Skip to content

गैरसमजातून अनेकांचे हसते खेळते कुटुंब उध्वस्त होते….

गैरसमजातून अनेकांचे हसते खेळते कुटुंब उध्वस्त होते….


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


..: गैरसमज…

प्रत्येकाला या शब्दाची प्रचंड चिड ही असावीच…..! गैरसमज अशी गोष्ट आहे की ज्यामुळे रंगीत असलेली कितीतरी आयुष्य ही अशी क्षणात रंगहीन होऊन जातात. हा पाच अक्षरी छोटासा शब्द पण क्षणात सारं काही उध्वस्त करतो.आजपर्यंत कुणाच्या आयुष्यात गैरसमज झाले नाहीत असं इथे कुणीच नसावं.

एकवेळ समजून घेतलं नाही तरी चालेल पण गैरसमज करून घेऊन नात्यांना तडा जाऊ देऊ नका.आयुष्यात जितके गैरसमज जास्त तितकच आयुष्य जास्त गुंतागुंतीचं होऊन जातं. आणि आयुष्याचा गुंता इतका वाढत जातो की तो सोडवणं अगदी कठीण…!

सगळं चांगल चालू असताना अचानक हा विषारी गैरसमज आयुष्यात येतो आणि आयुष्याची वाट लावून जातो.नाजूक धाग्यांनी विणली गेलेली नाती केवळ या गैरसमजामुळे क्षणात तुटतात. त्यावेळी एक नातं जुळायला लागलेला कितीतरी वेळ आपण क्षणात विसरून जातो.

अशा वेळी नाती इतकी तकलादू बनतात का…?? तर नाही… नाती तकलादू बनत नाही तर त्या गैरसमजाची ताकद त्यावेळी जास्त असते.क्षणात होत्याच नव्हतं करणारा गैरसमज म्हणजे आयुष्यातील ज्वलंत विषारी लाव्हाच…!!

“काही नाही गं…फक्त थोडं ‘missunderstanding ‘ झालं.आणि मग काय जे व्हायला नको तेच झालं.खूप प्रयत्न केला गैरसमज दूर करण्याचा पण गैरसमज वाढतच गेले.” हा असा प्रसंग किंवा असं तुमच्या बाबतीतही झालं असेल.म्हणजे तो गैरसमज इतका ज्वलंत असतो की त्यावेळी आपण काही समजून घ्यायच्या मनःस्थितीतच नसतो.किंवा आपल्याला समजूनच घ्यायच नसतं. पण या गैरसमजाला वेळीच आळा घातला पाहिजे नाहीतर सगळं आयुष्यच पोखरून बसेल.

कोळी जाळे विणतो…पण गैरसमजाच जाळं मात्र आपोआप पसरल जातं.जितकं शक्य होईल तितकं.गैरसमज कुणामध्ये होत नाहीत…?? नवरा-बायको , मित्र-मैत्रिणी , आईवडील-मुलं ते अगदी आपल्या सहवासात असणाऱ्या अनेक जणांसोबत कधीकधी गैरसमज होत असतात. काहींचे लवकर दूर होतात.काहींचे लवकर दूर होत नाहीत तर काहींचे गैरसमज कधीच दूर होत नाही. तो गैरसमज.हळुहळू वणव्यासारखा पेटतो.आणि त्या आगीत नाती मात्र अक्षरशः होरपळून निघतात.उरते ती फक्त राख…तीही त्या किंतु परंतुंची…!!

भावनांचे हिरवेगार वृक्ष क्षणार्धात उन्मळून पडतात….
हसणारी कुटुंब मग एका कोपऱ्यात जाऊन रडतात….

खरच किती तो वादळी गैरसमज…!! गैरसमज निर्माण झाला की मनाची घालमेल होते ती वेगळीच.पण या गैरसमजामुळे मनात एका ठिकाणी शंका-कुशंकां आणि मतभेद….यांना केव्हा मानाच स्थान मिळून जातं कळतही नाही.शब्दांची ताकद खूप असते असं म्हणतात..

त्याप्रमाणे गैरसमज हा शब्द छोटा असला तरी कितीतरी कुटुंब , नाती , आयुष्य उध्वस्त करण्याच सामर्थ्य , ताकद त्या एकट्यामध्ये आहे.म्हणून अशी हसती खेळती कुटुंब केवळ गैरसमजामुळे उध्वस्त होणार असतील तर आपण वेळीच सावध झालं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मोठे मोठे गैरसमज होताना आपण पाहतो.गैरसमज होतो त्यामुळे विश्वासही तुटतो.

आणि एकदा का गैरसमज झाला तर ती नाती , कुटुंब पुन्हा पूर्ववत होणं मुळीच सोप्पं नाही.क्वचितच अशी कुटुंब असतात जिथे गैरसमज दूर होऊन पुन्हा हसतं-खेळतं वातावरण निर्माण होतं.

कुटुंबात अनेकदा अशा काही व्यक्ती असतात..ज्यांना एकाच दोन करायची सवय असते.काहीही सांगून एकमेकांमध्ये निरर्थक असे वाद निर्माण करण्यासाठी ते संधीच शोधत असतात.पण यामुळे गैरसमज निर्माण होतो.मनामनाने जोडली गेलेली नाती सहजासहजी तुटतात…पण आतून तितकीच खचतात.कारण बऱ्याचदा चुकून सुद्धा गैरसमज होतो…आणि तो दूर करायला कधीतरी संधीच मिळत नाही.

किंवा संधी मिळाली किंवा प्रयत्न केले तरी त्याचा उपयोग मात्र शुन्य होतो.म्हणून इतकच सांगते , शक्य होईल तितकं समजून घ्यायला शिका , नसेल समजून घेता येत तर कमीत कमी कोणताही गैरसमज करून घेऊ नका.आणि इतरांनी तर मुळीच दुसऱ्याच्या आयुष्यात गैरसमजाच विष कालवायचा प्रयत्न करू नये. कितीतरी कुटुंब उध्वस्त होतात चुटकीसरशी….. केवळ त्या गैरसमजामुळेच…!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!