कुटुंब प्रमुखाला मरणाची भीती नसते तर आपल्या नंतर कुटुंबाचे कसे होईल याची धास्ती असते.
दिपाली मुळे
(इमेज कंसल्टंट ॲन्ड लाइफ कोच)
सीमा आणि विजय सुखवस्तू जोडपे….. विजय बँकेत मॅनेजर, तर सीमा गृहिणी ….आई वडील,ईशाआणि अतुल अशी दोन मुलं ….गोकुळा सारखा भरलेलं घर…. त्यातच कोरोना नावाचा व्हायरस आला आणि सारं चित्रच बदललं. सगळं जग ठप्प झालं .शाळा-कॉलेज, दुकाने, ऑफिस, कंपन्या सारकाही बंद झालेले ….फक्त बँका चालू…… नवीन व्हायरसचा धोका आणि बँकेत तर जावंच लागणार!! नोकरी तर करावीच लागणार!! त्याशिवाय घर कसे चालणार? या सर्व विचारात विजयला काळजी वाटायला लागली की कामासाठी घराबाहेर पडावे लागणार पण जर मला काही झाले तर ?मला व्हायरस इन्फेक्शन झाले तर ?त्यात समजा मला काही बरे वाईट झाले तर ??????
आपल्यानंतर कुटुंबाचे कसे होईल आई-वडील सत्तरी पार झालेले आहेत आधीच खूप हळवे झाले आहेत.त्यांना आता कष्ट होत नाही. सीमा….सीमा तर कधीही घराबाहेर पडली नाही पैसे कमवायला म्हणून… मूल अजून लहान आहेत शिक्षण चालू आहे. मग आपल्यानंतर या सगळ्यांचे कसे होणार??
मित्रांनो हा एक प्रातिनिधिक अनुभव झाला.. कोरोना काळात हा सगळ्यांनी घेतला .कुटुंब प्रमुखावर कुटुंबाची जबाबदारी असते म्हणून त्याला स्वतःच्या मरणाची भीती नसते तर आपल्या नंतर कुटुंबाचे कसे होईल याचीच धास्ती असते. मित्रहो कुटूंब प्रमुख म्हणजे पुरुष असे नाही बर का तर घरातील कर्ती स्त्री ही सुद्धा कुटुंब प्रमुख आहे .जर पुरूष कमावून आणत असेल तर स्त्री घराला घरपण देते .संसाराच्या रथाची दोन चाके दोन्ही महत्त्वाची … दोघेही कुटुंब प्रमुखच…. घरातली कर्ती स्त्री तिचे निधन झाले तर घर मोडकळीस येते आणि घरातल्या कर्त्या पुरुषाचे निधन झाले तर घर अस्ताव्यस्त होते. दोन्ही ठिकाणी फारच मोठे नुकसान होते पण म्हणून आपल्यानंतर आपल्या कुटुंबाचे कसे होईल या धास्तीने जगणे याला आपण जगणे म्हणू का? खरंच त्याला जगणे म्हणता येईल का? कोरोनाव्हायरस हा दोन वर्षांपूर्वी जगामध्ये दाखल झाला आहे मात्र कुटुंबप्रमुख वर कायमच ही धास्ती आहे. मग यावर उपाय काय ?विचार करूया ज्याद्वारे आपण आपली धास्ती थोड्याफार प्रमाणात कमी करू शकतो.
या जगातील शाश्वत सत्य काही असेल तर ते हे आहे की कधी न कधी आपण प्रत्येक जण मरणार आहोत आपण अमर नाही हे सत्य स्वीकारून मगच जगावे.
कुटुंबातील सर्व सदस्यांना स्वावलंबन शिकवावे मग ते आर्थिक बाबतीतले असो वा घराचे व्यवस्थापन असो व स्वतःची कामे स्वतः करणे असो .म्हणजे जर कर्ता पुरुष नसेल तर आर्थिक स्वावलंबन उपयोगी पडेल आणि जर कर्ती स्त्री नसेल तर घराचे व्यवस्थापन कामास येईल आणि जर दोन्ही नसतील दुर्दैवाने तर मग मात्र घराचे व्यवस्थापन आणि आर्थिक स्वावलंबन हे दोन्हीही आपल्याला करता आलं पाहिजे.
आजच्या काळात महागाईच्या काळात आणि स्पर्धा एवढी वाढलेली आहे की दर वर्षी घराचे बजेट हे बदलत जाते. त्यामुळे प्रत्येक कुटुंब प्रमुखाने खर्चाचे बजेट ठरवतांना कुटुंबासमवेत बसून योजनात्मक रित्या आर्थिक नियोजन करावे. आगामी काळाचा विचार करून बचत व गुंतवणूक या दोन्ही मार्गांचा अवलंब करावा .असे एक ना अनेक पर्याय उपलब्ध शेअर्स,म्युचुअल फंडस,एसआय पी ,एफडी ,रीयल ईस्टेट असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आपण केलेल्या बचत व गुंतवणुकीची कुटुंबातील सर्व सदस्यांना माहिती द्यावी म्हणजे पुढेमागे जर आपण राहिलो नाही तर त्यांना काही त्रास होणार नाही. त्यांना त्या बाबतीत सर्व काही माहिती असेल .
