कोणतंही नातं प्रेरणा देणारं असावं, वेदना नाही.
कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे
कधी हळूवार उमलते…
कधी मोकळे बहरते…
कधी अचानक तुटते…
कधी हातातून निसटते…
हे नाते…..!!
आयुष्यात जन्माला येण्याआधीच आपली नाळ ही आपल्या आईबाबांशी जोडली जाते. परंतू जन्माला आल्यानंतर जसंजसं आपण मोठे होत जातो तसतसं आपल्याला नाती समजायला लागतात. त्यांचे विविध पैलू आपल्याला हळुहळू उलगडायला सुरुवात होते.ही नाती कौटुंबिक , सामाजिक , राजकीय , मैत्रत्व/मित्रत्व अशा वेगवेगळ्या प्रकारची नाती आपण जन्माला आल्यानंतर अनुभवतो.कुटुंबातील प्रत्येक सदस्यासोबत आपलं कोणतं ना कोणतं नातं असतं.
कुणी आपली आजी लागते तर कुणी आपली काकू…पती-पत्नी आई-वडील ,मुलगी-मुलगा बहीण-भाऊ , आजी-आजोबा, काका-काकू यांसारखी अनेक कौटुंबिक नाती आहेत ज्या प्रत्येकाशी आपली नाळ जोडलेली असते. आपले गुरूवर्य , शिक्षक , शेजारधर्म , मित्र-मैत्रीण , राजकीय नेते ते अगदी पेपर विक्रेत्यापर्यंत एक नातं जोडलं जातं.आपण एकमेकांशी जोडले जातो.
खरं तर प्रत्येकाच्या दृष्टीने नात्यांची संकल्पना ही वेगळी आहे. कुणी त्याला वेलीवरच फूल म्हणतं तर कुणी त्याला कानातील डूल म्हणतं.आयुष्यात नात्यांना खूप महत्व आहे. इथे माणसाचही माणसाशी माणूसकीच नातं आहे. “नातं” म्हणजे आयुष्यातील खूप सुंदर नी तितकीच नाजूक गोष्ट….! कधी धक्का लागला तर क्षणात तुटतात ही नाती…नाहीतर मग त्या सुगरणीच्या खोप्याप्रमाणे तितकीच ती एकमेकांना घट्ट धरून राहतात.
पण हल्ली तर अशी सुगरणीच्या खोप्याप्रमाणे भासणारी नाती क्वचितच पहायला मिळतात. मुळात नातं हे सुगरणीच्या खोप्याप्रमाणे असतं यावरचा कित्येकांचा विश्वासच उडत चाललाय. ही सुंदर वाटणारी नाती आता मात्र नकोनकोशी वाटतात.त्यांचा आता नाही म्हंटलं तरी तिटकारा, तिरस्कार वाटू लागलाय.जुनी नाती इतकी त्रासदायक होत चालली आहेत की पुन्हा नव्याने कुणाशी नातं जोडायची हिम्मत होत नाही.
आणि आपण पाहतो या त्रासदायक नात्यांमध्ये कुठलच नातं मागे नाही. हल्ली कुणीही त्रास देतं किंवा कुणामुळेही त्रास होतो.कोण म्हणतं “ही सख्खी बहीण पण कधीच सख्ख्या बहीणीसारखी वागत नाही.सतत त्रास होईल असच वागते.तिच्यामुळे किती त्रास सहन करावा लागतोय.मनाला किती त्रागा होतोय तिच्या वागण्याचा पण तिला त्याचं काहीच नाही.” अशा प्रकारचे अनेक संवाद आपण ऐकतो किंवा स्वतः अनुभवतो.हे केवळ बहीणीच उदाहरण झालं.पण हे असं हल्ली प्रत्येक नात्यांच्या बाबतीत घडताना दिसत आहे.
नाती एकवेळ परिपूर्ण नसावी पण ती मनाने सुंदर असावी असं वाटतं.कारण इथे परिपूर्ण असं आहे तरी कोण….? अगदी सगळ्यांच ते
“Imperfectly Perfect” असचं आहे. आणि मला वाटतं की परिपूर्ण होण्याऐवजी केव्हाही परिपक्व होण्याला प्राधान्य दिलं पाहिजे. त्याने गोष्टी सहज आणि सोप्या होतील.कारण नाती समजायला कधी कधी आयुष्यही कमी पडतं.
प्रत्येक नात्यात आपण निखळ आनंद , सुख ,समाधान , प्रेम , प्रेरणा ते अगदी हरवलेलं जुनं नातही शोधत असतो.पण हल्लीच्या नात्यात तर प्रेरणा कमी नी वेदनाच जास्त दिसतात. आपल्या प्रेरणेतून इतरांना प्रेरणा मिळत असते त्यामुळे आपली नाती ही प्रेरणादायी असली पाहिजे. कारण एका प्रेरणेतून असंख्य नाती ही ‘आदर्शाच्या तत्वावर’ फुलत असतात.
