कोणासाठीही आपलं आयुष्य तळमळू देऊ नका !!
मेराज बागवान
आपल्या आयुष्यात अनेक माणसे येतात -जातात.काही फक्त नावानिशी आपल्या आयुष्यात असतात तर काही आपले नाव जणू आपल्या हृदयात, मनात कोरून जातात.
ही माणसे कधी रक्ताची असतात तर कधी असेच ऋणानुबंध जुळलेली असतात. प्रत्येकाशी आपली एक वेगवेगळी नाळ जुळू लागते.माणूस हा समाजशील प्राणी आहे. तो माणसाशिवाय राहू शकत नाही. पण ह्या सगळ्यात कोणामध्ये किती गुंतायचे आणि स्वतःला किती तळमळून घ्यायचे हे आपल्या हातात असते.
आयुष्यात अनेक अशा घटना घडतात की तेव्हा मन सैरभर होते.मन थाऱ्यावर राहत नाही.माणूस शांत होतो, कोणापाशी काही बोलून दाखवत नाही, पण आतल्या आत मात्र कुढत राहत असतो. ह्या सगळ्याला कारण ना कोणी व्यक्ती असते , ना कोणती परिस्थिती.तर या सगळ्याला आपण स्वतःच जबाबदार असतो.कारण आपण आपले मन भरकटू देतो आणि संपूर्ण आयुष्यच तळमळून घेतो.
प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र असते.प्रेमात नकार मिळाला तर संपूर्ण आयुष्य बरबाद करणारे लोक देखील ह्या जगात आहेत.मला कोणी स्वतःहून फोन करीत नाही, समाज माध्यमांवर कोणीच स्वतःहून माझ्याशी बोलत नाही,मी जर का बोलले/बोललो तर त्यावर काही प्रतिसाद देत नाहीत.असे विचार करणारे आणि आपले आयुष्य तळमळून घेणारे देखील अनेक आहेत.
पण इथे प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, प्रत्येकाला स्वतःचे असे खाजगी आयुष्य असते, प्रत्येकाचे प्राधान्यक्रम वेगवेगळेअसतात.प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी असतात , जबाबदाऱ्या असतात.त्यामुळे आपल्याला हवे तसे ती व्यक्ती नाही वागू शकत.म्हणूनच, माणसाने भावना जपल्या पाहिजेत , पण कोणत्याच प्रकारची अपेक्षा किंवा बळजबरी कोणीच कोणाकडून ठेवू नये.
कधी कधी असे होते , आपल्या जवळचे कोणी खूप दुर्धर आजाराने ग्रासलेले असते.काळजी वाटणे साहजिक आहे, पण त्याचबरोबर काही वेळेस व्यावहारिक देखील वागावे लागते.कारण कितीही काहीही झाले तरी , कुणाचे आयुष्य कोणासाठी थांबत नाही.आणि कोणी ते थांबवू देखील नये.पण काही जण असे असतात की , स्वतःचे आयुष्य पणाला लावतात आणि असे वागू लागतात की अमुक एका व्यक्तीचे सर्व काही नीटनेटके झाल्याशिवाय मी आयुष्यात पुढे जाणार नाही.
पण असे करून चालत नाही .कारण कोण कधीपर्यंत ह्या जगात आहे हे कोणीच सांगू शकत नाही.म्हणून आहे ते आयुष्य सकारात्मकरित्या जगून पुढे जाणे गरजेचे असते.
काही जण स्वतःच आयुष्य कुणासाठी इतके तळमळून टाकतात की त्यांना त्यांच्या आयुष्याचा देखील विसर पडतो.आणि ह्या सगळ्याला कारण म्हणजे, भावनांचा योग्य रित्या निचरा न करता येणे , किंवा भावनिक समतोल साधता न येणे.
अमुक एक व्यक्ती माझ्याशी कधीच प्रेमाने बोलत नाही म्हणून काही जण इतके झुरत बसतात आणि आयुष्यातील अनमोल वेळ वाया घालवतात. मग त्यांना त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील गोष्टींचा देखील विसर पडू लागतो आणि त्याचे आयुष्य तळमळीत च जाते.
म्हणूनच इथे सांगावेसे वाटते, आयुष्य तसे खूप लहान असते.इथल्या प्रत्येक गोष्टीचा मनमुराद आनंद घेता आला पाहिजे. कोणीतरी व्यक्ती ह्या जगातून निघून गेली म्हणून कायमचे दुःख करून , आपले आयुष्य तळमळू देऊ नका.हे घडणार असते ते घडतेच.आपण फक्त आहे ते आयुष्य स्वीकारणे , हेच फक्त करू शकतो.कोणासाठीतरी विश्वासाने थांबणे वेगळे आणि कोणीतरी कायमचे आपल्या आयुष्यातून निघून गेल्यानंतर देखील त्या व्यक्तीसाठी झुरत राहणे हे वेगळे. ह्या दोन्हीं मधील फरक समजला पाहिजे.
आयुष्यात आपल्याला अनेक निर्णय घ्यावे लागतात. कधी कधी शेवटी दोन पर्यायामधून फक्त एकच पर्याय निवडणे आपल्या हातात राहते. कधी मनावर दगड ठेवून नको वाटणारा निर्णय घ्यावाच लागतो, कधी स्वतःच्या भल्यासाठी तर कधी इतरांच्या भल्यासाठी. पण कोणतातरी एक निर्णय घेऊन पुढे जाणे गरजेचे असते. जरी मनाविरुद्ध निर्णय घ्यायची वेळ आली तरी देखील आयुष्य तळमळू न देता , खऱ्या अर्थाने घेतलेला निर्णय पाळता आला पाहिजे.
तुम्ही म्हणाल , माणसाला मन असते , आम्ही काय दगड नाही, आम्हाला भावना आहेत. हो , हे अगदी खरे आहे .पण आपल्याला जर का एखादि गोष्ट खरोखरच हवी असेल तर त्यासाठी फक्त तळमळत बसण्याऐवजी, ती गोष्ट आयुष्यात आणण्यासाठी अतोनात प्रयत्न करणे गरजेचे असते. आपल्या हातात दोनच गोष्ट असतात.एक म्हणजे , जे होत आहे ते होऊ देणे आणि दुरसे म्हणजे हे होत आहे ते बदलण्यासाठीची जबाबदारी घेणे.स्वतःचे आयुष्य तळमळून जगण्यापेक्षा , हिंमत दाखवून जबादारी घेणे महत्वाचे असते.
आयुष्यात असे अनेक टप्पे येतील जेव्हा तुम्ही तळमळू लागाल, तेव्हा एकच गोष्ट स्वतःला विचारा की, ‘खरेच माझे आयुष्य इतके स्वस्त आहे?’.
विधात्याने आपल्याला खूप मौल्यवान आयुष्य दिलेले आहे .ते मनमुराद जगा आणि स्वतःचे आणि इतरांचे आयुष्य देखील आनंदी बनवा.
आनंदी, समाधानी आणि शांतीमय जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



Very nice… Super