” कोणीतरी फक्त आपल्यासाठी आहे, ही भावना मनाला खूप उत्साहित करून जाते.”
मधुश्री देशपांडे गानू
” हमराज, हमखयाल तो हो,
हमनजर बनो….
तय होगा जिंदगी का सफर,
हम सफर बनो……”
खूप सुंदर शब्दांत एका मनाजोगत्या साथीदाराचे वर्णन केले आहे या गीतात. मानव हा प्राणी समूह प्रिय आहे. त्याला सतत स्वतःभोवती गोतावळा असलेला आवडतो. त्याला एकटं राहायला अजिबात आवडत नाही. सिद्धी प्राप्त झालेले साधूसंत हा एकटेपणा, एकांत सहज स्वीकारू शकतात.
पण आपण सामान्य संसारी माणसं. आपल्याला आपलं कुटुंब, नातलग, मित्र-मैत्रिणी असा सगळा सरंजाम लागतोच. सुखदुःखाच्या गोष्टी सांगायला, मनातलं अगदी मनातलं सांगायला, आनंद वाटून घ्यायला, कौतुक करून घ्यायला, हक्काने रुसायला, रागवायला, अगदी भांडण करायला सुद्धा आणि मग रूजवात घालायलाही. आपली हक्काची माणसं अशा सगळ्या भावना व्यक्त करायला हवीतच.
एकाच व्यक्तीच्या आयुष्यात अगदी जन्मापासून असे अनेक नातेसंबंध जोडले जातात. प्रत्येक नात्याचे भावबंध वेगळे, व्यक्तता वेगळी. आणि प्रत्येक नात्याचे अनुभव, समृद्ध होणंही वेगळं. वाढत्या वयाबरोबर नात्यांमध्ये ही प्रगल्भता येते. सगळीच नाती काही शेवटपर्यंत बरोबर नाही येत.
काही नात्यांचा प्रवास हा तात्पुरता असतो. काही नाती संपणं ही काळाची गरज असते. नवीन नाती जोडली जातातच की! संपूर्ण आयुष्याच्या प्रवासात अनेक प्रवासी भेटतात, दूर जातात. काही थोडे, खरे, आपले असलेले आपल्या बरोबर शेवटपर्यंत राहतात.
माणूस आयुष्यभर चांगले, आनंदी जीवन जगण्यासाठी अथक प्रयत्न करत असतो. पण आपण कोणासाठी तरी खास आहोत, कोणी तरी या जगात फक्त आपल्या साठी आहे याचा शोध घेत राहतो. जगण्यासाठी मूलभूत गरजा जशा आवश्यक असतात तसंच जगण्याची उर्मी कायम राहण्यासाठी फक्त आपलं माणूस प्रत्येकालाच हवं असतं. अशी व्यक्ती ज्याच्या आयुष्यात आहे तो सर्वार्थाने जीवन जगतो.
आपण कोणासाठी तरी खूप खास आहोत ही भावनाच मन उत्साहित करणारी, मनाला उभारी देणारी असते. प्रेम ही भावना इतकी प्रबळ आहे. आपलं कोणावर तरी निस्सीम प्रेम आहे यापेक्षाही कोणाचंतरी आपल्यावर खूप प्रेम आहे, आपण कोणाला तरी खूप आवडतो, कोणाला तरी हवे आहोत ही भावनाच आनंद देणारी आहे. अशा प्रेमाच्या माणसाची आयुष्यभर साथ लाभली तर आपण जीवन अधिक समृद्ध, भरभरून जगतो. प्रत्येक गोष्ट करण्यात आपल्याला उत्साह, उर्जा वाटते. एक वेगळीच उर्मी जाणवते.
आज आधुनिक सोशल मीडियाचा भडिमार आणि प्रचंड प्रॅक्टिकल झालेल्या जगात अगदी खरं प्रेमाचं माणूस मिळणे विरळाच. तात्पुरते प्रेमसंबंध, अनैतिक प्रेम संबंध, एकावेळी अनेक प्रेमसंबंध, त्यातच भावनिक, आर्थिक फसवणूक, बलात्कार, खून यासारखे निर्घृण गुन्हे अशा अनेक गोष्टी करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे असं फक्त आपल्यासाठी असणारं माणूस मिळणं कठीणच. तरीही आजही अनेक प्रेम लग्नं सफल होत आहेत. लग्नसंस्था अजूनही टिकून आहे. ती प्रेम आणि विश्वास यामुळेच.
