Skip to content

क्षणिक सुख घातक ठरू शकतं.

क्षणिक सुख घातक ठरू शकतं.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


सुमित हॉस्टेल वर राहतं होता. त्याच घर गावात होत व पुढील शिक्षणासाठी तो शहरात आला होता व त्याच्या राहण्याची व्यवस्था कॉलेजच्या हॉस्टेल वर करण्यात आली होती.

आता आता तो आला होता. कोणासोबत फार ओळखही नव्हती. जसे जसे दिवस जाऊ लागले त्याची इतर मुलांसोबत मैत्री होऊ लागली. आता हॉस्टेल लाईफ तर सर्वांना माहीतच आहे. इथे फक्त कॉलेज, अभ्यास याविषयी बोलण होण तर शक्यच नाही.

हॉस्टेल ओळखलं जातं तिथल्या मैत्रीसाठी, धमाल, मस्ती, वेगवेगळ्या गमती जमती तसेच अनेकदा केलेल्या गोंधळासाठी. या सर्व गोष्टीच मुलांचं कॉलेजच आयुष्य अविस्मरणीय करतात. तर अश्या या वातावरणात आता सुमित चांगल्या पद्धतीने रुळला होता.

मित्रासोबत फिरायला जाणं, पिक्चर पाहणं, पार्ट्या हे आता आयुष्याचा भाग झालं होत. सोबत अभ्यास चालू होताच. आता सर्वांच्या परीक्षा सुरू होणार होत्या. हॉस्टेल वर सर्व शाखांची, वेगवेगळ्या वर्षांची मुले एकत्र राहत होती. त्यामुळे परीक्षेच्या तारखा, त्यांचा वेळ सगळेच वेगळ होत. तरी सुमित ने मात्र लवकर अभ्यास करायला सुरुवात केली. त्याची अभ्यासात गती चांगली होती शिवाय त्याला मार्क देखील चांगले पडायचे. यावर्षी ही त्याला चांगले मार्क्स हवे होते.

असच एक दिवस सुमित रूम वर अभ्यास करत बसला होता. तेवढ्यात त्याचे मित्र आले. येताच त्यांनी गलका करायला सुरुवात केली. सुमितला ते अभ्यास पण करू देईनात. शेवटी कंटाळून त्याने पुस्तक बाजूला ठेवलं आणि त्यांना विचारलं, “काय झालं का इतका गोंधळ घालताय, काय खुरापत चाली आहे डोक्यात?” त्याच्यावर हसून त्याचा मित्र विनय जो वेगळ्या कॉलेज मध्ये होता व त्याच्याहून सीनिअर देखील होता तो म्हणाला, “काय नाय रे सुम्या आम्ही काही केलं नाहीये अजून तरी, पण करण्याचा प्लॅन मात्र आहे”.

सुमितला काही समजेना नेमके हे कश्याविषयी बोलत होते. विनयच अर्धवट बोलण पाहून त्यातला अजून एक जण म्हणाला, “ए विन्या अर्धवट बोलू नको. मी सांगतो काय प्लॅन आहे ते. सुमित आम्ही चार दिवसाची अलिबाग ट्रिप ठरवली आहे या आठवड्याची आणि तू आमच्यासोबत यायचं.

मस्त एन्जॉय करू यार.” हे ऐकुन सुमित म्हणाला, “अरे वेड लागलंय का तुम्हाला? परीक्षा आहेत काही दिवसात माझा नीट अभ्यास पण झाला नाही.आता का फिरायच सुचतय तुम्हाला? मला नाही जमणार यायला.” हे ऐकुन सर्व जण हसू लागले व त्याला बोलले, “काय तु सुम्या, लहान आहेस का? परीक्षा होतच असतात.

अरे आता मजा करणार नाहीतर कधी करणार? आणि तू तर आमचा स्कॉलर आहेस डुड. तू आरामात अभ्यास करशील. डोन्ट वरी यार. तू बिंधास चल. जास्त विचार करू नको.” त्याच्या या बोलण्यावर सुमितला पण वाटलं, अजून काही दिवस आहेत चार दिवसाने अस काय मोठं होणारे. आपण नंतर भरून काढू अभ्यास. तसंही मजा परत कुठे मिळणार. त्याने पण येतो म्हणून सांगितले.” ये हुई ना बात! चल आता तुझी बॅग भर आपण उद्या सकाळीच निघतोय.” अस म्हणून त्याचे मित्र निघून गेले.

