कोंडलेली मानसिक वाफ कुठेतरी बाहेर पडणारच….!!
कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे
आयुष्य सुंदर आहे अशी सुरुवात आज लिहताना करावीशी वाटत नाही….आयुष्य हे केवळ वरवर सुंदर वाटतय.त्याच्या अंतरंगात मात्र हे चित्र पूर्णतः वेगळ आहे.कारण, आयुष्य तेव्हाच सुंदर वाटतं जेव्हा अंतरंग स्वच्छ, नितळ असतं.जगण्याचं नाटक कितीही नाही म्हंटलं तरीही ते दिसून येतं.पण आपण ही गोष्ट सर्रासपणे नाकारतो.आयुष्यात इतकं काही घडत असतं की वेगळी काही कल्पनाच करायला नको.कधीकधी वाटतं आयुष्य आहे हे…असं चालायचच…!!
आपण चूकून जरी एखाद्या खोलीत अडकलो तरी आपली घुसमट होते.आपण अस्वस्थ होतो. बाहेर येण्यासाठी आपण पाय मारायला लागतो.कारण घुसमट होऊन गुदमरून आपला श्वास कोंडु शकतो हे आपल्याला माहित असतं.पण मनाच्या बाबतीत आपण कधी लवकर हातपाय मारतच नाही. त्यावेळी बहुधा बुद्धी चालतच नसते.आणि मनाला समजून घेण्याची तेव्हा मानसिकताही हरवलेली असते. पण या मनाचा कोंडमारा काही चांगला नसतो.त्याला वेळीच आवरणं गरजेचं असतं. नाहीतर ती मनाची कोंडी कोणतं वळण घेईल कळणारही नाही.
आपल्या सर्वांना प्रेशर कुकर तर माहीतच आहे.तो असला की स्वयंपाक कसा लवकर होतो.पण जर कुकरच्या शिट्टयांमध्ये काही गडबड झाली तर मात्र बघायला नको….पण ,एकदा काय झालं—अंगणातील चूलीवर स्वयंपाक चालू होता.चूलीवर कुकर लावला होता. आत्ता शिट्टी होईल असं म्हणता म्हणता शिट्ट्या झाल्याच नाही.क्षणभर वाटलं की वाफ आतल्या आत कोंडून कोंडून आता या कुकरचा स्फोट होणार……..मन घाबरंघुबरं झालं होतं.आणि काय…जे व्हायला नको शेवटी तेच झालं.शिट्ट्या काही झाल्या नाही पण कुकरचा स्फोट मात्र झाला.
त्याचा वेग इतका होता की हृदयाचे ठोकेही शहामृगासारखे धावत होते.अगदी असचं आपल्या मनाचही होतं. जगण्याची नुसती फरफट होते.नियती आपली परिक्षा घेते की थट्टा करते तेच कळत नाही. काही सहन होतच नसतं.स्वतःच स्वतःचं तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाण्यातच आपलं आयुष्य जातं.श्वास गुदमरतो,मन घुसमटतं.विचारांची गर्दी नकोनकोशी वाटते.
पण एकांतही खायलाही उठतो. विचारांच वादळ,भावनांचा कल्लोळ, नवे नवे डावपेच, आयुष्याच्या त्याच दोऱ्या, स्वतःला सावरण्याचे खेळ….यामध्ये मानसिक शांतता लोप पावते.आणि हे सगळं शिट्टी नसलेल्या मनाच्या प्रेशर कुकरमध्ये शिजत राहतं……आणि यामुळे मानसिक वाफ मात्र कोंडून राहते.
आणि मग अगदी त्या कुकरच्या स्फोटासारखच…..मनाच्या प्रेशर कुकरचा केव्हाही स्फोट होऊ शकतो.कारण…वाफ बाहेर पडायला इथे काही चान्सच दिसत नसतो.
पण मग ही कोंडलेली मानसिक वाफ….कधीतरी नी कुठेतरी बाहेर पडणारच…!कोंडून कोंडून तिचा अर्धा श्वास तर गुदमरलेलाच असतो.त्यामुळे बाहेर पडताना तीचा वेग..तीची तीव्रता सांगणं कठीण आहे.पण ती बाहेर पडते हे मात्र नक्की..!! कुठे आणि कशी ते थोडसं पाहूयात—–
१) “मी त्याला म्हणाले…गोष्ट सांग..तर तो म्हणाला… मला गोष्टीतला ‘ग’ सुद्धा येत नाही…” तेव्हाच मला त्याची गोष्ट कळाली….त्याने न सांगितलेली…!! खरचं त्या ‘ग’ मध्ये खूप काही दडलेलं होतं.कोंडलेलं होतं.पण त्याच्या त्याच वाक्यामुळे ति कोंडलेली मानसिक वाफ बाहेर यायला सुरुवात झाली होती.
२) आनंदाने भरल्या घरातही स्नेहा अस्वस्थ वाटत होती. म्हणून मी सहज तिला विचारलं की -काही झालय का…??तर ती काहीच बोलली नाही. पण तिच्या चेहऱ्यावरचे रंग मात्र मला स्वस्थ बसू देत नव्हते. म्हणून मी तिच्यामागे प्रश्नांचा तगादाच सुरू केला.मग मात्र ति चिडली…तिच्या मनाचा प्रेशर कुकर उडाला…कोंडलेली वाफ एकदम भडका होऊनच बाहेर आली.———–काय सांगू तुला…??
विचारांनी मन भेदरतय, घुसमटलेल्या भावनांनी डोळे अंधारात फिरकतायेत,मनाला सगळ्या गोष्टी टोचतायेत,सुन्न व्हायला होतयं.कधी कधी असं वाटतं की झाडासारख आयुष्य झालय.कितीही घाव झेलले तरी वेदना सहन करून आपण थंडगार मायेची सावली देण थांबवत नाही.!!
पण कधी असही वाटतं की एखाद वादळ यावं आणि कोलमडून जावं म्हणजे वेदना शांत होतील…कायमच्याच…!! कुणाचे घाव झेलावे लागणार नाही आणि कुणी मायेच्या सावलीची अपेक्षाही करणार नाही.बापरे…..!!इतकं काही ति बोलली.इतके दिवस कोंडलेली वाफ आज बाहेर पडली.आज तिचा निचरा झाला.तिने मोकळा श्वास घेतला.
ईतकच नाही तर…कधी चुकून काही झालं तर आपण इतकं काही ऐकतो. (ऐकवतो) पण झालेल्या गोष्टीचं आणि त्या बोलण्याचं काहीच connection नसतं.पण मग विचारांती लक्षात येतं की….कोंडलेलं सगळं बाहेर पडतय.
अशाच अनेक गोष्टी घडतात… आणि कोंडलेली वाफ बाहेर पडते.खरचं किती भयानक असतं हे.किती दिवस ही मानसिक वाफ कोंडून राहते.तिचा निचरा योग्य वेळी होणं गरजेचं आहे. नाहीतर जेव्हा जेव्हा ती बाहेर पडेल ती पेटूनच बाहेर पडेल. आणि कोंडलेली ही वाफ कुठेतरी बाहेर पडणारच….!!
पण ती वाफ तुमच्यासमोर बाहेर पडली तर समोरच्या व्यक्तीला समजून घ्यायला शिका.आणि ही वाफ एक ना एक दिवस बाहेर पडणारच असते.पण ती बाहेर पडण्याची वाट न बघता स्वतःहून ती बाहेर काढायला शिका……कारण ,कोंडून ठेवण्यापेक्षा तिला वाटा मोकळ्या करून दिल्या तर स्वतःलाच मोकळा श्वास घेता येईल.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


