Skip to content

खूप दिवस झाले शांत झोप लागत नाही, याची काय-काय कारणे असू शकतात ?

खूप दिवस झाले शांत झोप लागत नाही, याची काय-काय कारणे असू शकतात ?


मेराज बागवान


‘झोप’ ही मानवी जीवनासाठी अत्यंत महत्वाची गरज आहे. झोप चांगली झाली की , दिवस चांगला जातो.स्वतःला ताजेतवाने वाटते.सर्व कामे सुरळीत पार पडू शकतात.दिवसभर प्रसन्न वाटते. आणि एकंदरीतच पूर्ण दिवसच ‘मार्गी’ लागतो. पण आजकाल आपण अनेक घरात पाहतो, तिथे कोणाला ना कोणाला झोपेविषयी तक्रार ही असतेच.’लवकर झोपच लागत नाही’, ‘शांत झोप लागत नाही’,’झोप लागेपर्यंत पहाट होते’

अशा प्रकारच्या अनेक समस्या आपण सगळेच कमी-जास्त प्रमाणात अनुभवत आहोत. पूर्वी फक्त वयाने वृद्ध असणाऱ्या व्यक्तींमध्ये ‘झोप न लागणे’ ही समस्या दिसून येत असे.पण आजकाल ८-१० वर्षाच्या लहान मुलापासून सगळेच ह्या समस्येने ग्रस्त आहेत.

मग ह्या ‘शांत झोप’ न लागण्याची काय बरे कारणे असू शकतात.’मानसिक ताण’ हे झोप न लागण्याचे मूलभूत कारण आहे.’शांत झोप न लागणे’ हे मानसिक अनारोग्याचे लक्षण आहे.मग हा मानसिक ताण का बरे येतो आणि त्याचा झोपेशी असा काय संबंध आहे ?

१) अतिविचार : बरेच वेळा आपण एखाद्या गोष्टीचा अति विचार करतो.तेच ते उगाळत बसतो.मग रात्री झोपायच्या वेळी देखील हेच विचार सतत मनात घोळत राहतात आणि मग आपण शांत पणे झोपू शकत नाही.

२) हळवे मन : हळवे मन खूप संवेदनशील असते.कोणी त्यांना थोडे जरी काही बोलले तरी ते त्या गोष्टी फारच मनाला लावून घेतात आणि मग झोपेच्या क्षणी देखील तीच ती गोष्ट आठवून रडवेले होतात आणि झोपू शकत नाहीत.

३) भूतकाळात रमणे : आपण सगळे भूतकाळात खूप अडकून पडतो.घडून गेलेल्या वाईट किंवा मनाला त्रास देणाऱ्या भूतकाळातील गोष्टी वारंवार आपण आठवतो .रात्रभर त्याच गोष्टींत गुंतून पडतो आणि मग शांत झोप हरवते.

४) शारीरिक व्याधी : कधी कधी शरीर व्याधींनी ग्रासलेले असते.काही आजार बळावतात आणि मग या सगळ्याचा ताण येऊन माणूस शांतपणे झोपू शकत नाही.

५) आर्थिक विवंचना : आजकाल बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहेत.पण जबाबदाऱ्या कमी होत नाहीत. व्यवसायात तोटा, अपुरे वेतन, किंवा अचानक नोकरी जाणे, कामावरून कमी केले जाणे किंवा कामच खूप काळापासून न मिळणे आणि त्यामुळे घरात पुरेसा पैसा न येणे.या सगळ्या गोष्टींमुळे आर्थिक चणचण भासते आणि ती व्यक्ती सुखाची झोप अनुभवू शकत नाही.

६) व्यावसायिक जीवनातील समस्या : कार्यालयातील कामातील काही अडचणी, दडपण, टार्गेट, अति काम, कमी मनुष्यबळ आणि त्या तुलनेने असलेले जास्त असलेले काम, कामाचे वाढलेले तास , या सगळ्यांमुळे मनावर प्रचंड ताण येतो आणि झोप लागत नाही.

७) अभ्यास ,स्पर्धा आणि करिअर : शालेय जीवनातील अभ्यास, वाढती स्पर्धा आणि करिअर टिकवून ठेवणे , ह्या सगळ्यात मनावर खूप जास्त दडपण येते.आणि मग या संबंधी विचार करूनच झोप नकोशी होते.

८) नातेसंबंध तुटणे : घटस्फोट, प्रेम भंग, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, एखादी प्रिय व्यक्ती कायमची सोडून जाणे, वारंवार होणारे कलह, विरह यामुळे देखील आपण शांत झोप लागू शकत नाही.

९) मोबाईल फोन चा अतिवापर : आजकाल सर्वच घरात अनेक लोकांमध्ये मोबाईल फोन चे व्यसन जडलेले दिसते.सोशल मीडिया चा अतोनात वापर, गेम्स, चॅटिंग ,सतत व्हिडीओ पाहणे या मुळे देखील शांत झोप होत नाही.

१०) वास्तव न स्वीकारणे : काही जाण वास्तवाशी स्पर्धा करतात.जे होऊ शकत नाही तीच गोष्ट करण्याचा अट्टहास धरून बसतात.जे कधी शक्यच नाही तेच त्यांचे मन मानायला तयार नसते.आणि म्हणून देखील अशी माणसे शांत झोप घेऊ शकत नाहीत.

अशी अनेक प्रकारची कारणे जी आपली झोप उडविण्यास कारणीभूत ठरतात. आणि मग आपण म्हणतो ,”खूप दिवसांपासून शांत झोपच लागत नाही”. झोप न लागणे हे आरोग्याच्या दृष्टीने खूप घातक गोष्ट आहे.त्यामुळे आपण , आपल्या शांत झोप न लागण्यामागची वरील प्रमाणे काही कारणे आहेत का हे वेळीच समजून घ्यावीत.आणि मग कारणे समजली की उपाय देखील करता येतो.

म्हणून स्वतःचे मानसिक-शारीरिक आरोग्य जपण्यासाठी समस्या शोधुयात, कारणे शोधुण्यात, त्यावर उपाय करूयात आणि या नंतरच मग आपण शांत झोपेचा आनंद अनुभवू शकू.

करून पाहाच!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “खूप दिवस झाले शांत झोप लागत नाही, याची काय-काय कारणे असू शकतात ?”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!