कोणालाही सांगता न येणारं दुःख व्यक्तीला आतून पोखरून टाकते…
कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे
जगी सर्व सुखी असा कोण आहे….?
विचारी मना , तूची शोधूनि पाहे…!!
या ‘समर्थ रामदास’ यांनी लिहिलेल्या ओळी खरच विचार करण्यासारख्या आहेत. पाहिलं तर जगात सर्वत्र सुख आहे आणि पाहिलं तर सर्वत्र दुःख आहे. जगात प्रत्येकाच्या वाट्याला सुखं आणि दुःखं ही येतातच पण त्याच्या वेळा वेगवेगळ्या असतात.कधी ह्या घरात सुख खेळत असतं तर त्या घरात दुःख…..! सुख सांगता येतं पण दुःखाच काय…? “आज मी खूप खुश आहे ,आनंदात आहे.” असं आपण सहजपणे सांगतो.
पण “आज मी खूप दुःखी आहे , उदास आहे.” असं काही आपण सहजासहजी अजिबात सांगत नाही.अगदी जवळची व्यक्ती असेल तरीही तिला आपण आपलं दुःख सांगण्याची हिम्मत करत नाही.आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारची दुःखं येतात. त्यातलीच काही दुःखं सहज नाहीशी होतात.कापूर उडून जावा तशीच ती उडून जातात. तर काही एखाद्या व्यक्तीला सांगितली अर्थातच शेअर केली तरी ती हलकी होतात.
पण काही दुःखं अशी असतात जी सांगताच येत नाही. अगदी कोणालाही सांगता येत नाही. किंवा ती सांगावीशीच वाटत नाहीत.ती अशी दुःखं आतल्या आत त्या व्यक्तीला अक्षरशः पोखरून टाकतात. अशा दुःखामुळे ती व्यक्ती सहज कोलमडून पडते.
कुणाला सांगावं..? कसं नी कधी सांगावं..? सांगावं की नाही..? या प्रश्नांच्या गोंधळात ती व्यक्ती गांगरून जाते. काहीच कळत नसतं.आतल्या आत मन फक्त रडत असतं.त्याची घुसमट होत असते. कुणी म्हणेल की , असं काही नाही… आपण दुःख कुणाला ना कुणाला तरी शेअर करतोच , त्याशिवाय आपलं मन हलकं होत नाही , मनावरच ओझं उतरत नाही वगैरे….. एका बाजूने विचार केला तर हे मान्य आहे.
पण….दुःख कितीही व्यक्त केलं तरी काही दुःखं कितीदा सांगूनही हलकी होत नाहीत. ती दुःख आतल्या आत मनाला खातच रहातात.आणि हीच मनाला खात रहाणारी दुःखं कुणाला सांगता येत नाही.आणि आपण सांगतही नाही. दुःखाला घेऊन रोजचा प्रवास करत असतो. “तु तिथे मी” असा दुःखाचा नी आपला संगम झालेला असतो.
कुणाचं प्रेम त्रिकोणी तर कुणाच दुःख चौकोनी….!पण खरतर असा काही अंदाज बांधताच येत नाही कशाचा.आपल्याला अंदाज बांधायची सवयच झालेली असते . जसं की— ही जागा इतकी उंच नाही की यावरून पडल तर जास्त लागेल…किंवा ही जागा खूप उंच आहे , इथून पडल तर खूप लागेल.पण सुख-दुःख , प्रेम -आनंद यांची मापं काढण कधी शक्यच नाही.मग प्रश्न पडतो की अशी कोणती दुःखं असतात की जी मनाला , त्या व्यक्तीला पोखरून काढतात…? इतकी कशी खोलवर इजा होते त्या दुःखाने..?
माणसाच मन जितक कठोर तितकच हळवं असतं.तर काही माणसं तर खूप हळवी ,तर काही खूप कठोर…! मग अशा या हळव्या मनाला दुःख सहजासहजी झेपणं फार कठीण असतं.दुःखाचा बाजार मांडायचा नाही म्हणून आतल्या आत आपण कुढत बसतो.आयुष्यातील एखादी जबाबदारी पेलावी तसं त्या दुःखाला पेलत असतो.’आपली दुःखं , आपली जबाबदारी’ असं स्वतःलाच समजावून सांगत ती जबाबदारी आपण कुणा दुसऱ्यावर कधीच सोपवत नाही.
