घरात सतत निगेटिव्ह विचार करणारा माणूस असेल तर अशावेळी काय करावे?
हर्षदा पिंपळ
मनाने या किती किती
सहन करावे उगा ते त्रागे….?
नकारात्मक विचारांचे सावट
न जाणे का फिरत असते मागे…मागे….?
मित्रांनो, मनाला त्रास होतो तो नकारात्मक विचारांमुळे. आपल्या घरातही अशा सतत निगेटिव्ह विचार करणाऱ्या व्यक्ती असतात. आणि त्यांच्यामुळे त्याचा परिणाम कळत नकळतपणे घरातील इतरांवरही होतो.
“मला हे नाही जमणार, मी हे नाही करू शकत,मला खरच नाही जमणार हे….”
“काही चांगलं होत नाहीये माझ्या आयुष्यात, आणि यापुढे काही होईल असही वाटत नाही.”
“तु नको करू ते,मलाही नाही जमलं तुला तरी कसं जमेल… त्यापेक्षा तु हे नाही केलेलेच बरं…नकोच करू ते,उगाच कशाला वेळ वाया….”
“आज कोणाचा चेहरा बघितला होता देव जाणे,सगळा दिवस वाईट गेला,एक कामही धड झालं नाही.”
“हे असच झालं,तसच झालं…तसं व्हायला नको होतं,आता बाकी नीट नाही झालं तर…?”
“माझच चुकलं,माझ्या चुकीमुळे हे सगळं झालं,सारख माझच चुकतं,आयुष्यात एक तरी गोष्ट मी बरोबर करणार आहे की नाही माहीत नाही.”
“नाही मिळणार गं मला ते…माझ्यात तितक पोटेन्शिअलच नाहीये.”
“मी नाही येणार,मला नाही यायच,मला हे नाही करायच ते नाही करायच…मला काहीच नाही करायच..”
यांसारखे कितीतरी संवाद आपल्यापैकी प्रत्येकाला माहीत आहेत.प्रत्येकजण अशा संवादामध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहभागी असणार यात शंकाच नाही.पहा,सातत्याने असा विचार करणाऱ्या व्यक्ती जर आपल्या घरात असतील तर घरातील वातावरणावर त्याचा परिणाम होतो. जसं एक ठिणगी पडली की वणवा पेटायला वेळ लागत नाही. अगदी तसच घरातील एक जरी व्यक्ती सातत्याने नकारात्मक विचार करत असेल तर त्याचा परिणाम निश्चितच घरातील इतर सदस्यांवर होतो.सकारात्मक असणारं वातावरण हळुहळू गढूळ व्हायला लागतं.
आणि कालांतराने संपूर्ण वातावरणच बदलून जातं.
आता नकारात्मक विचार मनात येऊच शकत नाही असं मुळीच नाही. परंतु त्याला काही मर्यादा असणं आवश्यक आहे. नाहीतर नकारात्मकतेच्या गर्तेत खोल बुडालेल्या व्यक्तीला बाहेर काढणं अवघड होऊन बसू शकतं.नकारात्मक विचार मनातून सहजासहजी बाहेर पडू शकतात असं नाही परंतु त्यासाठी सातत्याने प्रयत्न केले तर ते नकारात्मक विचार हळुहळू नक्कीच मनातून बाहेर पडू शकतात. खरं सांगायचं तर निगेटिव्ह विचारांमुळे माणसाच्या शरिराची दुखणी वाढू लागतात.सातत्याने निगेटिव्ह राहिल्याने शुगर,ब्लड प्रेशर,यांसारख्या अनेक व्याधी जडण्याची शक्यता असते.इतकच नव्हे तर मानसिक संतुलनही पूर्णतः कोसळण्याची शक्यता असते.यामुळे इतरांवर चिडचिड करणे,ओरडणे अशा गोष्टींच प्रमाण वाढत जातं.त्यामुळेच अशा व्यक्ती असतील तर काय करायच हे आपण पाहूयात—-
तर…घरात अशा व्यक्ती असतील तर……
पॉझिटिव्ह लोकांचा सहवास-अशा व्यक्तींना शक्य होईल तितकं पॉझिटिव्ह लोकांच्या सहवासात घेऊन जा.आणि केवळ एक दिवस नाही तर सातत्याने जिथे सकारात्मक वातावरण असेल अशा ठिकाणी अशा व्यक्तींना घेऊन जा.जेणेकरून सभोवतालच्या सकारात्मक गोष्टींचा प्रभाव पडून निगेटीव्हीटी दूर होण्यास मदत होईल.