इतकच नाही तर मला तुमच केवळ इथे असणं देखील प्रेरणा देऊन जातं असं म्हणणारे किती पारदर्शक नजरेने आपल्याकडे पाहत असतील याचा एकदा विचार करून पहा. “Inspired by you”…”Inspired by my favourite teacher/speaker/artist……” असं आपण अनेकदा कित्येकांच्या ‘caption’ मध्ये वाचतो, ‘speech’ मधून ऐकतो.म्हणजे पहा कुणीतरी कुणाकडून प्रेरणा घेत असतं तर कुणीतरी कुणाला नकळतपणे प्रेरणा देत असतं.मग या नात्यांचही तसच हवं.त्या प्रत्येक नात्यामध्ये प्रेरणेची फूलं फुलायला हवीतं.प्रत्येक वेळी नात्यात वेदनांचा पाऊस पडणं चांगली गोष्ट नाही.
सतत एखाद्याला त्रास देऊन वेदना देणे , नात्यांचा आदर करण्याऐवजी अवमान करणे,सतत कोणत्या तरी कारणावरून दुःखावणे , मनाला वेदना होईल असं टोचून बोलणे ,शब्दांच/अर्था़ंच भान ठेवून न बोलणे, स्वार्थासाठी एखाद्याला फसवणे , त्रास देणे या सगळ्या वेदनादायकच गोष्टी आहेत. ज्या की नात्यांमध्ये सर्रासपणे घडताना दिसतात.
छोटी छोटी भांडणं झाली तर टोकाची पावलं उचलणे , ज्यांनी जिव्हाळा, प्रेमाचा अर्थ शिकवला त्यांनाच दगडाने ठेचायच म्हणजे किती क्रूरपणा आहे.एखाद्याने केलेले उपकारही आपण इतक्या सहजपणे विसरतो का..? कमीत कमी त्या उपकारांची जाणीव म्हणून तरी समजून घ्यायला नको का…? तर नाही आम्हाला समजूनच घ्यायच नाही. उलट एखाद्याला त्रास कसा होईल , जास्तीत जास्त वेदना कशाने होतील माझा स्वार्थ कसा साध्य होईल या विचारात गुरफटत चाललेली ही नाती नकोशीच वाटतात.विरणाऱी, तुटणाऱी किंवा अमानुषतेची ठिगळं असणाऱी ही नाती डोळ्यांना बघवतही नाही.
तुटलं, विरलं की त्रास होतोच पण कुणी मुद्दाम त्रास दिला, एखाद्या विशिष्ट हेतूने त्रास दिला तर तो त्रास वेदनांच्याही पलिकडे जातो.ते घाव कधी भरून निघणारच नाही अशी भीती वाटते . या अशा नात्यांमध्ये आपण गुदमरतोय असचं वाटतं.पण अशा या नात्यांच अस्तित्व काम कामाच….???
प्रत्येक नातं कसं “Healthy” असावं.हसत-खेळत एकमेकांना समजून घेणारं हवं.त्या नात्यातून इतरांनाही कळलं पाहिजे की प्रेम-जिव्हाळा काय असतो…?माणूसकी काय असते…?एकाने पसारा मांडला तर तो सामंजस्याने कसा आवरायचा….? जखमांवर प्रेमाची/मायेची फुंकर घालायची की मीठ चोळायच…?
नातं निरोगी फुलण्यामागे नेमकं काय आहे हे आपल्या नात्यातून इतरांना समजायला हवं.खरतरं इतर लोकांना प्रेरणा देता येईल म्हणून नाही पण किमान आपण स्वतःच आपल्या नात्यात प्रेरणा शोधायला हवी ती निर्माण करायला हवी. स्वतःच्या नात्यात वेदनांना स्थान देण्यापेक्षा प्रेरणेला स्थान द्या. ते जास्त गरजेचं आहे.
वेदनांमुळे नकारात्मकता पसरण्याची शक्यता जास्त असते परंतु प्रेरणेमध्ये तिच शक्यता कमी करण्याची खूप ताकद असते.प्रेरणेमुळे स्वतःचं आयुष्य फुलत जातच पण इतर लोकही त्यामुळे नकळतपणे प्रेरित होत जातात. त्स्वतःला आणि जगाला काय संदेश द्यायचा हे आपणच ठरवणार असतो.
नाती तुटतात,बहरतात, गळतात पुन्हा नव्याने जन्म घेतात पण आपण जाताजाता आपल्या नात्यातून वेदनांचा पाऊस पाडायचा की प्रेरणेचा हे लक्षात घेऊन एकदा विचार करा….आणि कोणतही नातं जगायला प्रेरणा देणारं असावं, वेदना नाही…हे या जगाला मनमुरादपणे सांगायला विसरू नका.
लक्षात ठेवा… एक प्रेरणादायी नातं संपूर्ण जगाचं नाही पण दोन जणांच आयुष्य नक्कीच फुलवून जाऊ शकते , दोन आदर्श नाती नक्कीच निर्माण करू शकते……!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


