Skip to content

कोणाशीही वाद घालून स्वतःची इम्युनिटी पॉवर कमी करू नका!

कोणाशीही वाद घालून स्वतःची इम्युनिटी पॉवर कमी करू नका!


सोनाली चेवले


आजकाल असं झालंय की एखाद्या खुप छोट्या गोष्टीवरूनही आपण एखाद्याला काही बोललं की समोरची व्यक्ती लगेच तलवार उगारायला तयारच असते. ते ना ऐकून घेण्याची तसदी घेतात ना समजून घेण्याची. आणि मग आपलाही पारा चढतो. अरे ला कारे करत आपणही त्यात उडी मारतो, आणि मग मनस्ताप सहन करत बसतो. अशा व्यक्तींसोबत वाद घालण्यात अर्थ काय. आपण त्यात जिंकलो – हरलो तरी उपयोग काय?

एकतर आपला वेळ आणि एनर्जी आपण फुकट वाया घालवत असतो आणि परत मनस्ताप वेगळा.

जरी आपण त्या व्यक्तीच्या चांगल्यासाठी जरी बोलत असलो आणि त्याला हे कळतच नसेल तर काय उपयोग. मतभेद असले, आपल्याला काही पटत नसेल तर ते व्यवस्थित बोलूनही सांगता येतं. पण त्यासाठी त्या दोन्ही व्यक्ती समजदार असायला हव्यात. त्यांना जिंकणं किंवा हरणं ह्यापेक्षा चूक काय नि बरोबर काय हे महत्वाचं असलं पाहिजे.

मुळात वाद होतातच का? तर प्रत्येकाला वाटतं की माझंच बरोबर आहे. आणि मग आपले जे विचार असतील त्याच्या थोडे पण वेगळे विचार एखाद्याचे असले की आपल्याला ते पटत नाही. मग ह्यातूनच शाब्दिक चकमकी होतात. बाणेतून गेलेला तिर आणि तोंडातून गेलेले शब्द वापस येत नाहीत. आणि वादामध्ये माणसाचं संतुलन बिघडत जातं आणि आपण किंवा समोरची व्यक्ती काहीतरी असं बोलून जाते की ते त्यांच्या किंवा आपल्या खुप जिव्हारी लागतं.

आणि माणूस लाख गोष्टी विसरेल पण जिव्हारी लागलेले शब्द कधीच विसरत नाही. एक जरी शब्द जिव्हारी लागला तरी तोही विसरला जात नाही. जरी परत बोलणं पूर्ववत सुरू झालं तरी नातं पूर्वीसारखं राहत नाही. नंतर काहीजरी केलं तरी तो बाँड पूर्वीसारखा राहतच नाही.

आणि आपला एखाद्या अशा व्यक्ती/ व्यक्तींसोबत वाद झालाय ज्यांच्याशी आपला काहीही संबंध नाही, तर त्याचाही आपल्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतोच.

बऱ्याच जणांना असं काही घडलं की दिवसदिवस आणि कित्येक दिवस तेच आठवत राहतं. वाद होऊन दिवसं उलटतात पण आपल्या डोक्यात वाद सुरूच असतो. ह्यात फक्त आणि फक्त आपलं नुकसान आहे तेही अतोनात.

त्यामुळं ठरवूनच टाकायचं की संबंधातील असो किंवा नसो कोणत्याच व्यक्तींसोबत वाद घालत बसायचं नाही.

पण किती जरी ठरवलं तरी कधीतरी असं काही घडतं की वाद होतोच त्यावेळी वाद जिथे संपला तिथेच म्हणजे तिथेच सोडून द्यायचा. अगदी पुढच्या क्षणी त्याला नो एंट्री!

आपली मेमरी फक्त चांगल्या आणि उपयोगी गोष्टी स्टोअर करण्यासाठी आहे, तिथे असल्या फालतू गोष्टींना अजिबात जागा द्यायची नाही.

स्वास्थ म्हणजे स्वास्थ असतं. मानसिक शारीरिक वेगळं नसतं. मूळ रुपात ते एकच असतं. इन्फेक्शन वगैरे काही गोष्टी सोडल्या तर आपलं आरोग्य हे आपल्याच हातात असतं. आणि वाद घालून आणि नंतर त्याचा विचार करत बसून तर मुळीच आपल्याला आपली इम्यूनिटी पॉवर कमी करून घ्यायची नाही.

आपण कसे अन्न खातो, पाणी पितो त्याचा आपल्या शरीरावर जसा परिणाम होतो तसाच परिणाम आपण कसे विचार करतो ह्याचाही होत असतो. त्यामुळे फक्त चांगल्या विचाराचंच ग्रहण करायचं.

सद्गुरू म्हणतात की बाहेरच्या जगात जे होतं ते आपल्या हातात नसतं पण आपल्या शरीराच्या अंतर्गत काय व्हायला पाहिजे हे सर्वस्वी आपण हातात असायला पाहिजे.

राजकारणातला मूलमंत्र पाळायचा.. तोंडात साखर, डोक्यावर बर्फ आणि पायात भिंगरी ( म्हणजे वाद होण्याच्या आधीच पोबारा करायचा!) म्हणजे वादाचा विषयच नाही!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!