Skip to content

खोलवर दुखावलेलं मन पूर्णपणे कोलमडून जाता कामा नये.

खोलवर दुखावलेलं मन पूर्णपणे कोलमडून जाता कामा नये….


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


मनातल्या सुन्न भावनांना
आज अचानक भरती आली…
आणि ठेचाळलेली जखम
भळाभळा वाहू लागली……

आपण अगदी सहजपणे एखाद्याचं मन दुखावतो.पण आपल्याला कल्पनाही नसते की ते इतकं खोलवर जाऊन दुखावलं असेल. ते कोलमडायला आलं असेल.कसलाही विचार न करता आपण तोंडाला येईल तसं बोलून जातो आणि हळवी मनं अगदी क्षणात दुखावतो.असचं काहीसं असतं या मनाचं.कधी जुन्या वेदनांना तिथे भरती येते आणि ते वाहू लागतं.

आपलं हे मन दिसत नसलं तरी अवतीभवतीच फिरत असतं.आणि हो ते फार नाजूक आणि संवेदनशील असतं.सहनशक्ती कितीही असुद्या पण मनावर छोटे छोटे जरी वार झाले तरी त्याला खूप त्रास होतो.त्याला सांभाळणं जरा अवघडच…!!

शरिराचं दुखणं गोळ्या-औषधं घेऊन बरं करता येतं.पण मनाचं दुखणं असं सहजासहजी बरं करता येत नाही.

मन इतकं दुखावलं गेलय की काही करावसं वाटत नाही. आणि आता पुन्हा त्या गोष्टीची आठवणही नकोशी वाटतेय.एकदा तरी या मनाला दुखावताना विचार करायचा नं…!! हे असं बरच काही आपण ऐकत असतो.आणि ते आपल्या बाबतीतही घडत असतं.

आपल्याला आपल्या मनाचा पसारा किती खोलवर पसरलाय हे माहीत नसतं. पण मन खोलवर दुखावलं गेलय हे मात्र क्षणाक्षणाला जाणवत असतं.

कळत नकळतपणे प्रत्येकाकडून मनं ही दुखावली जातात. ती इतकी खोलवर दुखावली जातात की कालांतराने ती पूर्णपणे कोलमडून जातील की काय अशी भीतीच वाटते.कारण एकदा मन कोलमडून गेलं तर त्याला पूर्वावस्थेत आणणं खूप कठीण असतं.असं खोलवर दुखावलं गेलेलं मन जर पूर्णपणे कोलमडून गेलं तर उरलेल आयुष्य जगायच कसं…???किंवा ती दुखावलेली माणसं आयुष्य जगणार तरी कसं..??

हे कुठेतरी आपल्याला समजत असतं. पण अशा वेळी आपण काय करायचं हे मात्र काही समजत नाही.कारण ती कोलमडलेली मनं पाहताना , मनं जाणून घेताना आपल्याच मनाची घालमेल वाढत राहते.कुठेतरी आपणच बंद पडतोय असं वाटतं.

डोकं दुखतय असं आपण कधीकधी समोरच्याला सांगतोही. पण तसच मन दुखतय मन दुखतय असं आपण कोणाला सांगतही नाही. दडवून ठेवतो त्या दुखण्याला एका भेदरणाऱ्या मनाच्याच कोपऱ्यात. ते खोलवर दुखावलेलं मन अगदी तळमळत असतं.मन मनाला टोचत राहतं.

आतल्या आत ते धुमसत राहतं.विस्तवासारखच स्वतः जळत राहतं.मन कोलमडून गेलेल्या व्यक्ती आयुष्यभर दुखाला मिठी मारून बसतात. हास्याच्या लाटा जणू त्यांच्या जगण्यातून हद्दपारच झालेल्या असतात. घशाला कोरड पडलेय की मनाची घुसमट होतेय तेच त्यांना कळत नाही. अक्षरशः तुटतात या व्यक्ती.

आणि ‘कोलमडलेल्या मनाला सावरणं म्हणजे डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप करणे नव्हे.’त्यामुळे खोलवर दुखावलं गेलेलं मन पूर्णपणे कोलमडून जाता कामा नये.नाहीतर त्या कोलमडलेल्या मनाला पुन्हा उभं करणं फार अवघड आहे. कारण ते कोलमडलेल मन सहजासहजी कुणाचं काही ऐकत नाही. मुळात ते काही ऐकायच्या मनःस्थितीतच नसतं.

मन कोलमडलेल्या व्यक्ती सगळं काही मनात कोंडून ठेवतात. स्वतःलाच एका कोपऱ्यात घट्टपणे बांधून ठेवतात.उगाचच कसेतरी दिवस काढायचे म्हणून काढतात. त्यांनी त्यांच्या जगण्याची इच्छा केव्हाच मारलेली असते. जिवंत चितेला त्या सरणावरती जाळतात. आणि श्रद्धांजली म्हणून कायमचं मौनही पाळतात.

खरचं त्यामुळे ह्या खोलवर दुखावल्या गेलेल्या मनाला कधीच कोलमडू देऊ नका.आणि मुळात कधी कुणी आपल्यामुळे असं इतकं दुखावलं जाणार नाही याची काळजी नक्की घ्या. कारण…ते कोलमडायला वेळ लागत नाही पण सावरायला मात्र खूप वेळ लागतो.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!