Skip to content

क्षुल्लक तक्रारींमध्ये अडकून पडाल तर येणारी मोठी आव्हाने तुम्हांला उध्वस्त करतील.

क्षुल्लक तक्रारींमध्ये अडकून पडाल तर येणारी मोठी आव्हाने तुम्हांला उध्वस्त करतील.


गीतांजली जगदाळे


ज्याच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स, संकटे नाहीत असा माणूस शोधून सापडणार नाही. पण खरे प्रॉब्लेम्स, संकटे किती असतात आणि आपण कशाकशाला प्रॉब्लेम्स समजतो हा मुद्दाच खरंतर फार महत्वाचा ठरतो. आयुष्यात येणाऱ्या छोट्या-छोट्या अडचणींची आपण तक्रार करत बसण्यात जर आपली मानसिक ऊर्जा खर्च करत राहिलो तर खरंच जेव्हा मोठं वादळ येईल तेव्हा आपल्यात त्याच्याशी लढायला किती ऊर्जा शिल्लक राहणारे?

आजकाल खूप अशी माणसं दिसतात जी फार छोट्या कारणांवरून हायपर होतात, सतत चिडचिड करतात. बघायला गेलं तर कारण एकदम छोटंसं असत, अगदी दुर्लक्ष केलं किंवा फार सिरिअसली नाही घेतलं तरी चालण्यासारखं असत. पण आपण मात्र असं न करता शुल्लक गोष्टींना सुद्धा अवास्तव महत्व देऊन पराचा कावळा करत बसतो. त्याने प्रॉब्लेम्स तर सुटत नाहीतच पण आपल्याला त्रास होतो तो वेगळाच.

पण आपल्या हे लक्षात येत नाही की असा हाताने स्वतःला त्रास करून घेतल्याने आपलंच मानसिक बळ कमी होत आणि खरं संकट येत तेव्हा पुरेसं बळ शिल्लकच नसल्याने आपण पूर्णपणे त्या परिस्थितीला सामोरेच जाऊ शकत नाही, आणि त्यामुळे माणूस लवकर खचतो.

अगदी उदाहरण द्यायचं झाल्यास, आजकाल covid -19 मुळे जी बंधन आलीत,त्यामुळे खूप लोकांना घरून ऑनलाईन काम करावं लागत. अगदी परवाचीच गोष्ट, माझी मैत्रीण काम करत असताना अचानक wifi ची range गेली, आणि तिची चिडचिड सुरु झाली. मी तिला म्हणाले, wifi वाल्याना फोन करून बघ काय प्रॉब्लेम झालाय , किती वेळ लागणारे परत चालू व्हायला, असं विचारून बघ?

तर तिने फोन केल्यावर कळलं की १५ मिनिटे तरी जाणार आहेत. मग अशा वेळेला उगाच त्रागा करून, शिव्या घालून, चिडचिड करून तर wifi परत चालू होणार नाही ना, त्यापेक्षा १५ मिनिटे वाट बघणंच तिच्या हातात आहे. मग त्या वेळेत स्वतः ला त्रास करून घेण्यापेक्षा शांत राहिलं तर कुठे बिघडलं? आता असं ना तसं १५ मिन. काम अडकूनच राहणार आहे त्याला काहीच पर्याय नाही,

पण त्यासाठी आपलं मानसिक स्थैर्य का म्हणून पणाला लावायचं? सांगायचं तात्पर्य हे आहे की, काही गोष्टी आपल्या हाताबाहेर असतात जिथे आपण काहीच करू शकत नसतो. अशावेळी त्रास करून घेण्यापेक्षा आहे ती परिस्थिती स्वीकारून त्यावर काय तोडगा काढता येईल याचा विचार करणं कधीही चांगलंच , नाही का!

आता हे खूपच शुल्लक कारण होत म्हणा. पण अजून एक उदाहरण द्यायचं झाल्यास, आपण सगळेच विनाकारण कितीतरी गोष्टी अशा करतो ज्याने आपल्याला त्रास होतो आणि तो वाढतच जातो. जस की कंपनी मध्ये आपण नोकरीला लागतो पण आपल्याला जेवढा पगार मिळतो त्याच्यापेक्षा जास्त पगार एखाद्याला आपल्याला पेक्षा कमी अनुभव आणि शिक्षण असून सुद्धा मिळतो तेव्हा आपल्याला असं वाटायला लागत की मी जेवढं deserve करतो किंवा मी ज्यास पात्र आहे ते मला मिळत नाही आणि हा पात्र नसून त्याला कसं काय बरं जास्त मिळावं?

