खरं प्रेम नेहमीच माफ करण्यासाठी प्रयत्न करत असते.
कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे
खरं प्रेम आणि खोटं प्रेम …मुळातच हे मानवाने निर्माण केलेलं वेगळं जग.पण या प्रेमाला खरं-खोटं असे शब्द जोडायची तशी गरजच नाही. कारण निखळ स्नेहभाव म्हणजे प्रेम..! प्रेम ही एक भावना आहे. ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. खरतर प्रेम म्हणजे काय हे कळायला आयुष्यही कमीच पडेल.इथे प्रेमाच्या व्याख्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत.
कोणतीही अशी या प्रेमाची ठराविक व्याख्याच नाही. आपल्याला प्रेम म्हणजे काय विचारल तर हल्ली केवळ प्रेयसी आणि प्रियकर यांना सर्रासपणे पुढे केलं जातं. प्रेम काय केवळ एकाच बंधात बांधलेल नाही. प्रेम म्हणजे आई , प्रेम म्हणजे बाबा , प्रेम म्हणजे निसर्ग , एखादी वस्तू .अशा कितीतरी वेगवेगळ्या बंधात प्रेम बांधलं गेलं आहे. प्रेम फक्त प्रेयसी नि प्रियकरावरच होऊ शकतं असं नाही. प्रेम कुणावरही होऊ शकतं …अगदी फुलपाखरावरही….!
पण हल्ली तर प्रेमाच्या संकल्पनाच बदलत चालल्या आहेत. हल्ली कोणत्याही प्रेमात स्वार्थीपणा जास्त नी निःस्वार्थीपणा कमी दिसून येतोय.
असं हे निःस्वार्थी प्रेम काय कामाच…? आणि असं म्हणतात प्रेम म्हणजे एखाद्याला त्याच्या गुण-दोषासकट स्वीकारणे.पण हल्ली असं काहीच होताना दिसत नाही.
उलट कुठे काय चुकलं तर लगेच टोकाला जाऊन समजून न घेता एकमेकांना दोष देण्यात वेळ घालवणारी ही तरूणाई असलेल प्रेम एका क्षणात संपवते.माझं तुझ्यावर प्रेम नाही , कधीच नव्हतं….वगैरे वगैरे बोलून प्रेमाला तिथेच संपवतात.इतकच नाही तर या प्रेमाला हत्येच स्वरूप केव्हा देऊन टाकतात तेही कळत नाही.( असा बदला घेणं म्हणजे प्रेम असतं…. अशी सूडबुद्धी याला कसं प्रेम म्हणायच…?) आणि हे केवळ प्रियकर आणि प्रेयसीमध्येच दिसून येतं असं नाही.
तर भाऊ-बहीण , किंवा अशा अनेक नात्यांमध्ये आजकाल केवळ स्वार्थी प्रेम दिसून येतं. भांडणं झाली तर एकमेकांना “sorry” बोलून पुढे जाताना कुणी सहसा दिसत नाही. चुका झाल्या , भांडणं झाली तर समजून न घेता त्याच व्यक्तीला सतत दोष देणे ,टोचून बोलणे म्हणजे प्रेम नसतं.जिथे नात्यांची कदर असते तिथे “क्षमाशीलता” पावसाच्या एका थंडगार सरीसारखीच बरसते.
असं म्हणतात की क्षमा मागणाऱ्यापेक्षा क्षमा करणारा खऱ्या अर्थाने मोठ्या मनाचा असतो.मोठेपणा म्हणून नाही पण किमान आपल्या माणसांना एक संधी देण्यासाठी क्षमाशीलता आपण अंगी बाळगयला हवी.क्षमाशीलता म्हणजे जणू माणसाच्या गुणांमधील एक सुंदर दागिनाच आहे.
