Skip to content

खाली मान घालण्याची वेळ येण्यापेक्षा खाली मान घालून चालणं केव्हाही परवडतं.

खाली मान घालण्याची वेळ येण्यापेक्षा खाली मान घालून चालणं केव्हाही परवडतं.


मेराज बागवान


आपण आयुष्य जगत असताना अनेक प्रसंग येतात.घरात, कार्यालयात, सार्वजनिक ठिकाणी अनेक गोष्टी घडतात.कधी कधी काही विशेष कार्यक्रम असतात. स्पर्धा, प्रतियोगीता , उपक्रम वगैरे अशा गोष्टी चालू असतात.आपण देखील त्यात सहभाग दर्शवितो.हिरहिरीने त्यात सामील होतो.अगदी उत्साह अंगात भरलेला असतो. पण कधी कधी ह्याच अति-उत्साहाने होत्याचे नव्हते होते आणि मग मान खाली घालण्याची वेळ येते.म्हणूनच कित्येक वेळा , खाली मान घालण्याची वेळ येण्यापेक्षा खाली मान घालून चालणं केव्हाही परवडतं.

एखादी गोष्ट करीत असताना प्रचंड आत्मविश्वास असतो.एखादे काम पूर्ण होणारच.मी एवढे प्रयन केले आहेत मग फळ हे मिळणारच ह्या अविर्भावत लोक जगत असतात.पण वास्तव वेगळेच असते.अंतिम निकालाच्या वेळी हाती काहीच लागत नाही आणि मग लक्षात येते, अरे आपला मार्गच पूर्णपणे चुकीचा होता.अरे, हे माझ्या लक्षातच आले नाही.मी माझ्याच विचारात सर्व काही करीत गेलो आणि हे असे झाले. म्हणूनच कोणतीही गोष्ट अति-आत्मविश्वासात करण्याऐवजी खाली मान खालून पूर्णपणे योग्य रित्या प्रयत्न करणे इष्ट असते.

एखादे कार्य करीत असताना, काही जण इतर सहकाऱ्यांना मदत करतात.पण कधी कधी असे होते जे मदत करीत आहेत त्यांनाच मुळी माहित नसते की मुळात ह्या कामात काय अपेक्षिले आहे. मग ते काम ,तो प्रोजेक्ट चुकला की मान खाली जाते.आणि पुन्हा सर्व घडी बसवावी लागते.

नात्यांमध्ये देखील अनेकदा एकमेकांचे भले व्हावे म्हणून प्रयत्न केले जातात.दुसऱ्याचे सगळे चांगले व्हावे म्हणून एक जण पूर्णपणे त्यात बुडून गेलेला असतो.मात्र दुसऱ्याचे काही तरी वेगळेच चाललेले असते. त्याचे मन दुसरीकडेच असते.आणि हे सर्व जेव्हा करणाऱ्याच्या लक्षात येते तेव्हा समजते की , अरे आपण त्याच्यासाठी इतके करीत होतो पण खरे तर त्याचा काहीच उपयोग नाही.त्याचे तर वेगळेच सुरू आहे.

आणि मग आपलीच मान खाली जाते.म्हणूच स्वतः आधी ठाम राहून, मान खाली घालुन स्वतःचे कर्म करीत राहावे.ज्याला खरेच तुमच्यावर विश्वास आहे, आपुलकी आहे तो स्वतःहून तुमच्याकडे येईल.तोपर्यंत स्वतःचे आयुष्य मान खाली घालून जगणे हेच शहाणपणाचे आहे.

सार्वजनिक जीवनात आपले एखादे काम पूर्ण व्हावे म्हणून काही जण आपल्याकडे पैशाची देखील मागणी करतात आणि तुमचे काम मी शंभर टक्के पूर्ण करून देतो असे आश्वासन देतात.आपण अडकलेले असतो.म्हणून अंध विश्वास ठेवून आपली महत्वाची कागदपत्रे, पैसे त्या व्यक्तीला देऊन टाकतो.

पण काही काळानंतर ती व्यक्ती गायब होते.आपले काम तर होतच नाही.पण आर्थिक फसवणूक, मानसिक त्रास या सगळ्याला सामोरे जावे लागते.आणि मग स्वतःचाच राग येऊन आपली मान खाली जाते.म्हणूनच असा अंध विश्वास ठेवून काम करून घेण्यापेक्षा स्वतः मान घालून स्वतःसाठी काम करणे योग्य असते.

नोकरीत तर अनेक प्रसंग येतात.कधी कधी वरिष्ठांची कोणतीच परवानगी न घेता, त्यांच्याशी चर्चा न करता काही गोष्टी केल्या जातात.आणि मग त्यात अपयश आले की त्यावेळी मग वरिष्ठांकडे धाव घेतली जाते.मग त्यावेळी बोलणी तर खावीच लागतात.पण स्वप्रतिमा देखील खराब होते.वरिष्ठांच्या नजरेतून तुम्ही उतरून जातात.आणि त्यांचा तुमच्यावर विश्वास राहत नाही.म्हणूनच अशा प्रकारे मान खाली जाण्यापेक्षा मान खाली घालून काम करणे शहाणपणाचे असते.

घरात देखील अनेक प्रसंग होतात.एकमेकांपासून काही गोष्टी जसे की आर्थिक बाबी, अडचणी लपविल्या जातात.उद्देश कितीही चांगला असला तरी एकमेकांना काही गोष्टी सांगितल्या जात नाहीत.आणि मग कठीण काळात काहीतरी बिनसते आणि एकमेकांपासून लपवून ठेवलेल्या गोष्टी बाहेर पडतात.आणि मग घरातील लोकांना वाटू लागते, अरे आम्ही सगळे असूनही याने आमची मदत घेतली नाही, विश्वास दाखविला नाही इत्यादी.आणि मग त्या व्यक्तीला आपण का असे वागलो याची जाणीव होते आणि मग खाली मान घालण्याची वेळ येते.

आत्मविश्वास असणे, स्वाभिमान असणे , स्वावलंबी असणे ही खूप चांगली गोष्ट आहे. पण मान खाली घालण्याची वेळ जर का येत असेल तर कुठेतरी ह्या सर्व गोष्टी नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते. मग यासाठी मान घालून चालणं देखील परवडत.मान खाली घालण्याची वेळ येऊ नये असे जर का वाटत असेल तर, स्वतःमध्ये बदल करता आले पाहिजे.स्वभावातील काही गोष्टी बदलाव्यात. ‘मी करतो तेच योग्य, किंवा मला वाटते अगदी तसेच होणार’ हा अट्टाहास प्रथम कायमचा सोडून दिला पाहिजे.आपल्या नियंत्रणात ज्या गोष्टी नाहीत त्याचा अतिविचार आणि त्या गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करू नये.

आपल्या नियंत्रणात एकच गोष्ट असते ती म्हणजे ,’स्वतःचे वागणे, बोलणे, भावना,स्वभाव, विचार, निर्णय आणि कृती’.आणि ह्या एकदा का आपण योग्य त्या वेळी, परिस्थितीनुसार नियंत्रित करू शकलो तर आयुष्यात कधीच मान खाली घालण्याची वेळ येणार नाही.

2 thoughts on “खाली मान घालण्याची वेळ येण्यापेक्षा खाली मान घालून चालणं केव्हाही परवडतं.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!