” कोणीतरी एक जण विश्वास घात करतो मग आपण सर्वांनाच ते लेबल का लावतो??”
मधुश्री देशपांडे गानू
“दिल ऐसा किसी ने मेरा तोड़ा,
बरबादी की तरफ ऐसा मोड़ा…
एक भले मानुष को
अमानुष बना के छोड़ा….. ”
“अमानुष” या हिंदी चित्रपटातील एक सुंदर गाणं. स्वतःच्याच नातलगांनी वारसाहक्कात केलेली फसवणूक, विश्वासघात आणि सोडून गेलेली प्रेमिका. या दोन्ही आघातांनी उध्वस्त, सैरभैर झालेला नायक, अभिनेता उत्तम कुमार यांनी अप्रतिम वठवला होता. मूळचा सहृदय असलेला पण आता संपूर्ण जगावरचा, माणुसकीवरचा विश्वास उडालेला आणि त्याच नैराश्यापोटी व्यसनांच्या आहारी गेलेला नायक. आजच्या आपल्या लेखासाठी याहून दुसरे उत्तम गाणं, उदाहरण असूच शकत नाही.
आयुष्यभर प्रत्येक व्यक्ती यशस्वी होण्यासाठी, पैसा कमावण्यासाठी धडपडत असते. पण खरं सुख, समाधान त्याला फक्त त्याच्यावर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या माणसांमध्ये मिळतं. आपल्यावर मनापासून प्रेम करणारी आपली जिवाभावाची मोजकी माणसे असावीत आणि आयुष्य सुरळीत चालेल एवढी यशस्विता असावी, खरे तर प्रत्येक व्यक्तीची हीच अपेक्षा असते. अर्थात आपण हे सामान्य संसारी माणसांबद्दल बोलतोय.
आयुष्याला रोज नव्याने सामोरं जाताना माणसाच्या स्वतःकडून, आपल्या प्रेमाचा माणसांकडून, समाजाकडून नक्कीच काही अपेक्षा असतात. प्रत्येकाला अनेक चढ-उतारांना, कठीण प्रसंगांना, संकटांना, अडचणींना तोंड द्यावं लागतं. प्रत्येकजण स्वतःच्या शारीरिक, मानसिक कुवती प्रमाणे या सगळ्याचा अनुभव घेत असतो. कोणी यातून लवकर बाहेर पडतं तर कोणाला वेळ लागतो. पण जीवन हे प्रवाही आहे ते पुढे सरकत राहतं.
पण अशा अप्रिय प्रसंगांचा कोणा आपल्याच व्यक्तीमुळे सामना करायची वेळ आली तर?? “विश्वासघात तीच व्यक्ती करू शकते जिच्यावर आपला ठाम विश्वास असतो.” एखादी परकी व्यक्ती आपल्याशी वाईट वागली तर फारसे वाईट वाटत नाही आपल्याला. आपली हक्काची, प्रेमाची, मैत्री असलेली, कुटुंबीय, नातलग यापैकी जर कोणी आपला विश्वासघात केला तर, मात्र आपल्याला प्रचंड धक्का बसतो. आपण अंतर्बाह्य हादरतो. आपले भावविश्व मोडून पडते.
हा धक्का पचवायला, वास्तव स्वीकारायला मन तयार नसतं. “आपण किती मनापासून पण आंधळा विश्वास टाकलेला असतो आपल्याच माणसांवर.” पण सगळीच माणसं सारखी नसतात ना! प्रेमाच्या, मैत्रीच्या नावाखाली फसवणूक करणारी, गोड गोड बोलून तुम्हांला जाळ्यात ओढणारी आणि नंतर स्वतःचं खरं रूप दाखवणारी माणसं असतातच.
एखाद्या नात्याबद्दल, आपल्या स्वतःच्या गुंतवणुकीबद्दल, समोरच्या व्यक्तीबद्दल आपण अवास्तव अपेक्षा करतो. आणि एक दिवस विश्वासघाताला सामोरं जावं लागतं.
उदाहरणार्थ, प्रियकर-प्रेयसी किंवा अगदी नवरा-बायकोच्या नात्यात एकाची मनापासून या नात्यात गुंतवणूक असते. खूप प्रेम असतं. विश्वास असतो. ती व्यक्तीच जणू संपूर्ण जग असते. पण दुसरी व्यक्ती मात्र स्वार्थी, अप्पलपोटी, काही हेतू मनात ठेवून वागणारी असते. आपण “प्रेम” या संकल्पनेच्या इतक्या प्रेमात असतो की वास्तवाचे भान आपल्याला येतच नाही.
समोरची व्यक्ती आपला फक्त वापर करून घेत आहे, हे लक्षात येत नाही. जेव्हा शारीरिक, मानसिक, भावनिक किंवा आर्थिक फसवणूक होते तेव्हा मात्र आपण कोसळतो. ज्याच्यावर स्वतःपेक्षा ही जास्त विश्वास ठेवला त्याने केलेला विश्वासघात आपण पचवू शकत नाही. आणि आपल्या सगळ्या जगावरचा, माणसांवरचा विश्वास उडतो. आपण त्याच नजरेने सगळ्यांकडे पाहू लागतो.
