Skip to content

” घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी हे उपाय करून पहा. “

” घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी हे उपाय करून पहा. “


मधुश्री देशपांडे गानू


“ये तेरा घर, ये मेरा घर

किसी को देखना हो गर…

तो पहले आके मांगले….

तेरी नजर.. मेरी नजर…”

घर, घरकुल, निवास किती सुरेख शब्द आहेत. दिवसभराच्या धावपळीनंतर हक्काचा निवारा, विश्रांती असलेलं ठिकाण म्हणजे घर. मग ते भाड्याचं असो की स्वतःचं, लहान असो की मोठे. तरीही आपल्या हक्काचं, मालकीचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. अगदी प्रत्येकाच्या क्षमतेनुसार लहान मोठं पण हक्काचं घर असावे यासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील असतो. “होम स्वीट होम” असे उगाच म्हणत नाहीत.

सुरक्षितता, मायेचा ओलावा, उबदारपणा देतं हे घर. घर आणि घरातील माणसं असं एक वेगळंच, खास जग असतं. बाहेरच्या कोलाहलापासून दूर.. बाहेरच्या जगात कसेही चांगले वाईट अनुभव आले तरीही आपलं घर आपल्याला सर्वार्थाने सामावून घेतं. घर आपला “कम्फर्ट झोन” असतं. कुटुंबातील नातेसंबंध घराच्या साक्षीनेच घडतात, बहरतात.

अशा या घरात नेहमी सुख संपत्ती, धनधान्य, ऐश्वर्य, आरोग्य नांदावं, घरातील माणसं नेहमी आनंदी असावीत म्हणून आपण पूजापाठ करतो. सायंकाळी धूप दिवा लावतो. प्रार्थना म्हणतो. पण याच घरातील माणसं जर नकारात्मक प्रवृत्तीचे असतील तर? जर घरात सतत चिडचिड, वादविवाद, भांडणं, रुसवे-फुगवे, असभ्य भाषा वापरली जात असेल तर? तर कितीही कर्मकांडं केली तरीही काहीही फरक पडणार नाही. कारण हे बाह्य उपचार झाले.

घर नकारात्मक उर्जेने भरलेलं असेल तर कुटुंबातील, नात्यातील परस्पर संबंध ताणतणावाचे राहतात. मानसिक शारीरिक स्वास्थ्य बिघडलेलं असतं. नोकरी व्यवसायात अपयश, आर्थिक विवंचना या सगळ्याला सामोरं जावं लागतं. यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही. परिस्थिती बिघडत जाते. आंब्याच्या पेटीत एक आंबा नासका असेल तर तो सगळे आंबे झपाट्याने नासवतो. त्याच प्रमाणे एका व्यक्तीत असलेली नकारात्मक ऊर्जा ही वेगाने घरभर पसरू शकते. आणि संपूर्ण घर  उदासवाणं होऊन जातं.

अशी ही संपूर्ण आयुष्यावर परिणाम करणारी, घराचे घरपण हिरावून घेणारी नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी सर्वतोपरी कोणकोणते उपाय करता येतील ते पाहू. हे उपाय सर्वस्वी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे मानसिक स्वास्थ्य, मानसिक शांती वृद्धिंगत करणारे आहेत. ज्याचा संपूर्ण सकारात्मक परिणाम घरावर आणि घरातील सदस्यांवर होतो.

१) सर्वात प्रथम परमेश्वरावर अढळ श्रद्धा हवी. सश्रद्ध मनाने नित्य पूजाअर्चादी मंगल घरात व्हावं. यामुळे घरातील वातावरण प्रसन्न होते.

२) कोणतीही सतत तक्रार करणे बंद करणे. आपल्याकडे तुम्हीं शांतपणे लोकांचं बोलणं ऐकलं तर सतत छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लोक तक्रारीचा सूर लावताना आढळतात. सातत्याने आयुष्यात नकारात्मक काय घडतंय यावरच बोलतात. खरं म्हणजे कोणतीही छोटी-मोठी तक्रार करण्याचा अधिकार तुम्हांला तेव्हांच आहे जेंव्हा तुम्ही त्यावर काही तोडगा सांगू शकता. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीत तक्रारी करणं, कुरकुर करणं, चिडचिड करणं सर्वप्रथम बंद करा. एखादी अडचण ही सकारात्मक विचार आणि कृती करण्याची संधी आहे असा विचार करून ती सोडवण्यासाठी प्रयत्न करा.

