Skip to content

“कोणाच्या चुकीच्या वागण्याने आपली मनःशांती ढळू देऊ नका.”

“कोणाच्या चुकीच्या वागण्याने आपली मनःशांती ढळू देऊ नका.”


मधुश्री देशपांडे गानू


“मना मानसी दुःख आणू नको रे,

मना सर्वथा शोक चिंता नको रे”

संत रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक प्रत्येकाला ज्ञात असतीलच. मनाचे इतकं सुंदर सुनियोजन त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. पण आपण फक्त वाचतो. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतो. सकारात्मक, नकारात्मक टिप्पणी करतो. पण खरोखर मनापासून आचरणात आणण्याचा किती जण प्रयत्न करतात??

प्रत्येक माणूस हा अनेक गुंतागुंतीच्या भावनांमध्ये अडकलेला आहे. सामान्य माणूस हा त्याच्या वर्तूळात, जगात असंख्य चांगल्या वाईट गोष्टींना सामोरे जात असतो. त्याची जवळची माणसे, व्यावहारिक नातेसंबंध, समोर येणारी परिस्थिती, अचानक उद्भवणारे आनंदी आणि दुःखाचेही प्रसंग या सगळ्याचा त्याच्या मनावर खूप परिणाम होत असतो. त्याच्या स्वतःच्या भावना जसं की प्रेम, माया, आशा, अपेक्षा, स्वाभिमान , अहंकार, राग, लोभ, सुखदुःख, आनंद, नैराश्य, हताशपण या सगळ्यातून तो वेळोवेळी जात असतो. याचा वयानुसार आणि अनुभवानुसार त्याच्या मनावर परिणाम होत असतो.

आज प्रत्येक गोष्ट सवंग झाली आहे. प्रेम व्यक्त करणं, राग व्यक्त करणं हे फार उथळ पद्धतीने होत आहे. सगळेच वेगवान घडायला हवं. मनासारखं घडायला हवंय. वेळ, संयम, समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर, स्वीकार या गोष्टी तर उरल्याच नाहीत की काय, अशी शंका येते.

आज समाज फार “जजमेंटल” झाला आहे. अगदी कोणावरही कसेही ताशेरे ओढले जातात. आपला हा विषय आहे का? आपल्याला त्याची माहिती आहे का? कसलाही विचार केला जात नाही. आज कशानेही आपली मनःशांती ढळत आहे. सतत चिंता, ताणतणावांना सामोरे जावे लागत आहे. नातेसंबंधांमध्ये तणाव, जीवघेणी स्पर्धा, आर्थिक तणाव, आर्थिक-सामाजिक विषमता आणि उद्याची चिंता हे माणसाला पोखरून काढत आहे.

यामुळे नैराश्यग्रस्त लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. क्षुल्लक कारणाने मनाची शांती ढळत आहे. कुठे सून चांगली वागत नाही म्हणून, कुठे सासू चांगली वागत नाही म्हणून, कुठे मुलं हाताबाहेर गेली म्हणून कितीतरी गोष्टी आपण मनाला लावून घेतो.  संवाद हरवत चालला आहे. आपण प्रतिक्रिया देण्यासाठी समोरच्या माणसाचं ऐकतो. नीट शांतपणे समोरचा काय बोलतोय ते ऐकूनच घेत नाही. यामुळे सहज गैरसमज केले जातात.

आपली जवळची प्रेमाची नाती जपण्यासाठी एकमेकांवर विश्वास, प्रेम हे तर हवंच पण प्रत्येक नात्याला मर्यादाही असते हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येकाला आपापली “स्पेस” द्यावी. अवास्तव अपेक्षा कोणत्याही नात्यात ठेवल्या तर मनःशांती ढळणारच. आपले आयाम आपणच आखून आपली मनःशांती अबाधित ठेवायची. उदाहरणार्थ.. एकदा मुलाचे लग्न करून दिले तर त्याचा संसार ही त्याची आणि त्याच्या बायकोची जबाबदारी आहे. हे दोघांच्या आईवडिलांनी लक्षात घेतले पाहिजे. सल्ला विचारला तरच द्यावा. नाहीतर त्यांचे निर्णय त्यांना घेऊ द्यावेत. आपण त्यात लुडबुड करू नये हे प्रत्येकाच्या आईवडिलांनी ठरवलं तर आज कितीतरी संसार सुखाचे होतील.