आपण एवढे प्रामाणिक कष्ट करून इथंपर्यंत पोहचायचं आणि असच कोणीही येणार आणि त्याला आपल्यापेक्षा जास्त पगार, आपल्यापेक्षा कमी मेहनत करून मिळणार, हे कितपत योग्य आहे? तर यावेळी मी हे शुल्लक कारण आहे असं म्हणणार नाही. पण खूप मनाला लावून घेण्यासारखं देखील हे कारण नाहीए. ज्याच्या त्याच्या कर्मानुसार ज्याला त्याला फळ किंवा शिक्षा दोन्ही मिळत असत.

आता खरं सांगायचं तर आपण काय deserve करतो किंवा कशास पात्र आहे कशास नाही हे आपलं आपण ही सांगू शकत नाही. तुम्हाला आत्ता दोन-चार वर्षांचं,फार फार तर त्याही पेक्षा थोडं आधीच आठवत असेल, त्यामुळे तेवढं तुम्ही ठामपणे सांगतात पण त्या आधीच्या आयुष्यात आपण आत्ता पर्यंत कोणाशी कसं वागलो, कुठे चुकलो, कोणाला दुखावलं हे सगळंच सांगणं अवघड आहे. त्यामुळेच आपण काय deserve करतो काय नाही हे आपल्याला माहित नाही.

आणि शेवटी जरी मान्य केलं की तुम्ही जे deserve करता त्यापेक्षा तुम्हाला कमी मिळतंय, आणि जे वाईट तुम्ही deserve करत नाही ते मात्र तुमच्या वाट्याला येतंय तरी देखील मी म्हणेन की भोगण्याशिवाय आपल्याकडे दुसरा काय पर्याय असतो बरे? जे आयुष्यात येत ते स्वीकारून त्याला तोंड देण्याशिवाय आपल्याकडे कोणता चांगला पर्याय असतो? की रडत बसून, मी हे deserve करते/नाही करत अशी तक्रार करून ते भोग तर संपत नसतात ना! पण तक्रार करून आपण हाताने आपले प्रॉब्लेम्स वाढवत असतो हे मात्र नक्की !!

तक्रार करत बसण्याने आपण प्रत्येक क्षण जो तक्रारीमध्ये घालवतो त्यात आपलं मानसिक बळ गमावत असतो. आणि मग आयुष्यात जेव्हा डोंगरासारखी संकटे येतात तेव्हा मग आपण ते स्थिर राहून त्याला तोंड देण्यापेक्षा आधीच अर्धे गळून गेलेले असतो. त्यामुळे स्वतःच्या आयुष्याची इतरांच्या आयुष्याशी तुलना करत बसण्यापेक्षा आपल्या कर्माकडे लक्ष दिल्यास आपल्याला त्रास कमी होईल.

आणि आयुष्य आहे म्हंटल्यावर दुःख , संकटे येणार हे गृहीतच धरून चाललं पाहिजे, आणि त्यामुळे त्या बद्दल तक्रार करत बसण्यापेक्षा आहे ते स्वीकारून त्यावर मात कशी करता येईल हे बघितलं पाहिजे. आता आयुष्यात येणारी मोठं-मोठी संकटे, त्यांवर कशी मात करायची हे नक्कीच अनुभवावरून तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त चांगलं माहिती असणार. पण आपण कशाकशाची तक्रार करतो, त्यासाठी कोणाकोणाला दोष देतो, आणि सगळ्यात महत्वाचं त्यातलं काय-काय, किती वेळा टाळणं आपल्याला शक्य होईल याकडे थोडंसं लक्ष दिल्यास आपलंच आयुष्य सोप्प होण्यास आपल्याला मदत होईल.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

1 thought on “क्षुल्लक तक्रारींमध्ये अडकून पडाल तर येणारी मोठी आव्हाने तुम्हांला उध्वस्त करतील.”

  1. अतिशय चांगला दृष्टीकोन. पराचा कावळा करणे या स्वभावावर एक चांगला उपाय

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!