दुसऱ्या दिवशी सर्व जण अलिबागला गेले. चार दिवस सर्वांनी खूप धमाल केली. त्यात कसली अभ्यास आणि कसल्या परीक्षा. जेव्हा ते हॉस्टेल वर परत आले तेव्हा सुमितला ल त्याच्या वर्गातल्या मित्राकडून समजलं की परीक्षेचं वेळापत्रक बदललं होत आणि प्रॅक्टिकल वैगरे अवघ्या एक दिवसात होत.

ऐकूनच सुमितला घाम फुटला कारण परीक्षेला वेळ आहे, तसच आताची ही मजा जास्त महत्त्वच समजून तो गेला होता. पण आता त्याचे परिणाम त्याला दिसत होते. कसलाही अभ्यास नीट झाला नव्हता. शेवटी व्हायचा तो परिणाम झाला. ज्या कॉन्फिडन्स ने तो मजा करायला गेला होता ते क्षणिक सुख त्याला महागात पडल, त्याच्या अभ्यासाला घातक ठरलं. त्याचे मार्क्स कमी झाले व त्याच्या पर्सेंटेज वर त्याचा परिणाम झाला.

सुमित प्रमाणे आपणही अनेकदा आताच्या पण क्षणिक सुखाच्या मोहात पडतो व त्यातून जे दीर्घकालीन नुकसान होत त्याला बळी पडतो. उद्या कोणी पाहिला आहे, आता आहे त्या क्षणात जगायचं त्याचा आनंद घ्यायचा असा अनेकांचा दृष्टिकोन असतो. पण आपण जे काही करत असतो त्याचे काही ना काही परिणाम घडत असतात.

आता जरी एखादी गोष्ट आपल्याला आवडत असली, आनंदी करत असली तरी गरजेचं नाही ती आपल्याला पुढे जाऊन फायद्याची असेल. दीर्घकालीन फायद्याची असेल. भविष्याची अतीचिंता न करता वर्तमानात जगायला पाहिजे हे जरी खरं असलं, योग्य असल तरी ते पुढच्या गोष्टीवर काही वाईट, चुकीचा परिणाम तर करत नाहीये ना हा विचारही आपण केला पाहिजे.

अनेक जण आपल्या आरोग्याचा विचार न करता वाटेल तास वाटेल त्या वेळी खातात, उद्या कोणी पाहीलाय अस यांचं म्हणणं असत. पण त्याचा व्हायचा तो परिणाम शरीरावर होतो. पैसे हातात आल्या आल्या जरा सुद्धा न साठवता उडवून टाकणं, जराही संयम न ठेवता आता बरोबर वाटत म्हणून वागणं ही सर्व याचीच उदाहरण आहेत. माणसाचं आयुष्य हे अनिश्चित गोष्टींनी भरलेल आहे.

कधी काय होईल सांगता येत नाही. पण म्हणून याचा अर्थ असा होत नाही की आपण आपल्या आयुष्याला स्वैर सोडावं. आपल्याला आपलं आयुष्य नीट हाताळता आल पाहिजे. म्हणूनच आपण जे काही करत आहोत, ज्या गोष्टी उपभोगत आहोत ते करताना त्यात अल्पकालीन आणि दीर्घकालीन फायद्याचा, आनंदाचं समतोल असला पाहिजे. आता जे करत आहोत त्याचा या क्षणाला आनंद मिळू दे.

पण ती गोष्ट अशी असावी ज्याचा भविष्यावर पण चांगला परिणाम होईल, चांगला नसेल.तर निदान नुकसान कमी होईल. ह्या दूरदृष्टीने आपण वागलो तर आपण गोष्टी नीट हाताळू पण शकतो आणि त्यातून आनंद पण घेऊ शकतो.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


 “आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!