कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही ?? चला समजून घेऊया.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
माणसाच्या नात्यामध्ये विश्वासाला खूप महत्त्व आहे. लहान मुलदेखील जितकं आपल्या आईच्या जवळ असत, जात तितकं पटकन कोणाकडेही जात नाही. कारण ते सर्वात जास्त आपल्या आईवर विश्वासून असतं. जस जस वय वाढेल नाती वाढतात.
मग त्यामध्ये बाकीची माणसं, आपले मित्र, कामावरचे सहकारी, अशी अनेक जण येतात. आता ज्या लोकांशी आपलं चांगलं नात असत त्यांच्यावर आपण थोडीफार प्रमाणात का होईना विश्वास ठेवत असतो. आपल्या मनातल्या गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करत असतो. आपली सुख दुःख आपली अशी गुपित जी आपण अनेकदा आपल्या घरातील लोकांनाही सांगत नाही ती सांगतो. कोणत्या आधारावर? तर विश्वासावर. समोरची व्यक्ती आपलं ऐकून घेत आहे आपल्याला समजून घेत आहे, तसच ती आपलं गुपित कोणाला सांगणार नाही हा विश्वास आपल्याला असतो म्हणून आपण सांगतो.
पण सर्व माणसं सारखी नसतात. समोर माणूस चांगलं वागत असला, बोलत असला तरी ते दर वेळी खर असतच अस नाही. म्हणूनच म्हणतात ना, दिसत तस नसत म्हणून जग फसत. अस अनेकदा होत की आपण विश्वासाने समोरच्याला काहीतरी सांगितलेले असत आणि तो नंतर त्याचा गैरफायदा घेतो. यातून आपलं नुकसान होत. म्हणूनच आपल्याला कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही हे समजलं पाहिजे.
समोरचा माणूस कितीही चांगल्या ओळखीचा असला तरी त्याला आपल्या आयुष्यातील गोष्टी, गुपित किती प्रमाणात सांगायची हे माणूस पाहून आपल्याला समजलं पाहिजे. ते समजून घेण्यासाठी काही गोष्टी आपल्याला काळजीपूर्वक पहाव्या लागतात.
अस अनेकदा होताना दिसत की आपली एखाद्याशी चांगली मैत्री असते आणि तो माणूस आपल्याला दुसऱ्या कोणत्या तरी माणसाबद्दल सर्व काही सांगत असतो. त्यावर बोलण ही असच असत की तिने मला सांगितलं आहे की कोणाला सांगू नको तरी मी तुला सांगत आहे. इथे आपण विचार केला पाहिजे जर ही व्यक्ती दुसऱ्या कोणाचा तरी विश्वास तोडत आहे. ज्या माणसाने काहीतरी मनापासून सांगितलेले आहे ते आपल्याला गरज नसताना फक्त मजा म्हणून सांगत आहे ती व्यक्ती आपलं एखाद बोलणं किंवा एखादी गोष्ट दुसऱ्या कोणाला सांगणार नाही याला काय पुरावा आहे? उलट ती तस वागण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे स्वतःच्या काही गोष्टी सांगताना समोरची व्यक्ती जरी आपल्याशी चांगली असली तरी इतरांशी तिच असणार वागणं किंवा तिचा एकंदरीत स्वभाव पाहीला पाहिजे.
समुपदेशनामध्येही विश्वासार्हतेला खूप महत्त्व आहे. उपचार घेणाऱ्या माणसाची माहिती पूर्णपणे गुपित ठेवली जाते. याचं कारण हेच आहे की क्लाएंट खूप विश्वास ठेवून आपल्या आयुष्यातील समस्या किंवा अश्या गोष्टी ज्या तो दुसऱ्या कोणाला सांगू शकत नाही त्या सांगत असतो. अश्या वेळी जर समुपदेशक जर ती माहिती दुसऱ्या कोणाला सांगत असेल तर हे त्याच्या मूल्याच्या विरुद्ध आहे आणि कामावर देखील परिणाम करत.
म्हणून जर आपण कोणावर विश्वास ठेवत असू तर ती व्यक्ती आपली माहिती किंवा काहीही दुसऱ्या कोणाला सांगत नाही ना? तेवढ्या जवळची ती आहे ना ? हे पाहिलं पाहिजे.
कामाच्या ठिकाणी बरेच जण आपल्या प्रोजेक्ट चे डिटेल सहज बोलता बोलता आपल्याकडून काढून घेतात, आपणही विश्वास ठेवून बरेचदा बोलून जातो. पण याचा गैरवापर केला जातो. बरेचदा आपले डिटेल्स अशी लोक स्वतःच्या फायद्यासाठी वापरतात. आपल्या पर्सनल लाईफ मधल्या गोष्टींचा उपयोग आपल्या कामासाठी करून घेतात. म्हणून सहकाऱ्यांशी मैत्री जरूर असावी पण काही ठिकाणी मात्र आपल्याला प्रोफेशनल राहवच लागत. तो विचार आपण केला पाहिजे. अनेकांना इकडच्या गोष्टी तिकडे करून भांडण लावून देण्यात मजा वाटत असते. अशा लोकांना आपण कितपत आपल्या गोष्टी सांगायच्या हे आपल्याला समजलं पाहिजे.
आपल्या आयुष्यात शेवटपर्यंत माणसं येतच राहणार. पण समोर चांगला असलेला दर वेळी चांगला आणि प्रसंगी कठोर वागणारा वाईट अस असत नाही. आपले पालक, खूप जवळचे मित्र, मैत्रीण आपल्याकडून काही चूक झाली तर रागावतात, चूक सांगून देतात किंवा आपण चुकीच्या मार्गावर जात असू तर ते सांगतात. याचा अर्थ त्यांचं आपल्यावर विश्वास नसतो अस नाही. ते आपली काळजी करत असतात.
पण आपण आपल्या माणसांवर नाराज होऊन अश्या माणसांवर विश्वास ठेवतो जे आपलाच नंतर गैरफायदा घेतात. म्हणूनच माणसं कमी असली, मोजकी असली तरी चालतील पण ती खरच विश्वास ठेवण्यालायक असली पाहिजेत. कारण चकाकणारे दागिने खूप असतात पण सोन ते सोनच असत.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Very informative…..
खूप छान
Nice