खरंच दिसू द्या की जगत आहात, नुसता श्वास चालू असणं म्हणजे जिवंतपणा नाही.
गीतांजली जगदाळे
खरं जगणं म्हणजे काय याची व्याख्या कदाचित प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. पण एक मात्र नक्की, नुसता श्वास चालू आहे म्हणजे जगतोय असं नक्कीच होत नाही. किंवा जरी तो माणूस जिवंत असला तरी त्याच्या जगण्याला फार अर्थ आहे असं म्हणता येणार नाही. श्वास घेणे म्हणजे जिवंत असणे, पण तो श्वास घेण्यापेक्षाही जास्त तुमचं जीवन आहे. oxygen घेणे आणि carbon dioxide सोडणे हे खऱ्या जगण्यापेक्षा नक्कीच सोप्प असत.
जवळपास आपण सगळे एकाच प्रकारचं आयुष्य जगत आलोय, असं मला वाटतं. म्हणजे कॉम्पुटर च्या स्क्रीन कडे बघत श्वास घेणं आणि सोडणं, तुमच्या पालकांना अपेक्षित असलेलं शिक्षण घेत घेत श्वास घेणं आणि सोडणं, नोकरी करणे. पोटापाण्यासाठी काही तरी कामधंदा करणे इत्यादी. फक्त हे करणं म्हणजे आयुष्य जगणं आहे का?
या सर्व गोष्टी नक्कीच स्वतः ला जिवंत ठेवण्यासाठी गरजेच्या आहेत पण त्याला जगणं म्हणता येणार नाही. आपण सर्वजणच ते करतो, म्हणजे माणूस असो किंवा प्राणी पण स्वतःला जिवंत ठेवण्यासाठीच्या सर्व गोष्टी नैसर्गिकरित्या प्रत्येक सजीवाला येत असतात. पण काही लोक खरंच असे सुद्धा आहेत ज्यांनी फक्त हा श्वास घेणे आणि सोडणे यापेक्षा जास्त काहीतरी केले आहे, खऱ्या अर्थाने जगून पाहिलं आहे. जिवंत असणे म्हणजे स्थिर असणे, आणि जगणं कदाचित अगदीच त्या उलटं आहे असं म्हणावं लागेल.
जगणं म्हणजे प्रत्येक क्षणात स्वतःला हरवून जाणे, श्वास घ्यायला अवघड होईल इथपर्यंत हसणे, आणि श्वास घेता न येण्याइतके रडणे. जगणे म्हणजे असं काहीतरी करणे ज्याने श्वास घ्यायलाच विसरून जाणे, त्यामुळेच जिवंतपणापेक्षा जगणं हे नक्कीच मृत्यूच्या जास्त जवळच आहे. जगणं म्हणजे आपलं एका क्षणात आपलं आयुष्य संपू शकत ही भावना मनात असून आपण त्यासाठी तयार असणे.
कारण आपण कोणीच इथे कायमचे रहिवासी नाही आहोत. प्रत्येकाची इथली वेळ वेगवेगळी असते पण प्रत्येकाला जाणं मात्र चुकत नाही. पण किती तरी गोष्टी आपण आयुष्यात मी कधीतरी हे करेन, ते करेन असं बोलून भविष्यासाठी राखून ठेवत बसतो. पण आपल्याला त्यासाठी वेळ मिळेल की नाही हे पूर्णपणे अनिश्चित असल्याने माणसाने जेवढ्या कमीतकमी गोष्टी गृहीत धरता येतील तेवढ्या धरव्यात आणि जास्त करून ज्या-ज्या गोष्टी आपल्याला जगण्याचा अनुभव देतात ते-ते सगळं करावं.
जगणे म्हणजे श्वास आत-बाहेर जाताना पाहणे नव्हे, तर काही अशा गोष्टी करणे ज्याने आपण श्वास घेणंच विसरून जाऊ. आपली आवड आणि संधी शोधणे, प्रवाहाविरूद्ध पोहणे आणि जवळजवळ बुडणे म्हणजेच जगणे आहे. त्या श्वासांसोबत, त्या क्षणांमध्ये तुम्ही जे करता ते जगणं. तुम्ही स्वतःचा मार्ग कसा बनवता, स्वतःला व्यक्त करण्यासाठी नृत्य, चित्रकला, इत्यादी पैकी कोणतं साधन निवडता यामध्ये खरं जगणं दिसत.
