Skip to content

“कोण कोण काय म्हणेल? यापेक्षा आता मला काय हवंय हे महत्त्वाचं वाटलं पाहिजे.”

“कोण कोण काय म्हणेल? यापेक्षा आता मला काय हवंय हे महत्त्वाचं वाटलं पाहिजे.”


मधुश्री देशपांडे गानू


“कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम हैं कहना..”

अतिशय लोकप्रिय गीत. तुम्हीं कसेही वागलात तरी लोक, समाज तुमच्याकडे पूर्वग्रहदूषित नजरेने पाहतोच. तुमच्याबद्दल judgemental असतोच. आणि हे व्यक्तीसापेक्ष ही आहे.

मी या आधीही अनेक वेळा लिहिले आहे. लोक काय म्हणतील?? असं काही अस्तित्वातच नसतं, असं प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे नेहमी सांगतात. पण लोक काय म्हणतील? याचा आपल्या मनात, विचारांवर एवढा पगडा असतो की त्याचा आपण बागुलबुवा केलेला असतो. तसे आपल्यावर संस्कार झालेले असतात.

आपण ज्या समाजात राहतो, ज्याचा आपणही एक घटक असतो. त्या समाज वर्तनाचे काही सामाजिक नियम असतात. ते आपण नक्कीच पाळायला हवेत. तारतम्याने समाजात वावरायला हवं. स्वतःचा आणि कुटुंबाचा मान अबाधित राहील एवढी जागरूकता वागण्यात हवीच. अर्थात हे ज्यांना मान्य आहे त्यांच्यासाठी हा लेख आहे. पण त्याचबरोबर वैयक्तिक आणि सामाजिक वर्तुळामधील पुसटशी रेषा ही ओळखता यायला हवी.

आपल्या मनावर लहानपणापासूनच इतक्या क्षुल्लक आणि कालबाह्य गोष्टींसाठीही लोकांची भीती घातली जाते. याचा अतिरेकच होतो. आजही कित्येक लग्नं ही केवळ सामाजिक, आर्थिक प्रतिष्ठा, लोक काय म्हणतील? या समजा पोटी केली जातात. मग ज्यांना आयुष्यभर एकत्र राहायचं आहे त्या मुलाचा/ मुलीचा विचारही घेतला जात नाही. कित्येक नातेसंबंध नकोसे असतानाही लोक काय म्हणतील? या भीतीपोटी आपण निभावत राहतो. कित्येक आयुष्यं यातच खर्ची पडतात.

तुम्हीं कितीही चांगले वागलात तरी कोणाच्या तरी दृष्टीने वाईट असताच.

स्वतःच्या प्रयत्नाने तुम्हीं यशस्वी होत असाल तर अकारण, काहीही संबंध नसताना, तुमची ओळख ही नसताना तुमचा प्रचंड मत्सर, तिरस्कार, ईर्षा असणारे लोक समाजात अस्तित्वात असतात. मग ते तुमची प्रतिमा मलीन करण्याचाही प्रयत्न करतात. पण म्हणून आपण आपला यशस्वितेचा राजमार्ग थोडाच बदलतो?? उलट आपण अधिकाधिक यशस्वीतेच्या पायर्‍या चढतो. आणि हे संकुचित, नकारात्मक लोक दिसेनासे होतात.

लोक तुम्हाला judge करतातच, पण यावर तुमचं आयुष्य, तुमचं घर, तुमचं कुटुंब चालत नाही ना! यावर तुमचं जीवन अवलंबून असतं का?? “कोण काय म्हणेल?” हा तुमच्या विचारसरणीचा दोष आहे. तुमचं कुटुंब, तुमचं आयुष्य, तुमचे आर्थिक व्यवहार, त्याचे नियोजन, त्याचे चांगले वाईट परिणाम, तुमची कर्तव्यं, तुमचे निर्णय, तुमच्या जबाबदाऱ्या हे सगळे यशस्वीपणे फक्त तुम्हीं निभावता ना! तुमचं घर चालवायला लोक येतात का हो?? मग तुमचं आयुष्य कसं जगायचं हे सांगणारे लोक कोण???

