Skip to content

कोणत्याही आई-वडिलांनी मुलांच्या संसारात जास्त लुडबूड करू नये..

कोणत्याही आई-वडिलांनी मुलांच्या संसारात जास्त लुडबूड करू नये..


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


आई वडील म्हणजे आपल्यासाठी आयुष्य असतं. आपली प्रत्येक गोष्ट म्हणजे आपले आईवडील असतात. जन्म देण्यापासून ते अगदी संपूर्ण पालनपोषण करण्यापर्यंत ते खूप काही करतात. त्यांच्या छायेखाली वाढलेले आपण त्यांच्या सहवासात इतके रमलेलो असतो की आपल्याला तो सहवास सोडून इतरत्र कुठेही जावसं वाटत नाही.त्यांच्या प्रेमाची, आधाराची आपल्याला खूप सवय झालेली असते.

आपल्याला असही वाटतं की आपल्या आईवडीलांनी आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सोबत असावं….पण…….पण….एक वेळ अशी येते की आईवडीलांची ती हवीहवीशी वाटणारी सोबत म्हणजे एक प्रकारची लुडबूड वाटायला लागते..आपल्या मुलामुलींच एकदा का लग्न झालं , त्यांचा संसार सुरु झाला की त्यांच्या परिने त्यांना आयुष्य जगु देणं हे खूप “Basic” आहे.

पण आपल्याला हे असं चित्र “फारस” बघायला मिळत नाही. आपण कुठे मध्यस्थी करावी आणि कुठे नाही हे कदाचित आईवडीलांना समजत असेल की नाही , की समजत असून ते न समजल्या सारख करतात तेच कळत नाही.आईवडीलांना अशा गोष्टी शिकवाव्या अस मुळातच वाटत नाही. पण जेव्हा एखादी गोष्ट सहन करण्यापलीकडे जाते तेव्हा मात्र ते शिकवणं आपल्याला भाग पडतं.

शेवटी दोन कुटुंब जरी जोडली गेलेली असतात तरी संसार मात्र त्या दोघांना करायचा असतो…अशा वेळी कुटुंबाची साथ असावी असं दोघांनाही वाटतं. पण साथ हवी असणं म्हणजे लुडबूड करण नव्हे….या नको त्या लुडबूडीमुळे कित्येक सुखाचे संसार उध्वस्त होतात.हे मात्र संसार उध्वस्त झाल्यावर आईवडीलांना समजतं…

आपण कितीही समजून सांगायचा प्रयत्न केला तरीही त्यांच्या ते लक्षातच येत नाही.पाळण्याची दोरी पालकांच्या हातात असणं स्वाभाविक आहे… पण मुला-मुलींच्या संसाराची दोरी पालकांच्या हातात असणं कितपत योग्य आहे…?? मान्य आहे, की काही पालक असेही आहेत ज्यांच्यामुळे अनेकांचे संसार सुरळीत आणि सुखाचे होतात…

पण एकाच नाण्याला दोन बाजू असतात हेही तितकच खरं आहे.खरच पालकांनी आपल्या मुलामुलींच्या संसारात नको ती लुडबूड करण अजिबात योग्य नाही. आपल्या लुडबूडीमुळे आपल्याच मुलामुलींच्या संसाराची आपण कळत नकळतपणे वाताहत करत असतो.. कसं..??तर ते जाणून घेऊयात आपल्या आजुबाजुला घडणाऱ्या छोट्याशा गोष्टींमधून…………….

अरे लग्न झालं म्हणजे आता काय बायकोच्या ताटाखालच मांजर झालास असं म्हणून सारख सारख हिनवणे…..(कधी कधी ठिक असतं हो चिडवलेल पण सारखच……..)

आता तुला तुझा नवरा चांगला वाटतो , आता आम्ही कोण असं म्हणून किती नी काय काय बोलतात तिला… बायको /नवरा आला आता आम्हाला विसरलीस… माझ्या स्वयंपाकघरात असं केलेलं मला पटत नाही….

तु तिला सांग नाहीतर मी काहीतरी बोलेन तिला असं म्हणून आपल्याच मुलाला द्विधा मनःस्थितीत टाकणारे आईवडील….”बायको नाहीतर आई” एक काहीतरी ठरव….

नवरा नवरा काय..?इतके दिवस तर आम्हीच होतो नं…?? तिला, त्याला काय आवडतं ते लगेचच दिमतीला हजर…..आमच काय…??
लग्न ठरवताना तर कित्येक मुलामुलींना हुंडा नकोच असतो पण ह्या पालकांमुळे तो हुंडा मध्ये येतो….

