गुंतागुंतीशिवाय आयुष्य हे जगताच येऊ शकत नाही.
सुधा पाटील
(समुपदेशक)
आयुष्य….एक सुंदर अनुभव!… सुंदर नैसर्गिक देणगी!…. आयुष्य क्षणभंगुर….पण सौंदर्याचा…प्रेमाचा…. नात्यांचा जणू खजानाच असते.या जगात बुद्धीची देणगी लाभलेला मानव प्राणी! प्रत्त्येक माणूस हा वेगवेगळ्या विचारांनी….भावनांनी ओतप्रोत भरलेला असतो.प्रत्येकाची बुद्धीमत्ता भिन्न भिन्न असते.
जीवन जगताना येणारे प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात.त्यामुळे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगवेगळा असतो.पण हे आयुष्य अगदी साधं सोपं कधीच नसतं.आणि कोणाचंही नसतं.अन्न,वस्त्र, निवारा, आरोग्य,शिक्षण,काम या प्रत्येक मानवाच्या नितांत आवश्यक अशा गरजा आहेत.तसेच या गरजा भागविण्यासाठी माणूस कुटुंब बनवून राहतो.
किंबहुना समाजात तसंच रहावं लागतं.त्यामुळे या सर्व गरजा भागविण्यासाठी माणसाला सदैव धडपड करावी लागते.माणसांच्या काही गरजा दैनंदिन असतात तर काही गरजा कधी कधी पूर्ण करायच्या असतात.पण गरजांची पूर्तता केल्याशिवाय जगताच येत नाही.त्यामुळे अर्थप्राप्ती करावी लागते.अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.नातेसंबंध जपावे लागतात.
कारण माणूस हा समाजशील प्राणी आहे.तो एकटा राहू शकत नाही.त्यामुळे आयुष्याच्या वाटेवर अनेक अडचणी,संकटे,येत असतात.आर्थिक गुंते, नातेसंबंधातील गुंते, भावनिक गुंते असे अनेक गुंते आयुष्यात निर्माण होतात.हे गुंते सर्वच माणसाच्या जीवनात निर्माण होत असतात.
त्यामुळे गुंत्याशिवाय जीवन जगता येऊच शकत नाही.कारण आयुष्य म्हणजे अनेक प्रसंग, घटना यांचं मिश्रण असतं.हे प्रसंग,या घटना नेहमी आपल्या मनासारख्याच असतील असं नाही.आर्थिक प्रश्न, आरोग्यासंबंधीचे प्रश्न, कौटुंबिक प्रश्न, वैयक्तिक प्रश्न, भावनांचा गुंता…असे अनेक गुंते आपल्याभोवती वेढलेले असतात.हे गुंते सोडवत…. तडजोड करत….कधी कधी माघार घेत… कधी कधी धीर एकवटून मानवाला जगावंच लागतं.
कारण या सर्व गोष्टींविषयी कोणाचंही आयुष्य असूच शकत नाही.समस्या नाहीत… अपेक्षा नाहीत… अपेक्षाभंग नाही….दु:खं नाही….असा एकही माणूस या पृथ्वीतलावर नाही.फक्त माणूस आपलंच दु:खं कुरवाळत बसतो.त्यामुळे त्याला आपलंच दु:खं मोठं वाटत राहतं.पण आजूबाजूला पाहिलं की, लक्षात येतं की, आपल्यापेक्षाही इतरांच्या वेदना भयानक आहेत.
जगातला प्रत्येक व्यक्ती आपल्या मनात काहीतरी विवंचना घेऊन जगत असतोच असतो.त्यामुळे आपलं आयुष्य हे गुंतागुंतीची एक मालिका असते.हां….प्रत्येकाची ही मालिका घटना,प्रसंग, विवंचना यात भिन्नता असणारी असते इतकंच! मानवी मेंदूत एक विचारांची गुंफण असते.अनेक गुंते सोडवत पुढे जाण्याचं काम आपण करायचं असतं.माणूस गरीब असो….वा… श्रीमंत… त्यांच आयुष्य हे गुंतागुंतीची मालीकाच असते.त्यामुळेआपण गुंतागुंतीशिवाय जगूच शकत नाही.अनेक गोष्टींची गुंतागुंत याशिवाय आयुष्य असूच शकत नाही.
साधं सरळ आयुष्य हे नेहमी मिळमिळीत वाटू शकतं.जगण्यासाठी, किमान पोट भरण्यासाठी माणसाला धडपड करावी लागते.त्यानंतर मग ध्येय… मोठमोठ्या अपेक्षा यासाठी धडपड करावी लागते.मग त्यातच भावनिक गुंते असतात.एकंदरच काय मानवी जीवन हे अनेक गुंते घेऊनच जन्माला येत असतं.गुंत्यांशिवाय आयुष्य हे नसतंच.
म्हणूनच आपलं आयुष्य हे गुंतागुंतीशिवाय असूच शकत नाही.हे जेव्हा आपण मान्य करतो तेव्हा आपण हे गुंते सोडवत पुढे जात राहतो.मानवी मेंदू हा प्रचंड शक्तीशाली असतो.त्याचा वापर करता आला तर अनेक गुंते हे सहज सोडवता येतात.काही काही गुंते माणूस आपल्याच हट्टापायी क्लिष्ट बनवत राहतो.काही काही गुंते आपला अहंकार, अपेक्षा,अल्पबुद्धी यामुळे किचकट बनत जातात.
काही का असेना पण गुंतागुंतींना सोबत घेऊनच आपणास जगावं लागतं.फक्त आपलं मानसिक नियोजन उत्तम असेल तर आयुष्य हे अनेक गुंते सोबत घेऊन जगता येते.म्हणूनच संकुचित मनोवृत्ती न ठेवता या पृथ्वीतलावरील सर्व मानव प्राण्यांच आयुष्य हे गुंतागुंतीची मालिका आहे हे स्विकारून मस्त जगत रहायचं.कारण साधं, सरळ आयुष्य, हे कोणाचंच असू शकत नाही….
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