आज एखाद्या छोट्याशा घटनेने ही नैराश्य वैफल्य येतं. नुकतीच एक घटना वाचण्यात आली. एका जोडप्याने मुल दत्तक घेतलं. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की ते मूल मतिमंद आहे. म्हणून त्या पुरुषाने निराश होऊन आत्महत्या केली. किती अविचारी निर्णय आहे हा! यातून कोणताच दुसरा मार्ग निघण्या सारखा नव्हता?? पण माणसं सारासार विचार करणं विसरून गेले आहेत. खरंच आयुष्य एका क्षणिक चुकीसाठी संपवावं एवढं स्वस्त आणि  क्षुल्लक आहे का???

आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी  आपल्या मनाविरुद्ध घडत असतात. बिघडलेले नातेसंबंध, नोकरी व्यवसायातील अपयश, प्रेमातील अपयश, मैत्रीतील फसवणूक अशा अनेक गोष्टी दिसतात. माणूस नैतिकताही विसरू लागला आहे. एखादी मनाविरुद्ध घटना घडली तर लगेच आपण समोरच्या  माणसाची कशी चूक आहे, हा सोक्षमोक्ष करून टाकतो. त्याचा साधक-बाधक विचार करत नाही. शेजारीपाजारी अशा अनेक घटना घडत असतात ज्याचा आपल्या आयुष्याशी काहीही संबंध नसतो पण आपण त्याचा त्रास करून घेतो.

साधं उदाहरण पाहू. शेजारच्या मुलाला दहावीत उत्तम मार्क पडले आणि आपल्या मुलाला कमी पडले तर आपण लगेच खूप बाऊ करतो. मुलाला तर वाट्टेल तसं बोलतोच. पण आपल्या मुलाची त्या मुलाशी तुलना करतो. राग, दुःख, असुया असं सगळेच आपण व्यक्त करतो. आणि आपली मनःशांती ढळते. यातून काय निष्पन्न होतं? मुलाचे मार्कस् आता वाढणार आहेत का? याने मुलाच्या मनावर फक्त वाईट परिणाम होतो. मुलाचा जो काही आत्मविश्वास असतो त्याला तर धक्का बसतोच आणि तुम्ही त्याची ज्याच्याशी तुलना करता त्याच्याबद्दल कटुता, राग निर्माण होतो.

मुलाने तुमच्या अपेक्षेप्रमाणे चांगले मार्क्स मिळवायला हवे होते हे तर खरंच आहे. पण आता आकांडतांडव करून काही उपयोग आहे का? फक्त घराची, घरातल्या सदस्यांची मन:शांती ढळते. हीच गोष्ट मुलाला समोर बसवून नीट शांतपणे मित्रत्वाच्या नात्याने तुम्ही समजावून सांगू शकता. तुमचा आवाज, बोलण्याची पद्धत, तुमची देहबोली ही बदलून तुम्ही त्याला यापुढे जास्त प्रयत्न करायला हवा हे सांगू शकता. याने मुलाला आत्मविश्वास मिळतो. सगळं घर शांत राहतं आणि मार्ग निघतो.

मी अनेकदा हे सांगितलंय, लिहिलंय.. परत एकदा सांगते,” आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनेला आपल्या प्रतिक्रियेची गरज नसते.” कितीतरी गोष्टी अशा असतात की ज्या नाही कळल्या तर काहीही बिघडत नाही. उलट मनावर जितक्या कमी गोष्टींची नोंद होईल तितकं मानसिक आरोग्य, शांतता टिकून राहते. म्हणून कधीही गाॅसिप करू नये. निष्कारण  तावातावाने राजकारणावर चर्चा करून भांडत असणारे तर आपल्याकडे खूपच आहेत. तुमच्या रोजच्या आयुष्यात यांनी काय फरक पडणार आहे?? यामुळे अनेक वर्षांची मैत्री एका क्षणात शत्रुत्वात बदललेली मी पाहिली आहे. हे केवळ समोरचा चूक आहे या धारणेतून स्वतःची मनःशांती ढळून घेणे, हेच आहे ना!