प्रॉपर्टी संपत्तीचे विवरण त्याचे दस्तऐवज हे सारे काही कागद कायदेशीरपणाने केलेले असावे. कागदपत्रांवरती वारसदार यांची नावे टाकून सारे काही कायदेशीर रित्या करून घ्यावे. पुढेही हिस्से वाटे होण्याची शक्यता असेल किंवा तशी गरज असेल ,मुलांना द्यायचे असेल तर तेसुद्धा स्पष्टपणे कागदोपत्री कायदेशीर सल्ला घेऊन करून ठेवावे. पेन्शनचे वारसदार, घर ,शेती यांची कागदपत्र ही सर्व क्लियर असावीत. कायदेशीररीत्या या सर्व गोष्टींचा आपण विचार करून तशी तजवीज करून ठेवावी. याचा अर्थ आपण मरण पावणार असं नाही पण जी काही आपण ही पुढची नियोजनाच्या गोष्टी सगळ्या करत आहोत त्याने घरच्यांचा त्रास हा आपल्या नंतर कमी होणार आहे .
त्यासोबतच स्वत:चा आणि कुटुंबाचा जीवन बीमा म्हणजे लाइफ इन्शुरन्स आणि मेडिकल इन्शुरन्स करून ठेवावा म्हणजे आपत्तीजनक परिस्थितीमध्ये हॉस्पिटलमधील उपचार पैशांसाठी थांबता कामा नये किंवा आपण आजारी पडलेला असताना घरच्यांना पैशांच्या तजविजीसाठी वणवण इकडे तिकडे फिरायला नको. आज-काल कॅशलेस मेडिक्लेम उपलब्ध असतात त्यामुळे हॉस्पिटलमध्ये उपचार लवकरात लवकर आणि सगळ्या पद्धतीने करता येतात.
घरातील स्त्रिया मुले यांना देखील बाहेरील जगाशी संपर्क करता येईल अशी कामे नियमित पणे करायला सांगावे जसे की बिल भरणे आहे बँकेतली कामे करणे आहे सरकारी कामे करणे आहे घराच्या व्यवस्थापन स्वत:च्या कॉलेज किंवा शिक्षण पद्धतीतली काय काम असतात ती स्वतःची स्वतः करणे म्हणजे पुढे ज्यावेळी जबाबदारी येईल तेव्हा अचानक जबाबदारीमुळे गोंधळल्यासारखे होणार नाही. काम करण्याची सवय असेल.
मरण पावलेल्या माणसाची स्थान कधीच दुसरे कोणीही भरून काढू शकत नाही त्यातून कुटुंबप्रमुखाची जागा कोणीच घेऊ शकत नाही त्यामुळेच इतर नुकसान तर होतेच पण भावनिक पोकळी देखील निर्माण होते. त्यामुळे एखादी कला माणसाला जर येत असेल तर दुःख पचविण्याची आणि संघर्ष देण्याची शक्ती त्यातून मिळते. याचा विचारही कुटुंब प्रमुखाने करून कुटुंबियांनी साठी अशी काहीतरी एखादी कला एखादे कौशल्ये शिकण्याची तजवीज करावी त्यासोबतच कुटुंबाने देखील कुटुंब प्रमुखाचा साठी असाच काहीतरी विचार करण्याची गरज आहे .धास्तीत जगण्याने कुटुंब प्रमुखाचे आयुष्य हे विनाकारण आरोग्य बिघडते किंवा खराब होऊ शकते त्या सतत भीतीखाली वावरण्याने आरोग्याला हानी पोचू शकते .हा ताण तणाव कमी करण्यासाठी कुठेतरी ताण घालवण्यासाठी असं काहीतरी असेल त्याने सगळा ताण निघून जाईल.
आणि त्याहून सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत कुटुंबासमवेत आनंद मिळवणे आपण कमावलेल्या पैशाचा संपत्तीचा उपभोग चांगल्या पद्धतीने घेणे कुटुंबासोबत चांगला वेळ घालवणे हे अतिशय महत्वाचे आहे .आई वडिल पत्नी मुले मित्रपरिवार नातेवाईक यांच्याशी वेळोवेळी भेटून बोलून कॉलिटी टाइम घालवणे म्हणजे आनंदाचा ठेवा आहे तो आपण भरभरून घेतला पाहिजे म्हणजे ज्या वेळी खरच मरणाची वेळ येईल तेव्हा मनामध्ये खंत राहणार नाही की पैसे मिळवण्याच्या धावपळीत कुटुंबासोबत वेळ घालवू शकलो नाही.
तेव्हा मित्रहो हा लेख कसा वाटला ते जरुर सांगा……
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

खूप सविस्तर मांडले आहे व वास्तव चित्रण केले आहे 👍👌
संवेदनशील क्षणीही केवळ भावूक न होता जागरूक राहणं खूप आवश्यक आहे. या माहितीपूर्ण लेखाबद्दल अभिनंदन !
Lekh Khup chhan aacharniy ahe .