३) सकारात्मकतेचे यशस्वी सूत्र वापरा. घडणारी घटना, प्रसंग, अर्थकारण, समाजकारण, कुटुंबातील व्यक्तींचे स्वभाव, त्यांचे विचार, कृती यावर तुमचे काहीही नियंत्रण नाही. पण या सगळ्यावर तुम्ही काय विचार आणि कृती करता यावर तुमचे नियंत्रण नक्कीच आहे. आपली सकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक प्रतिक्रिया आपण योग्य पद्धतीने वापरू शकतो.

४) एखाद्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर वेगळे चांगले मार्ग मिळतात. कुटुंबातील सदस्यांशी सामोपचाराने, शांतपणे, मोकळेपणाने बोलून मार्ग नक्कीच मिळतो.

५) लोकांचं आपल्याबद्दल काय मत आहे याला अवास्तव महत्त्व देऊन त्यांच्याप्रमाणे आपण घडण्यापेक्षा स्वतःला सकारात्मकतेने घडवा. यामुळे तुम्ही कुटुंबात, समाजात, जगात स्वतःचे खास असे योगदान देऊ शकता.

६) आपले कुटुंबीय, आसपासची परिस्थिती याबाबत जागरूकता नक्कीच हवी. पण त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या मनावर होऊ देऊ नका.

७) कुटुंबातील व्यक्तींमध्ये प्रेम, विश्वास, मनमोकळा संवाद हा असायलाच हवा. कोणत्याही परिस्थितीत घर हे विश्वासाचं ठिकाण असायला हवं.

८) समाजात काही लोक मत्सर, असूया यामुळे तुम्हांला मुद्दाम त्रास देतात.  आद. महात्मा गांधींचं आत्मसन्मानावर प्रसिद्ध वाक्य आहे. “मी कोणत्याही अशा व्यक्तीला माझ्या मनावरून पाय देऊन जाण्याची संधी देणार नाही, ज्याचे पाय घाणीने बरबटले आहेत.” याचा अर्थ असा कोणत्याही नकारात्मक व्यक्तीला तुमच्या आयुष्यात स्थान देऊ नका. तुमची सकारात्मक ऊर्जा एवढी प्रचंड हवी की त्याचा अशा माणसांवरही सकारात्मक परिणाम होईल.

९) प्रयत्नपूर्वक सकारात्मक व्यक्ती, मित्र-मैत्रिणींच्या सहवासात राहा. घरातील सदस्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा राहण्यासाठी प्रयत्नशील राहा. हे नक्कीच सोपे नाही. सातत्याने प्रयत्न आवश्यक आहेत.

१०) घरातील प्रत्येक सदस्याचे आणि स्वतःचे ही छोट्या मोठ्या यशासाठी मोकळेपणाने कौतुक करा.

११) एखादी अडचण आली तर त्याकडे संधी म्हणून पहा. आव्हान म्हणून नाही.

१२) तुमचं आयुष्य, दैनंदिनी ही कुटुंबीयांसाठी प्रेरणादायी असेल यासाठी प्रयत्न करा.

१३) घर, घरातील तुमची प्रेमाची माणसं, जे तुमच्या जवळ आहे त्याबद्दल रोज न चुकता कृतज्ञता व्यक्त करा.

१४) तुमचे विचार आणि शब्द याबद्दल जागरूक राहा. “वास्तु तथास्तु” म्हणते हे लक्षात ठेवा.

१५) ज्यावर आपले नियंत्रण नाही त्या गोष्टी, विचार सोडून द्यायला शिका.

१६) दिवसातील किमान दहा मिनिटे ध्यान करा. ध्यानाचे, मौनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

स्वतःसाठी फायदेशीर ठरणाऱ्या आणि संपूर्ण कुटुंबाला सकारात्मकता देणाऱ्या कितीतरी गोष्टी आपण नक्कीच करू शकतो. वाद न घालता संवाद निर्माण करू शकतो. चांगली सकारात्मक स्पंदने, ऊर्जा घरात निर्माण करू शकतो. आणि आपलं हक्काचं घर आपण पवित्र, मंगल वास्तु बनवू शकतो. बरोबर ना!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “” घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी हे उपाय करून पहा. “”

  1. नकारात्मक विचार याबाबत खूप चांगल्या टिप्स
    आहेत, वरील सर्व गोष्टींचा फायदा नक्कीच होईल.

  2. राजेश पोन्दे

    या लेखामुळे निश्चितच सर्वांमध्ये सकारात्मक बदल होईल

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!