कितीही झेपत नसली तरी ती सांभाळतोच. एखादी मित्र -मैत्रिण , किंवा कुटुंबातील व्यक्ती , अगदी आपल्या जवळची व्यक्ती जेव्हा मरण पावते तेव्हाचं ते दुःख नाही म्हंटल तरी आतल्या आत खूप सलत राहतं. आणि ज्याला आई-वडील नाहीत अशा मुलांच दुःखसुद्धा खरच बघवत नाही. आतल्या आत किती तुटलेल्या असतात या व्यक्ती… पण कधीच ती दुःख त्या व्यक्ती सहसा बोलून दाखवत नाहीत.
प्रेमात एखादी व्यक्ती प्रामाणिकपणे ईतकी बुडाली असते की नंतर प्रेमभंग झाला तर ते दुःख सहजासहजी एखाद्याला झेलताच येत नाही.कधी कधी तर यातून ते स्वतःलाच दोष देत कंटाळून , वैतागून , संयम संपल्याने चुकीचं नी टोकाच पाऊल उचलायलाही मागे पुढे पाहत नाहीत. चुकीच पाऊल उचलतात पण दुःख , होणाऱ्या यातना कोणाला सांगत नाहीत.
आता काही मुलांना जन्मतःच अपंगत्व येतं , किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक व्याधी किंवा कमतरता जाणवतात.कुणी दृष्टिहीन असतं कुणी बोलूच शकत नसतं , तर कुणाला चालता येत नाही तर कुणाच्या मेंदूला रक्तपुरवठाच कमी झालेला असतो.अशा विविध प्रकारच्या कमतरता ह्या असतात.
पण मग आपलं मुल आपल्याला कितीही प्रिय असलं , हुशार आणि कर्तबगार असलं तरी ते ‘physically disabled’ आहे याच दुःख त्या पाल्याला कितीही नाही म्हंटल तरी क्षणाक्षणाला बोचत रहातं. ” ठिक आहे , समोरच्या मुलाला व्यवस्थित मिळालय नं सगळं , तोही असाच असता तर…त्याच्या पालकांनाही वाईट वाटलच असतं…त्यापेक्षा त्यांच मुल चांगलय , ते आनंदी आहेत यातच सगळं आलं..” असं म्हणून इतरांच्या आनंदात सुख मानून आपलं दुःख कोपऱ्यात ठेवणारी माणसं…! “मला देवाने पदरात मुल दिलय तरी…ठीक आहे , त्याच्यात काही कमतरता आहेत , नाही बघू शकत डोळ्यांनी हा हिरवागार निसर्ग पण किमान मला मुल दिलय….इतरांना तेवढही मिळत नाही… त्यांच दुःख किती मोठ्ठ असेल…? ” असाही विचार करून अशी दुःखाला मिठासारखी विरघळून टाकतात ही माणसं..!
ही झाली काही उदाहरण …यांसारखी अनेक दुःख आपल्या आयुष्यात येतात ज्याचा हिशोब कधी करताच येत नाही. आपण ही अशी दुःख नाही सांगत कोणाला , आपण आपलं दुःख इतरांना सांगून असणाऱ्या सुखावर पांघरून घालतोय , इतरांना आपल्या दुःखात का ओढायच…? जरी लोकांमुळे (काही दुःख) पदरी पडली असली तरी -आपली दुःख आपणच सांभाळायला हवी असं आपल्याला वाटत रहातं.ही दुःख आपण उराशी बाळगून एकटेच रडतो.ओठांवर उसणं हासू आणून दुःखाला गिळतो.
मन केवळ बाहेरून कठोर होतं आतून मात्र ते मन अक्षरशः तुटत असतं.घट्ट डोळे मिटून एकट्यातच अश्रूंना वाट मोकळी करून देतो.तेही कधीतरीच… खरच किती हेलावणारी असतात आयुष्यातील काही दुःख….! एखाद्या उंदराने डोंगर पोखरून काढावा तशीच ही दुःखं आपल्याला पोखरून टाकतात.
मित्रांनो , दुःख कितीही असह्य झालं तरी टोकाच पाऊल कधी उचलू नका , शक्य असल्यास त्याला वेगळ्या वाटा निर्माण करून द्यायला शिका , दुःखाने कितीही पोखरल तरी पुन्हा नव्याने उभं रहायला शिका….कारण , आयुष्य सुंदर आहे…!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



लेख खुप छान आहे