प्रत्येक जण एक ठराविक प्रकारचं आयुष्य जगतो आणि जवळपास सगळ्यांचं ते सेम च असत, फक्त फरक हा थोडा फार पद्धतीमधेच असतो. राहायला चांगलं घर, फिरायला गाडी, स्टॅंडर्ड लाईफ, चांगलं जेवण या व्यतिरिक माणसाला काय हवं असत? हे नाही मिळालं की माणूस दुःखी-कष्टी होतो.
राहायला घर, पोट भरायला जेवण, शिक्षण हे सगळं जीवनक्रम चालू ठेवण्यासाठी नक्कीच गरजेचं आहे , पण त्यापलीकडे जाऊन आपल्याला आपण जिवंत का आहोत? आपल्या आयुष्याचं ध्येय काय आहे? आपण का जन्म घेतला असावा? असे प्रश्न नक्कीच पडले पाहिजेत. कारण रोज उठून एकच routine follow करण्यासाठी नक्कीच आपला जन्म झालेला नसावा. हे करण्याबरोबरच अजून काहीतरी करण्यासाठी आपला जन्म झालेला असणार, आणि ते आपण शोधून काढलं पाहिजे.
एखादी गोष्ट मिळवण्यासाठी, एखाद्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी जीव ओतून कष्ट करणे, ती गोष्ट मिळो वा न मिळो , त्या ध्येयापर्यंत पोचू वा न पोचू पण तिथपर्यंतचा प्रवास ज्याला अनुभवता आला त्याला जगणं आलं.
यश-अपयश ही नंतरची गोष्ट असते पण परिणामांची चिंता न करता एखादया गोष्टीसाठी स्वतःला झोकून देणे म्हणजे जगणे होय.जे फक्त जिवंत आहेत त्यांना पाऊस पडला की झाडं कशी दिसतात किंवा चालत्या विमानातून उडी मारताना काय वाटतं हे लक्षात येत नाही. त्यांना जीवनातील संकटे आणि चमत्कारांचा अनुभव येत नाही. त्यांना दैनंदिन गोष्टींमधला साधा आनंद कधीच दिसत नाही किंवा पिढ्यान्पिढ्या लक्षात ठेवल्या जातील अशा आठवणी कोणत्या हे त्यांना कधीच कळत नाही.ते एखाद्याक्षणात कधीच हरवले जात नाहीत किंवा ते कधीही अज्ञाताने आश्चर्यचकित होत नाहीत
जिवंत असणे म्हणजे श्वास घेणे, खरे जगणे म्हणजे श्वास सोडणंच विसरणे.जिवंत राहणे ही एक नाडी आहे, खरोखर जगणे हे एक धावणारे हृदय आहे.जिवंत राहणे ही एक स्थिती आहे, खऱ्या अर्थाने जगणे म्हणजे ती स्थिती पार करणे आहे.जिवंत राहणे सोपे आहे, खरोखर जगणे कठीण आहे.जिवंत राहणे आरामदायक आहे, खरोखर जगणे म्हणजे कम्फर्ट झोन तोडणे होय.
जिवंत असणे ही एक प्रकारची निसर्गाने आपल्याला दिलेली भेट होय, आणि जगणे म्हणजे त्या भेटीचा आपण कशाप्रकारे उपभोग घेतो, तिची जाणीव ठेवतो आणि किंमत करतो, हे होय. जिवंत असणे म्हणजे डोळे उघडे ठेवून जगणे, आणि जगणे म्हणजे ते डोळे कधीच बंद न करता आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी, क्षणासाठी उत्साहित असणे, किंवा ते क्षण जगणे.
जिवंत राहणे विनामूल्य आहे, खरोखर जगणे म्हणजे प्रत्येक मिनिट खर्च करणे.जो खऱ्या अर्थाने जगतो तो कधीही इथला कायमचा निरोप घ्यायला तयार असतो, कारण एकूणाएक क्षण त्याने ,मनभरून जगलेला असतो.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