एक लेखिका म्हणून एखाद्या विषयाला धरून आम्ही लेख लिहितो. त्यावर सुज्ञ वाचकांच्या अनेक प्रतिक्रिया येतात. वाचकांना प्रतिक्रिया द्यावी असं वाटणं हेच त्या लेखाचे यश असतं. काही प्रतिक्रिया अतिशय मुद्देसूद विषयाला धरून असतात. काही प्रतिक्रिया विषयाचे दुसरे कंगोरे, दुसरे मुद्दे दाखवणार्या असतात आणि काही प्रतिक्रिया भलत्याच ,नको त्या असतात. अशावेळी लेखकाने आपली मनःशांती ढळू न देता, स्वतः आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करायला हवं. स्वतःमध्ये काय सुधारणा करता येईल यासाठी प्रयत्न करायला हवा.

याचा अर्थ माणसाला कधी राग येऊ नये का? तर असं नाही. माणूस आहे, भावभावना मोकळेपणाने व्यक्त केल्या नाहीत तर त्याची घुसमट होणार. राग आला तर तो वेळीच व्यक्त करायला हवा. पण दोन मिनिटं शांत बसून सारासार विचार करून आपली बाजू योग्य पद्धतीने, योग्य शब्दांमध्ये शांतपणे तुम्ही मांडू शकता . तुम्ही तुमचं आयुष्य कसं जगावं यासाठी फक्त तुमचा दृष्टिकोन बदलायची गरज आहे. जरी राग आला तरी रागाच्या भरात कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नये.

समोरच्या माणसाची किती ही चूक आहे असं तुम्हाला वाटत असेल तरीही याचा खरंच काय परिणाम होणार आहे? यातून दुसरा मार्ग निघू शकतो का? हा साधक-बाधक विचार करण्यासाठी तुमचं मन शांत हवं. अगदी शालेय शिक्षणात भावनिक सु नियोजनाचं प्रशिक्षण यावर भर देण्याची आज गरज आहे. आज समाजात असं चित्र आहे की अगदी अल्पवयीन मुलेही कोणताही मोठा गुन्हा करायला धजावत आहेत, हे ढळलेल्या मन:शांतीचंच लक्षण आहे. तुमची मनःशांती ढळल्याने फक्त तुम्हाला त्रास होतो.. समोरच्याला नाही हे लक्षात घ्या. तुमचं मानसिक, शारीरिक आरोग्य यामुळे बिघडू शकतं. अनेक मोठे आजार कायमचे मागे लागू शकतात. तुमच्या आयुष्याची घडी विस्कटू शकते.

प्रत्येक वेळी समोरच्याचीच चूक आहे असाच गैरसमज करून न घेता, मी ही माणूस आहे, माझ्या हातून ही चूक होते आणि मी ती मान्य करतो अशी भूमिका आपली हवी. चूक मान्य करून, वास्तव स्वीकारून, माफी मागून, ती चूक परत न करण्याचा प्रयत्न करणं यातच माणसाचा मोठेपणा आहे.

परत एकदा “ध्यानधारणा” यासारखा दुसरा सर्वोत्तम मार्ग मनःशांतीसाठी नाही. सरावाने प्रत्येक गोष्ट शक्य आहे. याने तुम्ही आतून आनंद मिळवता, शांत होता. तुमच्या मनाला एक “ठहराव” येतो. फक्त स्वतःमध्ये बदल करायची इच्छा आणि सातत्य हवं. सकारात्मक विचारांनी चांगले मार्ग मिळत राहतात. आयुष्य आरोग्यपूर्ण, सुखकर, आनंदी होण्यासाठी आणि मनःशांती जपण्यासाठी प्रत्येकाने स्वतः प्रयत्न करणं गरजेचं आहे, नाही का!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!