मित्रांनो , खरं प्रेम नेहमी माफ करण्यासाठी प्रयत्नशील असतं.चुकलं तर दोष देण्यात ह्या व्यक्ती अजिबात वेळ घालवत नाही. चुकलं तर चुकू देतात , त्या चुका समजून घेऊन नव्याने पुन्हा वाटा मोकळ्या करून देतात.
कारण “चुकतो तो माणूस” हे त्यांना माहीत असतं.आपल्याकडून जशा चुका होतात तशाच चुका इतरांकडून होतात हे ते त्या क्षमाशील व्यक्ती समजू शकतात.माणसांपेक्षा चुका नक्कीच मोठ्या नसतात.त्यामुळे चुकांची पानं फाडता आली पाहिजे. खरं प्रेम तेच असतं जे रागावतं , रूसून बसतं , चिडतं-रडतं , ओरडतं आणि माफही करतं…जे कितीही चुका झाल्या तरी त्या चुका समजून सांगतं…त्या चुका सुधारण्यासाठी एक संधी निर्माण करून देतं.(उगाचच) केवळ “I love you, I love you” बोलणं म्हणजेच खरं प्रेम असतं असं नाही.
कारण आजकाल कोणत्याही नात्यात “I love you and I hate you ” चीच दरी जास्त वाढत आहे.मनासारखं झालं तर love you…आणि नाही मनासारखं झालं काही तर लगेच “hate you….. याला खरं प्रेम कसं म्हणायच….? वेळप्रसंगी “sorry” आणि “it’s okay” बोलायलाही जमलं पाहिजे.
मित्रांनो ,खऱ्या प्रेम माफ करण्यासाठी प्रयत्न करत असतं……याचच एक उदाहरण सांगायच झालं तर पहा….
आपली आई……! आपण तिच्याशी रोज कसे वागतो , काय बोलतो , याची आपल्याला जाणीवही नसते.कधी कधी आपण तिच्यावर ओरडतो , उगाचच राग काढतो पण ती हळवी आई “आपलच मुल आहे , आणि माणूसच आहे म्हंटल्यावर चुकायचाच….त्याला आपण नाही माफ करणार तर कोण करणार…? असा विचार करते.क्षणात आपल्या लेकराला माफ करते.किती क्षमाशील असते ती….!
शेवटी आईलाही आईचं मुल प्रिय असतं.त्याला असं खचलेलं , रूसलेल , तुटलेल ती फार काळ पाहू शकत नाही. कधी लेकरू येऊन “sorry” बोललं तर ती अगदी क्षणात माफ करते.कारण काय तर असा अबोला किती दिवस धरणार…?
हे झालं आईच उदाहरण… पण असं अनेकदा वेगवेगळ्या नात्यात घडत असतं. कितीही राग असला मनात तरी आतून सारख वाटत असतं की क्षमा करावी….यालाच तर खरं प्रेम म्हणतात.कारण आपण आपल्या जवळच्या व्यक्तींशी , प्रेम करणाऱ्या व्यक्तींशी फार काळ अबोल धरूच शकत नाही… मनातून कुठेतरी क्षमेचा पाझर त्यांच्यासाठी फुटतोच….!
खोटं प्रेम तुम्हाला क्षमा करण्याऐवजी सतत दोष देत राहील..चुक सुधारण्याची कदाचित संधीही देणार नाही. केलेल्या चांगल्या गोष्टी विसरून जाईन.क्षमा करायला काही कारणच नाही असं म्हणून मोकळं होईल. पण खरं प्रेम तुम्हाला क्षमा करण्यासाठी स्वतःहून संधी निर्माण करेन.तुम्ही केलेल्या चार चांगल्या गोष्टी आठवून क्षमा करण्यासाठी प्रयत्न तरी नक्कीच करेन….!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



एकदम माझ्या मनासारखं या लेखामध्ये वाचायला मिळाले त्याबद्दल लेखकाचे मनापासून आभार मानतो आणि खरोखरच हा लेख खूप मस्त होता