अशा विविध प्रकारच्या गोष्टी आपण आजुबाजुला घडताना पाहतो.हो आईवडीलांच्या अशा लुडबूडीमुळे मुलामुलींचा संसार उध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. वणवा पेटायला एक ठिणगीही पुरेशी असते अगदी तसच ह्या संसाराचं….तुटायला एक कारणही पुरेल पण जोडताना शंभर कारणही कमी पडतील यात काही वाद नाही……

आईवडीलांनी आपल्या पाल्याला हवं तिथं जरूर मार्गदर्शन करावं…नवा रस्ता दाखवायला मदत करावी. बाळांनो,काही लागलं तर आम्ही आहोत तुमच्यासाठी… तुमच्या सुखात नाही पण दुःखात मात्र आम्ही सोबत आहोत…तुमच्या निर्णयावर चालताना आम्हाला अभिमान वाटेल…. असं म्हणणारे आईवडील आहेतही.

पण जे असं म्हणत नाही, असं वागत नाही त्यांनी याचा अवश्य विचार करावा. आईवडीलांची लुडबूड असं बोलतानाही चुकून बोलावसं वाटत नाही ओ….कारण ज्यांच्यामुळे आपण आहोत, ज्यांनी घडवलं,आयुष्य जगायला शिकवलं अशा आईवडीलांची लुडबूड वाटणं कदापि शक्य नाही…तुमची लुडबूड होतेय असं म्हणताना जिभही कचरते अगदी…!!

पण हे दोघांच्या बाबतीतही असं होतं.तिचे आईवडील तिला बोलतात आणि त्याचे आईवडील त्याला बोलतात… दोघही एका विचीत्र अवस्थेत अडकून पडतात. काय करायच दोघांनाही समजत नाही…काही मुलं/मुली असेही असतात ज्यांना आईवडीलांपुढे काही सुचत नाही.

आपल्यामुळे आईवडील दुरावतील,दुःखावतील हे त्यांना पटत नाही. म्हणून ते दोघं केवळ आईवडीलांसाठी स्वतः एक पाऊल मागे घेतात….पण यामध्ये आपल्या पाल्याचा संसार मोडून पडतो हे आईवडीलांच्या लक्षात येत नाही…..

तुमच्यापेक्षाही चार पावसाळे आम्ही जास्त पाहिले आहेत.आमच्यावेळेला असं नव्हतं…आमची सासू अशी नव्हती…असं करायच नाही तसच करायचं…..वगैरे वगैरे. असं म्हणून ते म्हणतील तसच करायच का या नव्या पिढीने…..??त्यांना त्यांच्या कलाने जगु देणे ही आपली जबाबदारी आहे हे पालकांनी विसरायला नको.

आपला संसार झाला आता त्यांचा संसार आहे.चुकले तर चुकांमधून शिकतील,पुन्हा उभे रहातील.आपली मध्यस्थी नको…हे प्रत्येक पालकाला समजायला हवं.लग्न झालं तर लगेचच नातं/नातु हवा असं म्हणून घाई करणाऱ्या पालकांनी थोडा विचार करावा…(मान्य आहे, सगळ्या गोष्टी वेळेत झालेल्या चांगल असतं)कारण,संसारापलिकडेही एक जग असतं.

आणि ते जगणही तितकच महत्त्वाचं असतं…काळानुसार तुम्ही बदलाच असं तुमचे मुलमुली म्हणत नाही पण कमीत कमी तुम्ही प्रयत्न केला तर संपूर्ण कुटुंबाची योग्य ती सुंदर सांगड घालणं तुमच्याच लेकरांना व्यवस्थित जमेल. ना कोणाचा संसार उध्वस्त होईल ना की तुम्ही आईवडील दुःखावले जाल…….

आमच्यासाठी तुम्ही खूप काही करता… पण तुम्ही म्हणता तसच “संसार तर आमचा आहे…तो आम्हीच सांभाळायला हवा…नं…..???”

प्रिय आईबाबा—- आमची एकच प्रेमळ विनंती आहे….आम्हाला चुकेल तेव्हा जरूर ओरडा,कान पिळा ,हवं तेव्हा मार्गदर्शन करा…पण ती निरर्थक लुडबूड मात्र करु नका.त्याने संसार किती टिकेल हे कदाचित मीही सांगु शकत नाही…. तुम्ही आयुष्यभर प्रेमाची मायेची सावली बनून रहा….आम्हाला आमचा संसार तुमच्या थंडगार सावलीत फुलवायचा आहे…..आम्हाला तुमची गरज आहे… अगदी श्वास मिटेपर्यंत…आणि मिटल्यानंतरही….!!

(कोणत्याही आईवडीलांना/पालकांना दुःखावण्याचा हेतू नाही.कुणाच्या भावना दुःखावल्यास क्षमस्व…!!)


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “कोणत्याही आई-वडिलांनी मुलांच्या संसारात जास्त लुडबूड करू नये..”

  1. Chandrashekhar Barde

    ऐकच मंत्र: मुलगा/ मुलगी प्रत्येक आई वडिलांची ठेव (F. D) ती लग्न होई पर्यंत सुरक्षित सांभाळणे. नंतर हा प्रश्न मनात कायम – मुलगी कुणाची जावयाची, मुलगा कुणाचा सुनेचा. आईची साडी मुलीला, आन बापाचा जोडा मुलाला झाला न . त्यांना अधिक सक्षम होवू द्या.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!