Skip to content

केलेल्या कामाची कोणीही दखल घेत नसेल तर काय करावे ?

केलेल्या कामाची कोणीही दखल घेत नसेल तर काय करावे ?


गीतांजली जगदाळे

(मानसशास्त्र विद्यार्थिनी)


काही लोक कामचुकार असतात तर काही लोक खूप कष्टाळू असतात. कामचुकार असलेल्या माणसांना दोष देण्यात कोणीही कसूर करत नाही. पण बऱ्याच वेळा केलेल्या कामाची दखल न घेण्याचे गुण खूप लोकांच्या अंगात दिसतात. आता बऱ्याच घरीही अशी माणसे आढळतात, आणि कामाच्या, नौकरीच्या ठिकाणी देखील अशी माणसे आढळतात. पण अशा वेळी काय बरं करायला हवं? पण या आधीचा आणि महत्वाचा प्रश्न हा आहे की, कोणी दखल घ्यावी अशी इच्छा किंवा अपेक्षा माणसाला का बरं असते?

कोणतंही काम जेव्हा आपण अगदी मन लावून करत असतो, ज्यातून आपल्याला आनंद आणि समाधान मिळत असते, असे कोणतेही काम केल्यानंतर आपल्याला कोणी दखल घ्यावी, कौतुक करावे अशी कोणतीही इच्छा होतं नाही, किंवा अगदी अपेक्षा देखील नसते. ते काम पूर्ण झाल्यावर आनंद तर होतोच पण ते काम चालू असताना देखील त्या कामातून आनंद आणि समाधान याची अनुभूती आपल्याला होतं असते. अशा कामाची दखल घेतली जावी अशी अपेक्षा कधीच माणसाला नसते. आणि त्यामुळे ती दखल न घेतल्यास त्याच काही वाईट ही वाटत नाही.

पण आयुष्यात आपल्याला नेहमी सगळीच कामे आपल्या आवडीची , मनाची करता येतील असं नसत. काही वेळा आवडीचं काय हे कळायला काहींना वेळ लागतो, तर काहींना ते माहित असून पोटापाण्यासाठी वेगळी कामे देखील करावी लागतात. आपण नौकरी करतो तेव्हा शक्यतो कोणीतरी दखल घेण्याची गरज भासू लागते.

आज खूप व्यक्ती अशा आढळतील ज्यांचं मन त्यांच्या नौकरीत लागत नाही. पण इनकमसाठी ते काम करणं त्यांना भाग असत. पण ज्या कामात मन लागत नाही त्यातून समाधान आणि आनंद मिळत नाही. जे आतून मिळत नाही ते बाहेरून मिळवायचा प्रयत्न माणूस करत राहतो.

जेव्हा आपल्या कामाची दखल घेतली जाते, तेव्हा मनाविरुद्ध कराव्या लागणाऱ्या कामाचा थोडा ताण दूर झाल्यासारखा वाटतो, काही वेळा पुरत तरी हलकं झाल्यासारखं वाटत. आणि त्या दखलेची खरंच अशावेळी गरज देखील असते. आणि त्यामुळे ज्या कामातून आपल्याला आनंद आणि समाधान मिळत नाही अशाच कामाबाबतीत दखल घेतली जावी अशी अपेक्षा लागून राहते.

अशा अपेक्षा पूर्ण न झाल्याने स्ट्रेस येतो, माणूस depressed व्हायला लागतो. आधीच ज्यात मन रमत नाही ते काम करण्याची उरलीसुरली इच्छा पण जायला लागते, आणि बळ बळ केलेलं कोणतंही काम नीट होण्याची शक्यता कमीच असते. आणि अशा कामाची दखल घेतली जाणं म्हणजे त्यावरून शिव्याच बसण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे आपल्या नकारात्मक भावनांमध्ये भर पडायला अजून मदत होते.

कारण अशा वेळी नक्कीच असे वाटायला लागते की, इतक्या दिवस आवडत नसून देखील मी हे काम इतक्या प्रामाणिकपणे चांगले केले पण तेव्हा कोणाला त्यावर बोलायला, त्याची दखल घ्यायला वेळ नव्हता, पण आता एका चुकीची दखल घ्यायला मात्र यांना बरोबर जमलं.
पण अशी अपेक्षा पूर्ण न झाल्यास काय करावे?

आपल्या आवडीची कामे फावल्या वेळात तरी करायचा प्रयत्न करावा, जमेल तेव्हा छंद जोपासायचा प्रयत्न करावा, त्याने तुम्हाला हरवलेलं समाधान आणि आनंद प्राप्त होईल. आणि मग काही वेळ जे काम तुम्हाला मनाविरुद्ध करावं लागत त्याबद्दल मनात फार दखलीची अपेक्षा देखील राहणार नाही. कारण कुठून ना कुठून तुम्हाला तुमचं समाधान आणि आनंद मिळालेला असणार.

आणि त्यामुळेच बाहेरच्या अँप्रेसिएशनची फार गरज भासणार नाही. आपल्या आवडीच्या कामांसाठी वेळ काढणं शेवटी आपल्याच हातात असत. त्यातून इनकम मिळो ना मिळो समाधान, आणि आत्मिक आनंदासाठी ते करणं नक्कीच महत्वाचं आहे.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!