केवळ मुखडे पाहून प्रेम करणं कितपत योग्य आहे……
कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे
प्रेम तुमच्या माझ्या अगदी जवळचा शब्द. “Life is a short ,world is small but love is greater than all…” असं जरी असलं तरी प्रेम कुणावर करावं….हे प्रत्येकाला समजायला हवं.कारण , इथे चेहऱ्यावर भाळणारे बरेच असतात.एखाद्याचा गोड गोंडस मुखडा पाहून आपल्या डोळ्यांना भुरळ पडते.आणि मनही भुलतं त्याला.पण हे असं मुखडा पाहून प्रेम करणं किती योग्य आहे आणि किती नाही याचा आपण कधी खोलात जाऊन विचार करतो का…??
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं…तुमचं आमचं अगदी सेम असतं…..असं कवी मंगेश पाडगावकरांनी त्यांच्या कवितेत छान म्हंटलय. पण असं नसतं ओ…इथे प्रत्येकाच्या प्रेम करण्याच्या वेगवेगळ्या तऱ्हा.कुणी मनावर प्रेम करतं तर कुणी शरीरावर…. कुणी चेहरा पाहून प्रेमात पडत तर कुणी अंतरंगात डोकावून प्रेम करतं.जेवढ्या रिती सांगाव्या तेवढ्या कमीच पडतील.
पण राहून राहून एक गोष्ट मात्र डोक्यातून जात नाही. ती म्हणजे मुखडे पाहून प्रेम करणं…….खरच हे असे मुखडे पाहून प्रेम होतं असेल का..?? आणि असे मुखडे पाहून प्रेम करणं किती योग्य आहे…??आणि असं प्रेम झालच तर ते प्रेम प्रेम असतं का..??की फक्त डोळ्यांत भारणारा चेहरा म्हणजे प्रेम….???
असे काहीसे प्रश्न तुम्हालाही पडत असतीलच नं…??तुम्हालाही वाटत असेलच नं की असं चेहरा पाहून प्रेम वगैरे कसं शक्य असेल..??
तर…..असं स्वतःच्या बाबतीत झालं असेल किंवा आजुबाजुला घडतानाही तुम्ही पाहील असेलच. की एखादी व्यक्ती अचानक समोर येते आणि तिला पाहताच क्षणी आपल्या डोक्यात/मनात एक प्रकारच काहूर उठतं.”यार काय चेहरा आहे..टपोरे डोळे नी चाफेकळी असलेल ते नाक..आणि ती गुलाबी ओंजळी तर……मला अशीच मुलगी हवी….किंवा हीच हवी असा विचार करणारे काही प्रेमवेडे आपण पाहतो.(गुलाबी ओंजळी-smile) “कसला हँडसम दिसतोय यार…मी तर त्याच्या प्रेमातच पडलेय असं वाटतय मला” वगैरे वगैरे गोष्टी आपण रोजच्या जगण्यात अनुभवत असतो.पण हे खरचं प्रेम असतं का..?? या गोष्टी पाहून आपण प्रेम करायच का…??या गोष्टी पाहून खरचं प्रेम होतं का..??आणि झालच तर ते कितपत टीकतं…??
मान्य आहे…प्रथमदर्शनी चेहरा… त्याचं “Impression” पडण अगदी स्वाभाविक आहे. पण म्हणून अगदी चेहरा पाहून प्रेम करणं तसं योग्य वाटत नाही. कारण मुळातच “दिसतं तस नसतं” हे आपल्या सर्वांना माहीत आहे. अगदी तसच चेहरा दिसतो तसाच तो आतून असेलच असं आपण खात्रीने सांगु शकत नाही.एखादा निरागस हसमुख वाटणारा चेहरा आतून कपटीही असु शकतो.आणि चिडका,रागीट वाटणारा चेहरा आतून अगदी शहाळासारखा असु शकतो.त्यामुळे आपण असा क्षणभर चेहरा बघून प्रेम करणं किती योग्य आहे हे आपलं आपल्यालाच समजलं पाहिजे.