व्यायाम/मनन –
अशा व्यक्तींना फिटनेसकडे लक्ष देण्यासाठी प्रोत्साहित करा.अनेकदा फिटनेस व्यवस्थित नसेल तरीही शरीर कमजोर होऊन मनाची कमजोरी सुद्धा वाढते.मन प्रसन्न नसल्याने मनात वाईट विचार शिरकाव करू पहातात. त्यामुळे अशा व्यक्ती व्यायाम/मेडिटेशन करतील यावर लक्ष केंद्रित करा.
आनंद-
आनंद हा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दडलेला असतो.तो आनंद कसा घ्यायचा..? त्या आनंदात कसं सामील व्हायच हे आपल्या कृतीतून त्या निगेटिव्ह लोकांना दाखवून द्या.कदाचित त्यांना आनंद मिळू शकतो. त्याच आनंदामधून सकारात्मकतेकडे अशा व्यक्ती एक पाऊल नक्कीच उचलू शकतात.
वागणं-बोलणं-
त्या व्यक्तीसोबत आपण आपलं वागणं असं ठेवावं जेणेकरून त्या व्यक्तीला उगाचच दुःखीकष्टी वाटणार नाही.अशा व्यक्तींना केवळ फिलॉसॉफीचेच डोस पाजू नका.तर त्यांच्यासोबत थोडं cool पणे वागा.आयुष्य म्हणजे सातत्याने रडणं नसतं तर चिखलात पडूनही खळखळून हसणं म्हणजे आयुष्य असतं याची जाणीव करून द्या.कधी त्यांच्याबरोबर एखादा खेळ खेळा.आवडीची गाणी म्हणा.फिरायला जा.कट्ट्यावर जाऊन चहा सोबत गप्पा टाका.
भावनांवर नियंत्रण-कधीतरी तोल जातोच…पण,आता नकारात्मक व्यक्तीला जर पॉझिटिव्ह होण्यासाठी मदत करायची असेल तर सर्वात आधी आपण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. भावनेच्या भरात आपल्याकडून अशा व्यक्ती दुःखावल्या जाणार नाही याची काळजी घ्या.
स्वतः आनंदी रहा-आपल्याकडे पाहून एखाद्याला प्रसन्न वाटलं पाहिजे. त्यामुळे चेहऱ्यावर हसू ठेवा.आपल्या चेहऱ्यावर सकारात्मक ऊर्जा पाहून निगेटीव्ह लोकांना पॉझिटिव्ह होण्यास नवी ऊर्जा मिळू शकते. सो..तुम्ही स्वतः आनंदी रहायचा प्रयत्न करा.
पॉझिटिव्ह विचार-
आपण जसा विचार करतो तशीच गोष्टी होत असतात.हे त्या लोकांना ठणकावून सांगा.’thought is thing’ असं म्हणतात ते अगदी बरोबर आहे.आपण निगेटीव्ह विचार केला तर गोष्टी निगेटीव्ह होत जातात.त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह विचार करण्याला प्राधान्य दिले पाहिजे हे समजून सांगा.
थोडक्यात, तुम्हाला शक्य होईल तितक्या क्रिएटिव्ह मार्गाने अशा व्यक्तींना निगेटीव्हीटीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा.ज्यामुळे ही लोकं कंटाळवाणी होणार नाहीत.ज्यामुळे ह्या लोकांना आनंद,समाधान मिळू शकेल.
एकच लक्षात ठेवा….आणि इतरांनाही याची आठवण करून द्या. ते म्हणजे…..
“A positive mindset brings positive things” (Phillip Reitre).
…Life is beautiful..फक्त पॉझिटिव्ह रहायला शिका.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Nice
Ekdum super …..nd tnx dilshe🐰