नोकरी-व्यवसायात सुद्धा अशा प्रसंगांना सामोरं जावं लागतं. आपली हातोहात फसवणूक होऊ शकते. प्रचंड आर्थिक नुकसान होऊ शकते. अशावेळी विश्वासघात झालेली व्यक्ती स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसते. परत उभं राहण्याची ताकदच उरत नाही कारण आता कोणावरही विश्वास ठेवावासा वाटत नाही.
पण एकदा वाईट अनुभव आला म्हणजे सगळेच तसे असतात असं नाही. एखाद्या स्त्रीचा किंवा एखाद्या पुरुषाचा वाईट अनुभव आला तर सरसकट सगळ्या स्त्रिया वाईटच असतात किंवा सगळे पुरुष वाईट असतात असं लेबल सगळ्यांना लावणे अजिबातच योग्य नाही. अशाने आपलं जगणं कठीण होईल ना!
मान्य आहे विश्वासघात झालेली व्यक्ती मनाने कोलमडते. तिचं सर्व स्तरांवर नुकसान झालेलं असतं. अतिव दुःख होतं. यातून बाहेर पडायला, सावरायला वेळ तर लागतोच. पण म्हणून माणसांवरचा, माणुसकीवरचा विश्वास गमवायचा नाही. “आजही चांगली माणसे या जगात आहेत म्हणून हे जग सुरू आहे.” एक वाईट अनुभव हे आपलं संपूर्ण आयुष्य असू शकत नाही ना!
जीवन एकदाच मिळतं आणि ते अतिशय सुंदर आहे. एका विश्वासघाताने ते झाकोळून जाता कामा नये. प्रेम, विश्वास या अतिशय सुंदर भावना आहेत. स्वतःला, प्रेमाला पुन्हा एकदा अनुभवायची संधी आपण नक्कीच दिली पाहिजे.
यासाठी आपण काही गोष्टी नक्कीच करू शकतो. ज्यामुळे या विश्वासघाताच्या धक्क्यातून, या मानसिक, भावनिक पडझडीतून आपण लवकर सावरू शकतो. आणि पुन्हा नव्या उमेदीने, आशेने आयुष्याला, नवीन नात्यांना समर्थपणे सामोरे जाऊ शकतो.
१) सर्वात प्रथम अगदी प्रेमाचं नातं असो किंवा व्यवसायातील भागीदारी किंवा स्थावर-जंगम व्यवहार आज अत्यंत सावध असणे गरजेचे आहे. कशासाठीही आणि कोणासाठीही आंधळेपणाने वाहवत जाणं योग्य नाही. स्वतःचा आत्मसन्मान, स्वाभिमान जपणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
२) स्वतःच्या मनाचा आवाज वेळीच ऐकायला शिका. एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या घटनेबद्दल तुमचं मन तुम्हांला काहीतरी सांगत असतं, जागरूक करत असतं. तुमचे अंतर्मन तुम्हाला काय सांगतं हे नक्की ऐका. एखादी व्यक्ती योग्य नाही असं जर तुमचं मन तुम्हाला सांगत असेल तर बहुतेक वेळा ते खरं असतं.
३) अगदी प्रेम असो किंवा व्यवहार आंधळेपणाने करू नका. डोळसपणे, वास्तवाचे भान ठेवून निर्णय घ्या.
४) आत्ता या क्षणी मला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे. काय घडून गेलं किंवा काय घडणार आहे याचा फार विचार करू नका. आत्ता या क्षणी जर मला योग्य वाटतंय, आनंदी वाटतंय तरच पुढे जा.
५) विश्वासघाताला सामोरं जावं लागलं तर अतोनात दुःख, निराशा पदरी येते. तरीही हे दुःख किती तीव्रतेने अनुभवायचं? किती काळ अनुभवायचं? हेही महत्त्वाचं आहे. दीर्घकाळ तुम्ही ही निराशा धरून बसलात तर तुमच्या आयुष्यात तुम्ही पुढे कसे जाणार??
६) तुमचं आयुष्य ही फक्त तुमची जबाबदारी आहे. विश्वासघात करणारी व्यक्ती वाईट वागून निघून जाते. याचा कधीही स्वतःला दोष देऊ नका. स्वतःचा आत्मविश्वास ढळू देऊ नका. ७) पुन्हा नव्याने, उत्साहाने आयुष्याला माणसांना सामोरे जा. एक वाईट अनुभव आला म्हणजे दरवेळी तसेच अनुभव येतील ही भीती मनातून काढून टाका.
८) मुख्य म्हणजे एकदा विश्वासघाताचा अनुभव घेतल्यानंतर त्या अनुभवाने तुम्हाला काय शिकवलं, हे लक्षात घेणे जास्त महत्त्वाचे आहे. आपल्याही काही चुका असतील तर त्या पुन्हा होऊ नयेत यासाठी नक्की खबरदारी घ्या.
माणसांमधील चांगल्या वृत्ती वर, प्रेमावर, माणुसकीवर विश्वास कायम ठेवा. तुमच्या जीवनाचे शिल्पकार फक्त तुम्हीच असता. स्वतःला, स्वतःच्या सुंदर आयुष्याला नव्याने एक संधी नक्की द्या. पुन्हा नव्याने आयुष्य बहरेल या सकारात्मकतेने नवी सुरुवात करा. आणि बघा.. प्रेम, आनंद, सुख, समाधान तुमच्यासाठी घेऊन आयुष्याची सुंदर पहाट तुमच्या स्वागतासाठी उत्सुक असेल…..
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

