Skip to content

“खरंच जीवन असं बॅलेन्स का होऊ शकत नाही??”

“खरंच जीवन असं बॅलेन्स का होऊ शकत नाही??”


मधुश्री देशपांडे गानू


“दोन घडीचा डाव

याला जीवन ऐसे नाव…”

खरंच माणसाचं जीवन दोन घडीचा डावच तर आहे. कधी सुखाचा तर कधी दुःखाचा! जीवन प्रवासात चालताना कधी फुलं वेचायची तर कधी काटेही आपले म्हणावे लागतात. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर काहीतरी मिळतं आणि काही कायमचं हातातून सुटून जातं. तरीही जमेल तितक्या आशावादाने माणूस पुढे जात राहतो. जे आहे ते आपलं मानायला शिकतो.

खरंच जीवन बॅलेन्स होऊ शकतं का?? खरं तर कोणाचंच जीवन आखीवरेखीव, चित्रातल्या सारखं सुरेख असं नसतंच. मनात प्रचंड दुःख, वेदना घेऊनही माणसं “I am fine” म्हणतात. रोजचा दिवस हसून साजरा करतात. कारण त्यांना दुसरा पर्यायच नसतो.

आज कितीतरी स्त्री-पुरुष आपल्या जोडीदाराच्या अकाली निधनानंतर अत्यंत समर्थपणे संसार पुढे नेत आहेत. अशा कितीतरी स्त्रिया आज समाजात आहेत ज्या आपल्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी नोकरी करून व्यवस्थित निभावतात. मुलांवर योग्य संस्कार करतात. सगळ्या आघाड्या अत्यंत शिताफीने छान सांभाळणार्या या स्त्रिया स्वतःचं आणि कुटुंबाचं जीवन बॅलन्स्ड ठेवतात. ही स्त्री शक्तीची अनेक रूपं इतकी भावतात मला. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री यशस्वी संचार करत आहे. ती शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आर्थिक, सामाजिक समतोल राखून आहे म्हणूनच ना!

आज जागतिक पातळीवर सलग दोन वर्षे आपण मृत्यूचं तांडव पाहत आहोत. कित्येक संसार उध्वस्त झाले. कुटुंबाच्या कुटुंब नाहीशी झाली. नोकरी व्यवसाय बंद पडले. तरीही जीजीविषु वृत्तीने  माणूस जीवन जगतोच ना!

पुरुषही कर्तव्य आणि जबाबदारीच्या ओझ्याखाली दबलेले असतात. त्यांनाही मोकळेपणाने मनातलं व्यक्त करण्याची संधी मिळतेच असं नाही. जीवन बॅलन्स नसतानाही ते कुटुंबासाठी, मुलाबाळांसाठी, त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी राबत असतात. स्वतःच्या आवडीनिवडी मागे टाकून चालत राहतात.

कोणाचेच आयुष्य इथे परिपूर्ण नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात काही तरी न्यून, उणीव आहेच. मुळात माणूसच कुठे परफेक्ट आहे?? प्रत्येक व्यक्तीत गुणदोष असतातच. फक्त जर ते त्याला नेमके ओळखता आले तर त्याला जीवन यशस्वीपणे जगायला मदतच होते. जीवन बॅलन्स करायला मुळात तुमची मानसिकता बॅलन्स हवी.

विचारांचा ताळमेळ, सुनियोजन, विचारांचे योग्य प्रकटीकरण, योग्य पद्धतीने विचार आणि कृती हे जर तुम्ही बॅलन्स ठेवलेत तर तुमचे नातेसंबंध ही छान टिकून राहतात. तुमचे व्यावसायिक संबंधही चांगले राहतात. मग आपसूकच जीवन बॅलन्स होतं. हा आयुष्याचा समतोल टिकवण्याची जबाबदारी आपापली प्रत्येकाची असते. स्वतः मध्ये काय कमी आहे हे ही नक्की माहीत असायला हवं. म्हणजे त्यावर मात करून पुढे जाता येतं. तसा माणूस हा प्राणी असमाधानी… नवनवीन इच्छा, स्वप्नं त्याला खुणावत असतात. पण याच इच्छा त्याच्या उद्याच्या आशा असतात. आणि या आशेवरच तो जीवनाचे एक एक पान उलटत असतो.

“जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तुच शोधूनी पाहे!” समर्थ रामदासांनी सांगून ठेवलं आहेच. पण ते “विचारी मना” असं म्हणत आहेत. म्हणजेच जीवन बॅलन्स नसलं तरीही तुमचं मन मात्र विचारी हवं. सांगोपांग विचार करणारं, समतोल राखणारं हवं.

संपूर्ण सुखी असं कोणीच नसतं. पण आपण समाधानी असूच शकतो. कारण समाधान हे आपल्या मानण्यावर आहे. आज अशा कठीण परिस्थितीतही आपण टिकून आहोत. नवा दिवस पाहत आहोत हेच भाग्य आहे. मग आयुष्य मनासारखं बॅलन्स नसलं तरीही या जगण्यावर आपण मनापासून प्रेम करू शकतो.

अपूर्णतेतही गोडी असतेच की! झाडावर फळे पिकली जसं चिकू, सीताफळ, आंबा, पेरू, पपई की पक्ष्यांना सर्वात आधी कळतं. आणि ते ही फळं अर्धवट खातात. तुम्हांला माहित आहे का? पक्ष्यांनी उष्टावलेली झाडावरची फळं जास्त गोड असतात. अगदी स्वानुभवावरून सांगते आहे. म्हणजेच अपूर्णतेतही ओढ, गोडी आहेच की! काहीतरी अजून मिळवायचे आहे या आशेने माणूस जगत राहतो. जीवन बॅलन्स, समतोल नसलं तरीही खुप सुंदर आहे. येणारा प्रत्येक क्षण भरभरून जगा. त्या क्षणापुरते तुम्हीं मनाने बॅलन्स्ड, संपूर्ण आनंदी व्हा…


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!