तुमचे वैयक्तिक निर्णय,  तुमची नाती, त्याची जबाबदारी, परिणाम हे सर्वस्वी तुमचे असतात. या सगळ्यामुळे तुमच्या आयुष्यात फरक पडणार असतो. लोकांच्या आयुष्यात नाही.. मग “लोक काय म्हणतील?” या अत्यंत निरुपयोगी, निरर्थक वाटणाऱ्या विचारांना थाराच का द्यायचा?

जोडीदाराच्या अकाली निधनानंतर एकटी स्त्री किंवा एकटा पुरुष समर्थपणे घर, कुटुंब सांभाळतात. काही पुनर्विवाह करतात. स्वतःच्या इच्छेप्रमाणे, आनंदाने स्वतःला हवं तसं जगू पाहतात. तर अनेक नवीन लग्न झालेली जोडपी स्वेच्छेने मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतात. हा संपूर्णपणे त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. यामध्ये लोकांना काय वाटतं? याला काडीमात्रही महत्त्व नाही.

प्रत्येक व्यक्तीने हे माझं आयुष्य आहे, मला हवं तसं माझ्या मनाप्रमाणे, आनंदाने, समाधानाने, शांततेने जगण्याचा मला पूर्ण अधिकार आहे, माझ्या आयुष्याची जबाबदारी पूर्णपणे माझी आहे हे जाणलं पाहिजे. आज आत्ता मला काय हवं आहे?, कशाने मी आनंदी होणार आहे? मी, माझे कुटुंबीय कसे सुखी, आनंदी होऊ शकतो? हे प्राधान्याने महत्त्वाचं आहे. मग कोण काय म्हणते? याची पर्वा करायचीच कशाला??

अर्थात आज झपाट्याने समाज बदलतोयं. जुन्या कालबाह्य चालीरीती, नियम आज मोडीत निघाले आहेत. बदलत्या काळाप्रमाणे जे लवचिक धोरण स्वीकारतात तेच प्रगती करतात. आज कोण काय म्हणेल याला फारसे महत्त्व उरलेले नाही.. नसावं.

प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे. तिला तिचा स्वभाव, अनुभव, आवडीनिवडी, स्वप्नं, इच्छा, विचारसरणी, निर्णयक्षमता, कर्तव्यं यानुसार त्याचे आयुष्य जगण्याचा हक्क आहे. मात्र हे व्यक्तिस्वातंत्र्य उपभोगताना सामाजिक जबाबदारी ही ज्याची त्याने ओळखली पाहिजे.  तरच आपण निश्चिंत मनाने जीवनाचा खरा आस्वाद घेऊ शकतो.

आज कित्येक मध्यमवयीन स्त्रिया कौटुंबिक जबाबदार्‍या, कर्तव्यं पूर्ण झाल्यावर स्वतःचे छंद जोपासत आहेत. स्वतःच्या मनाप्रमाणे मोकळेपणाने मुक्त जगू पाहत आहेत. जीवनाचा खरा आस्वाद घेत आहेत. कित्येक पुरुष स्वेच्छा निवृत्ती स्वीकारून स्वतःचे छंद, नवीन व्यवसाय सुरू करत आहेत. आता मुलांवरही पूर्वीसारख्या पालकांच्या मर्यादा नाहीत. अनेकविध आवडीची क्षेत्रे आज मुलांना खुली आहेत. आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याच्या अनेक संधी आज उपलब्ध आहेत.. पुनर्विवाह, लिव्ह-इन-रिलेशनशिप, समलैंगिक विवाह या पूर्वी असामाजिक वाटणाऱ्या गोष्टी आज समाज सहज स्वीकारत आहे.

आज, आत्ता मला काय हवं आहे? कशाने माझं आयुष्य आनंदी, समाधानी, सुखी होईल हे प्रकर्षाने अधोरेखित होतंय. “कोण काय म्हणेल?” हे शेवटी आपल्या विचारांमध्ये असतं. आपण नको त्या

विचारांचं खतपाणी घालून त्याला अवास्तव महत्त्व दिलेलं असतं. विचारांचं सुनियोजन आणि वास्तवादी निर्णय, कृती याने आपण आपलं जीवन सुंदर, समृद्ध, परिपूर्ण, आनंदी नक्कीच करू शकतो. आणि याने काही ठराविक “लोक” च म्हणजे तुमचे कुटुंबीय, तुमचे खरे मित्र मैत्रिणी हे नक्कीच आनंदाने “वाह वा!” म्हणतील…


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!