प्रेम मग ते फक्त स्त्री-पुरुष एवढीच समाजाची संकुचीत नजर असते. बहुतेक वेळा हे प्रेम शारीरिक आकर्षणापायीच निर्माण होतं आणि हे आकर्षण संपलं कि प्रेम ही संपतं. खरं तर प्रेम ही निरंतर भावना आहे. या हृदयीचे त्या हृदयी असं अद्वैत आहे. शरीरा पलीकडे मनाने जोडलं जाणं हे अपेक्षित आहे. जी व्यक्ती तुम्हांला संपूर्णपणे ओळखते,
तुमच्या गुणदोषांसकट तुम्हाला स्वीकारते, निर्भिडपणे तुमच्याबद्दलची मतं मांडते, ठामपणे तुमचं काय चुकलं हे सांगते, तरीही फक्त तुमच्या भल्याचाच विचार करते, अशी एक व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात असणं म्हणजे प्रेम. मग ती व्यक्ती कोणीही असू शकते. अशी व्यक्ती खरंच तुमच्या आयुष्यात असेल तर अशा व्यक्तीला जपा. तिला कधीही अंतर देऊ नका. तिला कधीही दुखावू नका.
अवेळी अकस्मात नवरा गेल्यानंतर एका स्त्रीला तिची मुलं हेच सर्वस्व वाटू लागतं. त्यांच्याकडे पाहूनच ती उर्वरित आयुष्य उमेदीने जगते. त्यावेळी त्या वेळेपुरती मुलं तिच्यासाठी फक्त तिची अशी खास असतात. तिच्या जगण्याची ऊर्जा, उर्मी असतात. आज कितीतरी ज्येष्ठतम नागरिक आपल्या मुलां-नातवंडांमध्ये अगदी आनंदाने भरभरून जगताना दिसतात.
कित्येकांचे जोडीदार त्यांना सोडून गेलेले असतात. तरीही आयुष्याच्या या सायंकाळीही आपल्या मुलांना, सुनांना, मुलींना, नातवंडांना आपण हवे आहोत. ते आपली खूप छान काळजी घेत आहेत ही भावना त्यांना जगण्याची ऊर्जा, उर्मी देत राहते.
कोणीतरी फक्त आपल्यासाठी आहे ही भावना मनाला खरंच खूप उत्साहित करून जाते. आपल्यावर निर्भेळ प्रेम करणारी, आपल्या सुख दुःखात धावून येणारी, आपल्या छोट्या-मोठ्या संकटात प्रसंगात कायम आपल्या बरोबर असणारी, धीर देणारी, समजून घेणारी, रुसणारी, रागवणारी, कधीही साथ न सोडणारी अशी व्यक्ती प्रत्येकालाच हवी असते. ज्यांच्या नशिबात अशी साथ मिळते ते खरे भाग्यवान!
पण खूपदा निखळ मैत्रीतही प्रेम सापडतंच ना! इथे शारीरिक आकर्षण नसतं. ही मैत्री प्रगल्भ असते. लिंग भेद रहीत असते. असा एखादा मित्र, एखादी मैत्रीण तुमच्या आयुष्यात असणं खूप महत्त्वाचं आहे. मी नेहमी सांगते तसं “अशी एक व्यक्ती तुम्हीं तुमच्या आयुष्यात कमवायला हवी जिला तुम्हीं अगदी मनातलं सगळं सांगू शकता.”
जी तुमच्या या प्रवासात सातत्याने तुमची साथ-संगत करेल. तुम्हांला योग्य वेळी योग्य मार्ग दाखवेल. तुम्हांला समजून घेईल. तुमच्या एका हाकेसरशी धावून येईल. प्रेमापलिकडे असलेलं हे “मैत्र” जर तुम्हांला लाभलं असेल तर मात्र तुम्हीं खरंच नशीबवान आहात.. अर्थात हे मैत्र दोन्हींकडून समान पातळीवर असायला हवं.
अशा एका मैत्रामुळे तुमचा आयुष्याचा चढ-उतारांचा प्रवास सहज व्हायला मदत होते. तुमचा उत्साह टिकून राहतो. नवनवीन यशाच्या पायऱ्या तुम्ही सहज चढू शकता. कोणीतरी फक्त आपल्यासाठी आहे ही भावनाच तुम्हांला आयुष्य भरभरून आनंदाने जगण्याची उर्मी कायम देत राहते. तुमच्या आयुष्यातही असं प्रेम, मैत्र आहे ना!! नसेल तर सर्वार्थाने प्रयत्न करा असं प्रेम, असं मैत्र शोधण्यासाठी….
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



Beautiful ☝️