चेहरा वाचून एखाद्यावर प्रेम करणं ही वेगळी गोष्ट पण….एखाद्याचा केवळ चेहरा पाहून प्रेम करणं ही त्याहूनही वेगळी गोष्ट.कारण चेहरा असा क्षणात किंवा अर्ध्या तासात पुस्तकासारखा वाचता येत नाही…कधीकधी तो चेहरा वाचायला आयुष्यही कमी पडतय असं वाटतं. मग आयुष्यभराची नाती जपण्यासाठी केवळ तो चेहरा बघून एखाद्या व्यक्तीवर प्रेम करणं कितपत योग्य आहे…?? ते केवळ शारीरिक आकर्षण वाटत नाही का..??”एक लाजरां साजरा मुखडा चंद्रावानी फुलला गं…….” हे गाणं ऐकून चंद्रासारखाच एखादा चेहरा आपल्या समोर येतोय असं अनेकदा वाटतं.
पण चंद्राला तर आपण फक्त आकाशात पाहतो ,त्याचा प्रकाश मंद असतो आणि फार फार तर त्याची भौगोलिक माहिती आपल्याला माहीत असते.पण चंद्राचा स्वभाव आपल्याला माहीत नसतो..अगदी तसच त्या चंद्रासारख्या मुखड्यावर आपण उगाच का भाळायच…त्याचा स्वभाव माहीत नसताना…त्याच्या हावभावांना का भुलायचं..??त्या क्षणिक आकर्षणाला प्रेम का म्हणायचं…??
आपण एखाद्याचा चेहरा पाहून आपण त्या व्यक्तीवर प्रेम करतोय….पण तिच व्यक्ती आपल्यावर आपला चेहरा वाचून प्रेम करत असेल तर आपण त्या व्यक्तीची सरळसरळ फसवणूक करतोय हे कधीतरी तुम्हाला नक्की जाणवेल. आपण हेही ऐकलय की——“तुझा चेहरा चांगला म्हणून तुला हो बोललो/बोलले..नाहीतर मला तुझी काही गरज नव्हती.”, “काही नाही तुझ्या चेहऱ्यावर भाळले/भाळलो हीच मोठी चूक झाली.
हा चेहरा असा असेल किंवा या चेहऱ्यामागे असाही धारण केलेला एखादा मुखवटा असेल असं मला वाटलं नव्हतं…………….” हे असं आपण ऐकलय,ऐकतो…अनुभवतो.मग तुम्हीच सांगा..असं हे चेहरा पाहून प्रेम करणं कितपत योग्य आहे….???यात काही भावनिक गुंफण असते असं वाटतं नाही. असेल तर ते केवळ क्षणिक आणि शारीरिक आकर्षण. भावनांची , मनांची हळवी गुंतवणूक तिथे कदाचित झालीच नसावी. उदाहरणही अगदी दुर्मिळच असेल की चेहरा पाहून केलेल्या प्रेमाची मनामनाशी हळवी गुंफण होऊन ते नातं टिकलं असावं…!!(तेही शारीरिक आकर्षण विसरून)
पण…केवळ चेहरा पाहून प्रेम करणं म्हणजे आपल्या आयुष्याच अवघड आहे. केवळ चेहरा पाहून प्रेम करणं शारीरिक क्षणिक आकर्षण असु शकतं.समोरचा अगदी समजून उमजून घेऊन प्रेम करत असेल आणि तुम्ही केवळ चेहरा…”बाह्य सौंदर्य” पाहून प्रेम करत असाल तर तुम्ही त्या व्यक्तीची फसवणूक करत आहात. त्याच्या भावभावनांशी खेळत आहात.ते प्रेम नाही हे लक्षात घ्या.
केवळ चेहरा पाहून तुम्ही इतरांची फसवणूक करू नका.कारण समोरचा loyal असेल तर पुढे जाऊन त्याचा त्रास होऊ शकतो. आणि असच आपणही कुणाच्या चेहऱ्यावर अस सहजासहजी भाळू नका.कोण कसं असेल काही सांगता येत नाही. उगाच मनं तुटली तर सगळं असह्य होऊन जातं.त्यामुळेच असे केवळ मुखडे पाहून एखाद्याला अडकवू नका…आणि स्वतःही त्यात अडकू नका.कारण…खरा मुखडा वेगळाच असतो. असं मुखडे पाहून प्रेम करू नका.केवळ चेहरा पाहून प्रेम करणं दोघांसाठीही योग्य नाही. म्हणून माझ्या मित्रांनो नी मैत्रिनींनो…भावनांची गुंतवणूक ही चेहरा वाचूनच करा…..चेहरा पाहून नाही….!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



चेहरा पाहून कधीच प्रेम करु नये…..😊🤗 त्या व्यक्तीचं मन पाहून प्रेम करावे😍🤗