Skip to content

गरजेपेक्षा जास्त चांगलं वागून आपणच आपल्यासमोर अनेकानेक समस्या निर्माण करतो.

गरजेपेक्षा जास्त चांगलं वागून आपणच आपल्यासमोर अनेकानेक समस्या निर्माण करतो.


गीतांजली जगदाळे


चांगलं वागणं हा एक चांगला गुण आणि अवघड काम आहे. वाईट वागणं सोप्प असत, पण चांगलं वागणं खरंच अवघड असत. वाईट वागून खूप गोष्टी मिळवता येतात, चुकीची कामं करून पैसा खूप सहजतेने मिळतो. पण चांगलं वागून, चांगली काम करणं, प्रामाणिकपणा ठेवणं याने सगळ्या गोष्टी मिळतात पण त्याला फार कष्ट आणि कधी-कधी वेळ ही लागू शकतो. आणि तेवढा धीर काही माणसांना धरवत नाही आणि मग ते वाईट मार्गाने जातात. योग्य मार्ग हा नक्कीच खडतर असतो. आणि त्यामुळेच त्यावर चालणं प्रत्येकाला जमत नाही. पण ज्यांना ते जमत आणि ते आयुष्यभर टिकून ठेवतात त्यांना सलामच केला पाहिजे.

पण चांगलं वागून आपल्याला काय मिळालं? असा कधी-कधी प्रश्न या माणसांना पडतो. त्याच कारण असं आहे की, आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा काही लोकं घ्यायला लागतात. कधी-कधी स्वतःच्या फायद्यासाठी आपला वापर करून घेतात. आणि जेव्हा त्यांचं काम होत, फायदा संपतो, तेव्हा आपल्याला अगदी सहज विसरून ही जातात. पण चांगलं वागणाऱ्या माणसाने मनापासून मदत केलेली असते, मग स्वतःचा असा वापर करून घेतलेला लक्षात आल्यावर त्याला त्याच्या वागणुकीवरच प्रश्न पडण्यास सुरुवात होते. आपलंच काही चुकलं की काय असं त्याला वाटू लागतं.

चांगलं वागणं हा गुण प्रत्येकात नसतो आणि म्हणूनच तो आपल्याला जपणं गरजेचं आहे. कारण आपल्याशी जेव्हा कोणी निस्वार्थी हेतूने चांगला वागतो, तेव्हा माणुसकीवरचा विश्वास अधिक घट्ट होऊ लागतो. आणि त्यामुळेच काही स्वार्थी लोकांसाठी आपल्या चांगुलपणावर प्रश्न उठवण्यापेक्षा आपण सावध राहून कोणी आपला गैरफायदा किंवा वापर तर करत नाही ना याची दक्षता घ्यायला हवी. आणि त्यासाठी डोळे झाकून विश्वास न ठेवणे योग्य. आपण जसे असतो तसं जग आपल्याला दिसत.

आणि त्यामुळेच चांगल्या माणसांना ते जग त्यांच्या सारखंच दिसत. आणि म्हणूनच ते अगदी सहजतेने कोणावरही विश्वास ठेवतात. पण जगात सगळी माणसे सारखी नसतात, आणि म्हणूनच आपल्या चांगुलपणाचा कोणी फायदा घेऊ नये याची खबरदारी आपण घ्यायला हवी. आपल्यातला चांगला गुण न बदलता त्याच रक्षण करायला हवं.

गरजेपेक्षा जास्त चांगलं वागून खरंच आपण आपलं नुकसान करतो का? तर याच उत्तर ‘हो’ असं देता येईल. गरजेपेक्षा जास्त चांगलं वागल्याने समोरची माणसे आपल्याला गृहीत धरायला लागतात. आपण काही केलं तरी हा माणूस आपली मदत करेन, चांगलं वागेन असं त्यांना वाटू लागत. आपण कसेही वागलो तरी हा आपल्याशी चांगलंच वागेल असं समजून त्यांना पूर्ण सूट मिळाल्यासारखी ती वागू लागतात. आणि त्यामुळे कधी-कधी ती आपल्याला माणूस म्हणून ही किंमत देत नाही. आणि त्यावेळी आपल्याला त्याचा मानसिक त्रास होतो.

मी सगळ्यांशी एवढा चांगला वागतो मग मला लोक असे का करतात, माझ्याशी असे का वागतात? असा आपल्याला प्रश्न पडतो. आणि मग तेव्हा आपण दोष आपल्या चांगलं वागण्याच्या वृत्तीला देऊ लागतो. खरंतर दोषी तो व्यक्ती असतो ज्याला आपल्या चांगुलपणाची किंमत नसते. पण तरीही आपलं अशा लोकांपासून संरक्षण करण्यासाठी आपल्यालाही एक लक्ष्मण रेषा आपल्यासाठी आखण गरजेचं आहे.

काही लोकांना असं वाटत की सगळ्या लोकांना मी आवडलो पाहिजे , कोणी माझ्या विरुद्ध जाता काम नये, आणि त्यांच्या या भावनेपोटी ते सगळ्यांना खुश करायचा प्रयत्न करतात. त्यांची मदत करतात, त्यांच्याशी चांगलं वागतात. चांगलं वागणं, आणि मदत करणं हे जरी चांगले गुण असले तरी ते अति करणं खूप स्ट्रेसफुल होऊ शकत. एकतर या माणसांचा स्वभाव तसा असतो म्हणून ते तसे वागत नसतात, तर लोकांना खुश करण्यासाठी वागत असतात.

इथे एक गोष्ट आपण सगळ्यांनीच लक्षात घेणं गरजेचं आहे, आपल्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक माणसाला आपण नेहमी खुश कधीच ठेवू शकत नाही. आणि प्रत्येकाला खुश ठेवण्याच्या मागे जर आपण लागलो तर आपण स्वतः खुश कधीच राहू शकत नाही. आपण सगळ्यांना आवडतो, सगळे आपल्याबद्दल चांगलं बोलतात याने जरी आपल्याला आनंद मिळाला, तरी तो फार काळ टिकत नाही.

त्यामुळे तुमचा स्वभाव असो वा नसो, चांगलं वागणं ही चांगली गोष्ट आहे, आणि समाजाला अशा माणसांची गरज सुद्धा आहे. पण वास्तविकतेचं भान ठेवून, आपल्या गरजा आणि समोरच्याला हवी असलेली मदत या सगळ्याचं भान ठेवून आपण मदत करूयात. पण ती मदत आणि ते चांगलं वागणं निस्वार्थी असणं हे नक्कीच महत्वाचं आहे.

कोणताही स्वार्थ असलेलं चांगलं वागणं काय कामाचं? आणि ते चांगलं जरी वर वर वाटलं तरी आतून पोकळच राहणार. पण एवढं करून ही कधी कोणी आपल्या चांगुलपणाचा फायदा घेतलाच तरी आपल्या वागण्यावर प्रश्न न उठवता किंवा स्वतःवर न रागवता आपण पुढच्या वेळी काळजी घेणं गरजेचं आहे. आणि चांगलं वागण्याची सवय ही जपण्याची गरज आहे.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

6 thoughts on “गरजेपेक्षा जास्त चांगलं वागून आपणच आपल्यासमोर अनेकानेक समस्या निर्माण करतो.”

  1. Vishal g. Shelke

    सत्य परस्तीती आहे , खुप सुंदर आहे लेख

  2. खूपच छान वाटला हा लेख वाचून इतके चांगले वागून लोक अडचणीत आलेले आहे. लोक गरज सरो व वैद्य मरो या सारखे वागतात.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!