्त्वाचं आहे.


मेराज बागवान


‘घर’ सर्वांना हवंहवंसं वाटणारं, आपलं हक्काचं असं एक ठिकाण.जिथे विसावा मिळतो.जिथे विश्रांती मिळते आणि आपलेपणा, प्रेम नांदते.
पूर्वी लोकांची घरे अगदी साधी असायची.म्हणजे छोटीशीच खोली वगैरे..अगदी साधे असायचे सर्व काही.आजही ती परिस्थिती आहेच.पण थोडा बदल हळू हळू व्हायला लागला आहे.

शहरीकरणामुळे , घराचे स्वरूप ‘बंगला, फ्लॅट या मध्ये झाले आहे. मोठी, नव्या पद्धतीची, आखीव रेखीव घरे सध्या पहावयास मिळतात. अगदी खूप कौतुकाने लोक आपली घरे बांधतात आणि सजवतात. पण घर कसेही असले तरी ‘घर हे घर असते’.पण आज घरे मोठी होत चालली असली तरी, त्या घरात समाधान कितपत आहे???

आजचे युग तंत्रज्ञानाचे आहे.अगदी दर दिवसाला नवे तंत्रज्ञान येत असते आणि कालचे सर्व मागे पडते. मोबाईल फोन, इंटरनेट, लॅपटॉप, संगणक,टीव्ही इत्यादी माध्यमांमुळे जग पुढे पुढे चालले आहे. पण ह्या सगळ्याचा नातेसंबंधांवर, आणि संपूर्ण कुटुंबव्यवस्थेवर दूरगामी परिणाम दिसून येत आहेत. घरे मोठी होत आहेत.

मात्र घरातील माणसे छोटी होत आहेत.म्हणजेच एकमेकांपासून दुरावत चाललेली आहेत.मोबाईल फोन चा अतिरेक वापर आणि आभासी जग यामुळे घरातील व्यक्तींचा संवाद लोप पावत चालला आहे.पूर्वी निवांत होणाऱ्या गप्पांची जागा आता ‘ मोबाईल फोन वरील लेट नाईट चॅटिंग’ ने घेतलेली आहे. आणि यामुळे पुरेसा वेळ असूनही, एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलणे होत नाही.

कुटुंबव्यवस्था आजही टिकून आहे. पण घरातील सुख शांती, समाधान कुठेतरी हरवत चालले आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे, स्पर्धा वाढल्यामुळे ‘खरे समाधान कशात आहे’ हे माणूस हळूहळू विसरत चालला आहे. पैसे कमवत कमवत , माणूस हे विसरत चालला आहे की ,’कुठेतरी थांबून घरात मनमोकळा श्वास घेतला पाहिजे’.पण मोठे घर बांधून , माणूस मात्र घरापासून दुरावत चालला आहे.

नातेसंबंध आता पूर्वीसारखे पारदर्शक दिसत नाहीत.एकमेकांना बिनधास्तपणे कोणती गोष्ट सांगायला माणूस आज धजावत नाही.एकाच घरात राहून एकमेकांवरील विश्वास मात्र लोप पावत चालला आहे.घरात प्रत्येकाला स्वतंत्र खोल्या आहेत, पण तरी देखील स्वतःची ‘स्पेस’ शोधत माणूस जगभर भटकत आहे.

लहान मूल घरात आले की , घराला घरपण येते असे म्हणतात.पण आजकाल पालकांना आणि मुलांना देखील त्यांच्यावरील अतिरिक्त अभ्यासामुळे आणि इतर गोष्टींमुळे एकमेकांना हवा तसा वेळ देता येत नाही.पालक नोकरी/व्यवसाय यामुळे सतत बाहेर असतात आणि मग मुले एकटीच घरात असतात.संसार सुरळीत चालू ठेवण्यासाठी, सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी घरातील सर्व जण पैसे कमवत असतात.मात्र हे करीत असताना , खरे समाधान मिळतेच असे नाही.

आज घरे चांगली उंची , मोठमोठाली होत आहेत.पण सर्व काही असूनही घरातील लोकांचे मानसिक स्वास्थ्य हरवत चालले आहे. म्हणूनच घर किती मोठंय हे महत्त्वाचं नसून घरात समाधान आहे का हे महत्त्वाचं आहे.मोठे घर असूनही सुख आणि शांती नांदतात दिसत नाहीत.काही ठिकाणी अपवाद जरूर आहेत.पण अनेक ठिकणी, मोठ्या घरात राहूनही माणसे स्वतःला ‘एकटे’ समजू लागली आहेत. अनेक मानसिक आजारांनी ग्रासलेली आहेत.

छोटे घर असलेल्या व्यक्तींना देखील ह्या समस्या भेडसावतात.नाही असे नाही.पण महत्वाचे काय? घर छोटे असो वा मोठे ‘समाधान’ महत्वाचे.फक्त चार भिंती, छान छान खिडक्या-दरवाजे म्हणजे घर नव्हे.घर म्हणजे, जिथे सर्व जण एकमेकांशी दिलखुलासपणे बोलतात, आपले मन मोकळे करतात.जिथे प्रत्येकाच्या अपेक्षा, विचार, मते विचारात घेतली जातात ते म्हणजे घर.जिथे प्रत्येकजण एकमेकांशी फक्त वाद घालण्यासाठी बोलत असेल , मन मोकळे करू शकत नसेल, सतत कलह होत असतील तर त्या घरातील प्रत्येक माणूस स्वतःला ‘एकटे’ समजू लागेल. मग तिथे त्यांना ‘समाधान’ कधीच मिळणार नाही.

ज्या घरात एकमेकांवर पूर्ण विश्वास असतो, एखादी समस्या आली तर ती सर्वजण मिळून ती सोडवतात, एखादी नवीन गोष्ट करायची असेल तर सर्वांची मते विचारात घेतली जातात, त्या घरात सदैव आत्मिक समाधान पहावयास मिळते.

घर हे माणसांनी बनते ना की घरातील वस्तूंनी किंवा मोठ-मोठ्या खोल्यांनी.’स्वतःचे, मोठे घर असावे’ हे अनेकांचे स्वप्न असते.आणि ते असलेच पाहिजे.पण त्या घरात समाधान, आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती आणि आनंद आहे का , हे प्रत्येकाने तपासून पाहिले पाहिजे.

‘निवारा’ म्हणजेच घर, ही माणसाची मूलभूत गरज आहे. मग हा निवारा छोटा असला तरी चालेल पण समाधान मात्र मोठे असावे. ‘हक्काच्या घरात हक्काने समाधान पण मिळवता आणि टिकवता आले पाहिजे’.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “घर किती मोठंय हे महत्त्वाचं नसून घरात समाधान आहे का हे महत्त्वाचं आहे.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!