Skip to content

केवळ माणसं ओळखण्यात चूक केल्यामुळे आयुष्याचं खूप मोठं नुकसान होतं.

केवळ माणसं ओळखण्यात चूक केल्यामुळे आयुष्याचं खूप मोठं नुकसान होतं.


मेराज बागवान


माणूस समाजशील प्राणी आहे.आपल्या आयुष्यात अनेक माणसे येतात-जातात.काही जण आपल्या आयुष्यात सुख, आनंद, भरभराट , शांती घेऊन येतात तर या उलट काही अशी देखील माणसे आपल्या आयुष्यात येतात , जे आपले आयुष्य एक प्रकारे उध्वस्तच करून टाकतात. आणि या सगळ्यात आपण कुठे तरी चुकतो.आणि ती चूक म्हणजे , ‘माणसे ओळखण्यात चूक करणे’.

असतात काही माणसे जी आपल्या नकळत आपल्याला फसवत असतात आणि आपण मात्र बिनधास्त त्यांच्यावर विश्वास ठेवत असतो. जेव्हा कधी आपल्याला त्यांचे खरे रूप लक्षात येते, तेंव्हा खूप उशीर झालेला असतो आणि आपल्या आयुष्याचे देखील खूप नुकसान झालेले असते.मात्र ही माणसे आपल्या ऐटीतच आयुष्य जगत असतात आणि आपण जणू कुणाचे काही नुकसान च केले नाही , असे ते दाखवत असतात. म्हणूनच आपण इतरांकडून अपेक्षाभंग करून घेण्यापेक्षा, स्वतः च माणसे पारखायला शिकले पाहिजे.

अनेकदा ‘पैशांच्या’ बाबतीत बऱयाच जणांचे नुकसान होत असते.काही माणसे , नोकरी लावून देतो म्हणून बेरोजगार सुशिक्षित तरुणांकडून गोड बोलून पैसे उकळून घेतात आणि सतत काही कारण सांगून , आणखीन वेळोवेळी ह्या तरुणांकडून पैशांची मागणी करीत असतात. हे युवक देखील ह्या सगळ्याला बळी पडतात.

मात्र यातून काहीच साध्य होत नाही.ती व्यक्ती हे सर्व पैशांसाठी करीत असते आणि युवकरांची मात्र शेवटपर्यंत फसगत होते आणि जेव्हा हे सर्व त्यांच्या लक्षात येते तेव्हा आर्थिक नुकसान तर झालेलेच असते , पण मनस्तापही खूप भोगावा लागतो.आजकाल अशा घटना कमी-अधिक प्रमाणात शहरी तसेच ग्रामीण भागात देखील पहावयास मिळत आहेत.आणि दुर्दैवाने सुशिक्षित मंडळी यात बळी पडत आहेत.

आजकाल निराधार स्त्रियांना देखील अनोळखी माणसे फोन करून अमुक एका सरकारी योजनेअंतर्गत लाभ मिळवून देतो ,असे सांगून मोठी फसगत करीत आहेत. मोठ्या पगारदार व्यक्ती देखील अशाच काही आर्थिक फंदात पडून स्वतःची फसवणूक करून घेतात.पण ह्या सगळ्यात आपणच स्वतः जबाबदार असतो.

आपण नको तेवढा एखाद्यावर विश्वास ठेवतो , स्वतःच्या सर्व खाजगी , आर्थिक , कौटुंबिक गोष्टी सांगून टाकतो आणि यातील काही मंडळी आपला डाव बरोबर साधतात आणि आपला हेतू साध्य करतात.काही वेळेस आपली आर्थिक फसवणूक होते, तर कधी मानसिक आणि भावनिक.काही वेळेस नात्यांमध्ये , मैत्री मध्ये फसवणूक होते.वरवर प्रेमाने बोलणारी माणसे मनातून मात्र आपल्याबद्दल कट रचत असतात.

मग आपण वेळीच सावध झाले पाहिजे , नाहीतर आयुष्याचे फार मोठे नुकसान होते. काही जण आपल्या पुढे पुढे करीत असतात, ते आपल्याला खूप काही मदत करीत आहेत असे दाखवीत असतात .पण ह्या बदल्यात त्या व्यक्तीचा हेतू खूप भयंकर असू शकतो.काही पुरुष मंडळी , स्त्रियांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्याशी शरीरसंबंधाची सुध्दा मागणी करतात ,तर काही स्त्रिया प्रेमाचे नाटक करून , फक्त पैशासाठी श्रीमंत पुरुषांच्या भावनांशी खेळतात. म्हणून आज प्रत्येक व्यक्तीने सावध राहिले पाहिजे.

एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, ह्या जगात ,आपल्या आई-वडीलांपेक्षा जास्त कोणीच आपल्याबरोबर निरपेक्ष वृत्तीने राहत नाही.आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्तीला कमी जास्त प्रमाणात आपल्याकडून कोणती ना कोणती अपेक्षा ही असतेच. फरक इतकाच असतो की काही जणांचा हेतू चांगला असतो तर काहींचा स्वार्थी. म्हणून कोण आपल्याशी इतकी लगट का करीत आहे? आपल्या मर्यादा सोडून का असे वागत आहे? हे वेळीच लक्षात आले पाहिजे. भावनेच्या भरात व्हावत न जाता, काही दृष्ट्या व्यवहारिकपणे वागून स्वतःचे आयुष्य योग्य मार्गावर नेले पाहिजे.

काही व्यक्तींना आपण खूप ‘सच्चा माणूस’ समजत असतो, पण हीच माणसे आपल्या पाठीत खंजीर खुपसतात.आणि मग आपण विश्वास ठेवत जातो आणि आयुष्याचे नुकसान करून घेतो.आजकाल स्वार्थीपणा खूप वाढला आहे.’आपली आपली’ म्हणणारी माणसेच आपल्या नकळत आपल्या धोका देत असतात. मग ह्या सगळ्यात एक प्रश्न समोर येतो.विश्वास तरी कोणावर ठेवायचा? कारण , मनुष्य हा समुहात राहतो, तो एकटा राहू शकत नाही.पण मग , कोणावरही विश्वास ठेवून , आयुष्य बरबाद करायचे का? तर अजिबात नाही.

अशा वेळी, आपण स्वतःचा रस्ता आधी निवडला पाहिजे, स्वावलंबी बनता आले पाहिजे.काही माणसे खरेच आपल्याला खूप सहकार्य, मदत करीत असतात.पण सगळेच तसे नसतात.किंवा, आपण सर्वांना मदत करतो म्हणून, सगळेच आपल्यासारखे असतीलच असे नाही.म्हणूनच, स्वतः खंबीर बनले पाहिजे, सारासार विवेक बुद्धी शाबूत ठेवली पाहिजे.निरीक्षण केले पाहिजे.

इतरांच्या चुकांमधून आपण शहाणे झाले पाहिजे.स्वतःचे ज्ञान वाढविले पाहिजे.समजात वावरत असताना, कोण आपल्या हालचालींवर लक्ष ठेवून तर नाही ना या बाबत सतर्क राहिले पाहिजे.’कोण कसा असतो’ याचा अंदाज आजकाल बांधणे खूप अवघड झाले आहे.म्हणून शक्यतो, सार्वजनिक जगात वावरताना, मोबाईल फोन चा देखील गरज असेल तरच वापर करावा.काही अशा छोट्या-छोट्या गोष्टी अंगी बाणल्या तर आपण आपली फसगत टाळू शकतो आणि आयुष्याचे नुकसान देखील थांबवू शकतो.

प्रत्येक माणूस वेगळा असतो.तसेच जन्मतः कोणी कपटी, वाईट ,फसवणारा नसतो.पण ह्या जगात परिस्थिती प्रत्येक वेळी वेगवेगळी असते आणि त्यामुळेच काही जण अशा परिस्थिती असे वागतात की त्यामुळे इतरांच्या आयुष्याची जणू ‘वाट’ च लागते.म्हणून आज एक सुजाण नागरिक म्हणून, प्रत्येकाने सतर्क राहून,दिशाहीन न होता, कोठेही भरकटत न जाता, आयुष्य जगले पाहिजे.

शेवटी,ते म्हणतात ना, ‘आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो’.अगदी असेच काहीसे आयुष्य प्रत्येकाने जगले पाहिजे.

बाकी, स्वतःची काळजी घ्या, आयुष्य फार सुंदर आहे.आनंदात जीवन व्यतीत करा.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “केवळ माणसं ओळखण्यात चूक केल्यामुळे आयुष्याचं खूप मोठं नुकसान होतं.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!